नागचंद्र : (सु. अकरावे शतक). प्रसिद्ध कन्नड कवी. तो जैन धर्मीय होता. त्याच्या जीवनाबाबत फारशी अधिकृत माहिती मिळत नाही. अकराव्या शतकाच्या अखेरीस तो होऊन गेला असावा, असे बहुतेक अभ्यासक मानतात. चालुक्य व होयसळ राजांकडून त्याचा सन्मान झाला असावा असे दिसते तथापि त्याच्या आश्रयदात्या राजाचे नाव ज्ञात नाही. आपल्या विजयपुर (हल्लीचे विजापूर) गावी मल्लिजिनेशाची ‘बसदी’ आपण बांधली, असे कवीच आपल्या ग्रंथात म्हणतो. त्यावरून तो धनाढ्य आणि वृत्तीने धार्मिक असावा असे दिसते. जैन धर्मावर ज्ञानपूर्वक निष्ठा, जिनभक्ती व गुरुभक्ती हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष त्याच्या ग्रंथांवरून लक्षात येतात. भारती कर्णपूर, कवितामनोहर, साहित्य विद्याधर, अभिनवपंप इ. बिरुदांनी भूषित असा हा कवी कर्णपार्य, जन्न वगैरे उत्तरकालीन कन्नड कवींच्या प्रशंसेस पात्र ठरला.

त्याने रचलेली मल्लिनाथपुराण  व रामचंद्र चरित्रपुराण  ही दोन चंपूकाव्ये प्रसिद्ध असून महत्त्वाचीही आहेत. मल्लिनाथपुराणात त्याने एकोणिसाव्या तीर्थंकराचे चरित्र वर्णिले आहे. या काव्याची कथावस्तू लहान असली, तरी कवीने तिचा १४ आश्वासांत विस्तार केला आहे. रामचंद्र चरित्रपुराण  किंवा पंपरामायण  हा त्याचा काव्यग्रंथ कन्नडमधील पहिला रामायणग्रंथ होय. प्रस्तुत काव्यास जैन परंपरेतील विमलसूरीच्या पउमचरिउ  या प्राकृत काव्याचा आधार असून त्याचे १६ आश्वास आहेत. यातील रावणाच्या व्यक्तिरेखेचे उदात्तीकरण विशेष लक्षणीय आहे. स्वतःस तो ह्या रचनेत ‘अभिनवपंप’ म्हणवून घेतो. महाकवी आदिपंपाच्या तुलनेत मात्र हा अभिनवपंप बराच खुजा वाटतो. असे असले, तरी त्याची मृदुमधुर शैली, शांत रसाचा परिपोष, प्रभावी व्यक्तिचित्रण, धार्मिक वृत्तीचा पुरस्कार इ. गुणांमुळे प्राचीन कन्नड साहित्यात नागचंद्राला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

संदर्भ :