दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. जगातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या सरोवरांपैकी हे एक मोठे सरोवर आहे. बोलिव्हियाच्या नैर्ऋत्य भागातील आल्तीप्लानो या पठारी प्रदेशात, सस. पासून ३,६८६ मी. उंचीवर असलेल्या एका उथळ खळग्यात हे सरोवर निर्माण झालेले आहे. आयताकृती असलेल्या या सरोवराची लांबी सुमारे ९० किमी., रुंदी ३२ किमी. व क्षेत्रफळ २,५३० चौ. किमी. असून त्याची खोली २.४ मी. ते ३ मी. आहे. या सरोवराला देसाग्वादेरो आणि मार्केस या नद्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यांपैकी देसाग्वादेरो ही मुख्य नदी असून ती बोलिव्हियातील सर्वांत मोठ्या तितिकाका सरोवरातून बाहेर पडते आणि पोओपो सरोवराला उत्तरेकडून येऊन मिळते. तितिकाका सरोवर पोओपो सरोवराच्या उत्तरेस आहे. लाकाजाहुइरा या नदीद्वारे पोओपो सरोवराचे पाणी बाहेर जाते. या सरोवराच्या पश्चिमेस कॉइपसा सरोवर असून ही दोन्ही सरोवरे लाकाजाहुइरा या नदीद्वारे एकमेकांना जोडलेली आहेत. पुराच्या वेळी नदीचे पाणी सालार दे कॉइपसा या खाजणात मिळते. या सरोवराच्या मध्यभागी पान्सा बेट आहे. येथील पाण्यात माशांचे प्रमाण जास्त होते; परंतु पाण्याच्या क्षारतेत वाढ झाल्यामुळे व पाण्याच्या प्रमाणात घट झाल्यामुळे मासे कमी झाले आहेत.
पोओपो सरोवर १९९० च्या मध्यात कोरडे पडले होते; मात्र पर्जन्यातील वाढीमुळे व देसाग्वादेरो व मार्केस या नद्यांद्वारे झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे हे सरोवर पुनर्जिवीत झाले. गेल्या दोन दशकांत मात्र सरोवरातील पाण्याचे प्रमाण फारच कमी होत गेले आहे. २००२ मध्ये या सरोवर क्षेत्राचा रामसर परिसरात समावेश करण्यात आला आहे. त्याच वर्षी या सरोवराच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आले; परंतु देसाग्वादेरो नदीद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात झालेली घट, हवामानात अचानक झालेले बदल, अवर्षण, सरोवराला येऊन मिळणाऱ्या पाण्यापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त, स्थानिक खान उद्योगामुळे सरोवरात झालेले गाळाचे संचयन आणि प्रदूषण, जलसिंचनासाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा, योग्य व्यवस्थापनाचा व नियोजनाचा अभाव इत्यादींच्या एकत्रित परिणामांमुळे हे सरोवर डिसेंबर २०१५ मध्ये पुन्हा कोरडे पडले होते. जागतिक तापमानवाढीमुळे या प्रदेशातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सरोवरातील पाण्याच्या बाष्पीभवनात तिपटीने वाढ झाली आहे. तसेच तापमानातील बदलामुळे एल निनोची वारंवारता व तीव्रता यांत वाढ झाली. परिणामी पोओपोच्या आसमंतातील पर्जन्यमानात प्रचंड चढ-उतार होऊन अवर्षणाची परिस्थिती निर्माण होऊ लागली. या सरोवराच्या संवर्धनासाठी तसेच येथील परिस्थितिकी संतुलनासाठी यूरोपीय संघाने सुमारे १५ द. ल. डॉलरची मदत करूनही परिस्थितीत विशेष सुधारणा झाली नाही. त्यामुळे सरोवराचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आहे. याचा परिणाम सरोवराच्या परिसरातील वनस्पती व प्राणिजीवनावर, तसेच अर्थव्यवस्थेवर झाला. सरोवराच्या अशा स्थितीमुळे याच्या किनाऱ्यावर वास्तव्य करून मासेमारी करणाऱ्या व अन्य लोकांना स्थलांतर करणे भाग पडले.
पुरातत्वीय संशोधनानुसार इ. स. पू. २०० ते इ. स. २०० या कालावधीत पोओपो सरोवराच्या परिसरात खेडी व नगरांचा चांगल्या प्रकारे विकास व विस्तार झाला होता. इतर संशोधनानुसार इ. स. ३०० ते ९०० या काळात येथील वस्ती आणखी वाढली होती. भूशास्त्रानुसार या सरोवरात सोडियम क्लोराइडचे प्रमाण जास्त असून त्यात मीठाचे स्फटिकही आढळतात. याच्या आसमंतात लोह खनिजाचे साठे जास्त आहेत. त्याच्या उत्खननामुळे सरोवराच्या पाण्यात धातूचे कण मोठ्या प्रमाणात साचलेले आढळतात. तसेच सरोवरातील पाण्याचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात झालेले आहे. पोओपो हे सरोवराच्या किनाऱ्यावरील प्रमुख शहर आहे.
समीक्षक : नामदेव स. गाडे