भारताच्या गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३४,८४५ (२०११). हे अहमदाबादच्या आग्नेयीस सुमारे २०० किमी., कर्जन नदीच्या किनाऱ्यावर सस. पासून १४८ मी. उंचीवर वसलेले आहे. २ ऑक्टोबर १९९७ रोजी नर्मदा जिल्ह्याची नव्याने निर्मिती करण्यात येऊन राजपीपला हे त्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ठेवण्यात आले. हे दाभोई (वडोदरा जिल्हा) –अंकलेश्वर (भडोच जिल्हा) लोहमार्गावरील स्थानक आहे. या प्रदेशावर गुर्जर घराण्याची सत्ता असताना याला नान्दीपुरी (नांदोद), तर मध्ययुगीन काळात नांदोल आणि नांदोड या नावांनी ओळखले जाई. इ. स. १८१८-१९ पासून याचे नाव राजपीपला असे झाले. राजपीपला संस्थानची राजधानी येथे होती. त्या वेळी राजपीपला संस्थानचे संस्थानिक येथे वास्तव्यास असत. त्यांनी येथे नवीन किल्ला बांधला (इ. स. १७३४). किल्ल्याचे ठिकाण नवीन राजपीपला म्हणून ओळखले जात होते.

राजपीपला शहरात माध्यमिक, तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा आहेत. परिसरातील शेतमालाची येथे बाजारपेठ आहे. येथील महादेव मंदिर, लक्ष्मी-नारायण मंदिर, गणेश मंदिर, मशीद, गुरूद्वारा, जैन मंदिर इत्यादी प्रसिद्ध आहेत. याच्या नजीकची कर्जन, देदियापाडा व डांग ही वनक्षेत्रे, झर्वानी धबधबा, निनाई धबधबा तसेच नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरण आणि तेथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा इत्यादी पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी