काणवी चेन्नाविरा  :  (जन्म २९ जून १९२९ ). सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक.कन्नड भाषेतील कवितेला नावलौकिक मिळवून देण्यात काणवी यांचे मोठे योगदान आहे.उत्तर कर्नाटकमधील सांस्कृतिक जीवनाची प्रतीके आणि प्रतिमा त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबित होतात. काणवी यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील गडग या तालुक्यातील छोट्याशा गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिरुजा या गावात झाले. पुढे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ते गडग येथे आले. त्यानंतर त्यांनी धारवाड येथे आर. एल. एस हायस्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. चेन्नाविरा काणवी यांचे वडील सक्केरेपा हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांची आई पार्वथाम्मा ही सर्वसामान्य गृहिणी होती. काणवी यांचे वडील कविता आणि धार्मिक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. आपल्या मुलासाठी त्यांनी बौद्धिक आणि सांस्कृतिक वातावरण उपलब्ध करुन दिले. प्रारंभिक ग्रामीण पार्श्वभूमीचा काणवी यांच्या व्यक्तीमत्त्वावर आणि साहित्यावर प्रभाव पडला. त्यांनी कर्नाटक महाविद्यालयात प्रथम श्रेणीसह पदवी (१९५०) आणि कर्नाटक विद्यापीठातून  कन्नड साहित्यात एम. ए. ची पदवी (१९५२) प्राप्त केली. त्यांनी प्रकाशन व विस्तार सेवेचे सचिव म्हणून कर्नाटक शासनामध्ये नोकरी केली आहे.

काणवी यांची प्रामुख्याने कवी म्हणून ओळख आहे. त्यांचे एकूण १५ काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. याशिवाय काही निबंध व संशोधनात्मक लेखनही त्यांनी केले आहे. काव्याक्षी (१९४९), भावजीवी (१९५०),अक्षबुट्टी (१९५३), मधुचंद्रा (१९५४), दीपधारी (१९६६), मनीना मेरावनिगे (१९६०), नीला मुगीलु (१९६५), जीवध्वनी  (१९८०), हक्किपुच्चा (१९८५), कार्तिकडा मोडा (१९८६), होऊ होरालुवावु (१९८७), होम्बेलाकू (१९८९), झिनिया (१९९०) इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. काणवी यांचे टीकात्मक निबंध देखील प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये साहित्य चिंतना (१९६६), काव्यानुसंधाना (१९७१), संहिता  (१९७७), मधुराचेन्ना (१९८४), समातोलना (१९८९), वाचनांतरंगा (१९९९), शुभा नुदीये हक्की (२०००),साहित्य सामाहिता (२००६), सद्भावा (२००६), काणवी समग्रा गद्या (२००९) यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्या व्यक्ती आणि साहित्यासंदर्भात पुढील गौरवग्रंथ प्रकाशित आहेत – चेंबेलाक्यू (१९८०), मुगीयादा हाडु (१९९८), बेलिटेरिना दारी (२००३) व काणावियावरा आयडा कवितेगाला अनुसंधाना (२००९).

काणवी यांची कविता वर्णनपर आहे, तरीही वास्तवाचा वेध घेवून तसा कबुलीजबाब देणारी कविता म्हणून ती प्रसिद्ध आहे. ग्रामीण जीवन आणि निसर्ग हे त्यांचे कवितांचे विषय आहेत. त्यांच्या कवितेत स्वच्छंदतावादी वृत्ती आणि शास्त्रीय शिस्त यांचा सुरेख समन्वय आढळतो. त्यांची संपूर्ण कविता काळानुसार जगणाऱ्या माणसाच्या संघर्षमय आयुष्याची अभिव्यक्ती आहे. चांगल्या मनाचे सांत्वन करणारा आवाज त्यांच्या कवितेतून मुखर होतो. अवती भवतीचे वास्तव हे विकल असले तरीही मैत्री, प्रेम, आपुलकी आणि धैर्य या मूल्यांचा उपयोग करणे शक्य आहे असा विश्वास काणवी यांच्या कवितेतून व्यक्त होतो. यांच्या कवितांमध्ये कल्पनेच्या गुणांनी निर्मित मोकळेपणा, वास्तव, सामाजिक प्रबोधन आणि विडंबनाचे विषय आहेत. सामान्य ग्रामीण आदिवासी जीवनाचे प्रतिमांकन त्यांच्या कवितेत गेय स्वरुपात प्रकटले आहे. सॉनेट या काव्यप्रकारात काणवी यांनी विपुल काव्यलेखन केले आहे.

काणवी कर्नाटक विद्यापीठात प्रकाशन व विस्तार सेवेचे संचालक म्हणून काम केले. एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला. त्यांनी ग्रामीण भाग आणि विद्यापीठ यांच्यातील दुवा बनुन विस्तार सेवेच्या क्षेत्रात नवकल्पना रुजविली. काणवी यांना त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार (१९८१), कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९८५), कर्नाटक राज्य राज्योत्सव पुरस्कार (१९८८), पंप प्रशस्ती कन्नड साहित्य पुरस्कार (१९९९), इत्यादी महत्वाच्या पुरस्कारांचा त्यात समावेश होतो. कन्नड विद्यापीठाची मानद डॉक्टरेट (२००२) ही त्यांना पदवी बहाल करण्यात आली आहे .त्यांनी साहित्य अकादमी, कर्नाटक राज्य साहित्य अकादमी, कन्नड सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. कन्नड व कर्नाटक विद्यापीठाचे सिंडिकेट सदस्य म्हणून व अखिल भारतीय कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून काणवी यांनी काम केले आहे.

काणवी यांनी कवितेसोबतच साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयांवर उल्लेखनीय लेखन केले. काणवींचे योगदान केवळ साहित्यिक म्हणून संपत नाही, तर कर्नाटकमधील सांस्कृतिक जीवनाचे प्रतिक म्हणून त्यांनी स्वत:ला स्थापित केले आहे.

संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/chennaveera_kanavi.pdf