योगवासिष्ठ  हा ग्रंथ उत्तररामायण, वसिष्ठ महारामायण, मोक्षोपायसंहिता  या नावांनी देखील ओळखला जातो. हा ग्रंथ वाल्मिकींची रचना आहे, असे मानले जाते. तरीही या ग्रंथाचे रचनाकार रामायणकर्ते वाल्मीकी हेच आहेत की अन्य कोण याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आढळतात. तसेच या ग्रंथाचा रचनाकाळही निश्चित रूपाने सांगता येत नाही. इसवी सनाचे पाचवे शतक ते चौदावे शतक यामधील वेगवेगळ्या काळाचा निर्देश विद्वानांनी केला आहे. हा ग्रंथ पद्य स्वरूपात आहे.

वाल्मीकीरचित योगवासिष्ठ  हा मान्यताप्राप्त असा ग्रंथ असून वसिष्ठ मुनींनी रामाला दिलेले मोक्षविषयक विस्तृत ज्ञान ह्यात अंतर्भूत आहे. वैराग्य, मुमुक्षु, उत्पत्ति, स्थिति, उपशम व निर्वाण अशा एकूण सहा प्रकरणांमध्ये वर्ण्यविषय विभागलेला असून सुमारे ३२,००० श्लोक एवढा ह्याचा विस्तार आहे.

पहिल्या वैराग्य प्रकरणामध्ये रामाला लाभलेल्या जीवन्मुक्तीविषयी भारद्वाज मुनींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाल्मीकी ऋषिंनी रामाला लहान वयातच आलेले वैराग्य आणि त्याअनुषंगाने त्याने विश्वामित्र व वसिष्ठमुनींसमोर केलेले निवेदन व व्यक्त केलेली आत्मज्ञानाची जिज्ञासा यांचे वर्णन केले आहे. अध्ययन पूर्ण झाल्यानंतर रामाने तीर्थयात्रा केली आणि परत आल्यावर त्याचे मन ऐहिक बाबींविषयी उदासीन होऊ लागले, सगळ्या वैषयिक उपभोगांविषयी त्याची मनोभूमिका वैराग्यपूर्ण होऊ लागली. जगाची नश्वरता, संसारातील भ्रामकता, सर्वशक्तिमान काळाचे स्वरूप, विषयोपभोगामुळे घडून येणारा सर्वनाश इत्यादिविषयी त्याचे विचार स्पष्ट होऊ लागले होते. परिणामी उद्भवलेल्या मानसिक अशांततेवर उपाय सांगावा, मोक्षज्ञान द्यावे असा आग्रह त्याने त्या थोर मुनिंकडे धरला.

दुसऱ्या मुमुक्षु प्रकरणात विश्वामित्रांनी रामाला आत्मज्ञानाचा उपदेश करण्याचे कार्य वसिष्ठांवर सोपविले. त्यानुसार साक्षात् ब्रह्माने वसिष्ठांना केलेला उपदेश रामाला प्रतिपादन करण्यास वसिष्ठ सुरुवात करतात. या उपदेशात पुरुषार्थाची महती; तत्त्वज्ञानी व्यक्तीचे महत्त्व; शम, विचार, संतोष, साधुसंगती ह्यांचे आत्मज्ञानाच्या मार्गात असलेले महत्त्व; तसेच ह्या संपूर्ण उपदेशात येणाऱ्या सहा प्रकरणांचे थोडक्यात वर्णन आलेले आहे.

तिसरे प्रकरण उत्पत्तिविषयक असून वसिष्ठ मुनि त्यात चैतन्यमय ब्रह्मस्वरूप, आत्मतत्त्वाचे शुद्ध व अद्वैत रूप, द्वैताचा आभास निर्माण करणाऱ्या मनाचे स्वरूप, जीवन्मुक्ती व विदेहमुक्ती, जगाची उत्पत्ती, परमात्मा हेच जगाचे कारणरूप व कार्यरूप, चिदाकाशव त्याचे महत्त्व, सुख-दु:खविषयक उपदेश, अज्ञान (मोह) व ज्ञान ह्यांच्या प्रत्येकी सात अवस्था [ (१) बीजजाग्रत् (२) जाग्रत् (३) महाजाग्रत् (४) जाग्रत्-स्वप्न (५) स्वप्न (६) स्वप्न-जाग्रत् (७) सुषुप्त अथवा (१) शुभेच्छा (२) विचारणा (३) तनुमानसा (४) सत्त्वापत्ति (५) असंसक्ति (६) पदार्थाभावनी  आणि (७) तुर्यगा ] ह्या सर्व विषयांवर अनेक कथा-उपकथांच्या माध्यमातून प्रकाश टाकतात.

चौथ्या स्थिति प्रकरणात विश्वाच्या स्थितीचे विवेचन येते. जगाच्या अस्तित्वाच्या भ्रमाचे निराकरण, संसाराचे बीज म्हणून आत्मविषयक प्रतिपादन, जाग्रत्, स्वप्न, सुषुप्त व तुरीया अवस्थांचे वर्णन, जीवन व संसार ह्यांच्या विस्ताराचे प्रतिपादन, सत्य-असत्य निर्णय, कर्तव्य-विचार, मोक्ष-विचार व मोक्षोपाय असे अनेक विषय ह्या प्रकरणात चर्चिले आहेत.

पाचवे प्रकरण ‘उपशम’ असून ह्यात जनकाच्या ठिकाणी झालेली विवेक-उत्पत्ती, चित्ताचे अनुशासन, मनोनाश, तृष्णा आणि तिची चिकित्सा, जीवन्मुक्ताचे वर्णन, आत्मलाभ-चिंतन, समाधि-निश्चय, आसक्ति-चिकित्सा, संसार-योग उपदेश, आत्मयोग, मुक्त-अमुक्त विचार, चित्त-शांति, संशय-निवारण, मोक्ष-उपाय इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा येते.

सहावे निर्वाण प्रकरण दोन विभागांमध्ये विभागलेले असून पूर्वार्धात द्वैत भावनेचे भ्रामकत्व, ब्रह्म-ऐक्याचे प्रतिपादन, अज्ञानाची जडता, अविद्येचे निराकरण, जीवन्मुक्तीचा उपदेश, परमार्थ-योग, परमात्म्याचे रूप-वर्णन, नर नारायणाचे अर्जुन व श्रीकृष्ण या रूपाने अवतार व त्या निमित्ताने कृष्ण-अर्जुन ह्या दोघांतील संवादातून आत्मज्ञानाचा उपदेश, कर्म-अकर्म विचार, तुरीया पद विचार, कर्म-बीज नष्ट करण्याचा उपदेश, विराट्-आत्म्याचे वर्णन, ज्ञानाची श्रेष्ठता, निर्वाण-युक्ति, परमार्थ-योग, अद्वैत-उपदेश इत्यादी विषयांवर सखोल विवेचन येते.

निर्वाण प्रकरणाच्या उत्तरार्धात स्व-भाव सत्ता, मोक्ष-उपदेश, सर्वशांति-उपदेश, ब्रह्मस्वरूप प्रतिपादन, ब्रह्म-जगत् एकता, विराट्-जीव व विराट्-शरीर यांचे वर्णन, पुरुष-प्रकृति विचार, चैतन्याचे परमज्ञान, अविद्येच्या नाशाचा उपदेश, इंद्रिय-विजय, जीवन्मुक्ताचे बाह्य लक्षण व व्यवहार, निर्वाण-वर्णन, जगाच्या अ-भावाचे प्रतिपादन इत्यादी विषयांचे वसिष्ठमुनि विवेचन करतात. ह्या संपूर्ण उपदेशातून रामाच्या मनातील सर्व संदेहांचे निराकरण होऊन त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते.

योगवासिष्ठ  ह्या ग्रंथात अनेक कथा-उपकथा, त्या कथांमधील अनेक व्यक्तींना वेगवेगळ्या ऋषि-मुनींकडून केले गेलेले जीवनविषयक तसेच मोक्षविषयक उपदेश ह्या माध्यमातून वसिष्ठमुनि रामाला मार्गदर्शन करतात. त्यामुळे वर्ण्यविषयाचा विस्तार लक्षणीय, पण काहीसा गुंतागुंतीचा झाला आहे.

ह्या प्रदीर्घ उपदेशाचे सार थोडक्यात असे सांगता येईल –

प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ होय आणि शास्त्रानुकूल पुरुषार्थामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. ज्ञान, वैराग्य व अभ्यास यांनी आत्मपद प्राप्त होते. आत्मपद प्राप्त झालेला साधक सुख-दु:खामुळे प्रभावित होत नाही. सर्व जगत् त्याला ‘आत्मा’ या रूपात दिसते. (प्रकरण २).

आत्माशुद्ध व अद्वय असून मन म्हणजे ज्यामुळे द्वैत जग दिसते वा असल्याचे भासते ते होय. मन शांत झाल्यावर कुठलेच अस्तित्व राहत नाही. ‘मीच ब्रह्म आहे’ असा निश्चय झाल्यावर बंधनातून मुक्ती होते. (प्रकरण ३).

जगत् निर्मिती ही केवळ मनाची कल्पना असून आत्माच जगत् रूपाने आभासित होतो. म्हणूनच ज्ञानी सर्व ठिकाणी आत्म्यालाच पाहतो. आत्मसत्तेचा अभाव हीच अविद्या आहे. अविद्या संसारात भ्रम निर्माण करते तर आत्मज्ञानाने अविद्येचा नाश होतो. सर्व कार्याचे मूळ मनच होय. चित्त अहंकाराच्या योगाने वाढून कोशातील किड्याप्रमाणे स्वत:लाच बद्ध करून घेते. ‘मी बद्ध आहे’ अशी भावना करून आत्मा आपले पारमार्थिक स्वरूप विसरतो व जन्म-मरणाला प्राप्त होतो. याउलट ‘मी पूर्ण आनंद-स्वभावरूप आहे’ असे चिंतन केल्यास जग मिथ्या आहे, असे ज्ञान होऊन संसाराचा बाध होतो. (प्रकरण ४).

अहंकार, तृष्णा, वासना ह्यांचा त्याग केलेला कर्मरतज्ञानी सर्व कार्यात आत्माच पाहतो. तोच जीवन्मुक्त ठरतो. संगरहित, अनासक्त पुरुषाने केलेले प्रत्येक कार्य ध्यानच होय. चित्ताची वृत्ती रोखणे हाच योग. त्यासाठी प्राणाचे नियमन आवश्यक आहे. प्राणायामाने मन शांत होते, मन विलीन झाल्यावर जगसुद्धा विलीन होते. सुख-दु:ख, राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांचा काहीही परिणाम न होता निरासक्त पुरुष आत्मस्थित होतो. आत्मपदाची प्राप्ती झाल्यावर पुन्हा जन्म-मृत्यू संभवत नाहीत. (प्रकरण ५).

अज्ञान आहे तोपर्यंत चित्तामुळे जन्म-मृत्यूचे चक्र सुरू राहते. ईश्वरापासून गवताच्या पात्यापर्यंत सर्व काही अविद्येचेच रूप आहे; केवळ ब्रह्मच अविद्येपासून वेगळे आहे. अविद्या व विद्या अंधार व प्रकाश ह्यांच्याप्रमाणे परस्परविरोधी असून विद्येच्या उदयाने अविद्या नष्ट होते, परंतु त्या दोन्ही फक्त कल्पनाच आहेत. म्हणून दोन्हींचा त्याग करून केवळ आत्म्यात स्थित व्हावे, कारण तोच केवळ सत्य आहे. देहबुद्धी सोडावी. मात्र ज्ञान प्राप्त झाल्यावरही कर्म करणे सोडता येत नाही. कारण ते प्रारब्धाने प्राप्त झालेले असते. प्रत्येक ज्ञानी आपापले कर्म करीत राहतो. परंतु, बुद्धीने तो ब्रह्मरूपात स्थित असतो. त्याच्या बाबतीत कर्माचा त्याग वा ग्रहण दोन्ही शांत झालेले असतात. त्यामुळे कर्माचे फळ त्याला चिकटत नाही. अज्ञानी मात्र आपल्या कर्मानुसार स्वर्ग वा नरक प्राप्त करतो. (प्रकरण ६).

योगवासिष्ठात तत्त्वज्ञान व आख्याने यांचा मिलाफ आढळतो. या ग्रंथात अद्वैत तत्त्वज्ञान विशद केले आहे. त्या तत्त्वज्ञानाची योगाशी सांगड घातली असून मोक्षासाठी योग ही युक्ती आहे असे यात प्रतिपादन केले आहे (संसारोत्तरणे युक्तिर्योगशब्देन कथ्यते | निर्वाण प्रकरण, पूर्वार्ध १३.३). मात्र योग शब्दाने येथे ब्रह्म-जीव – जगत् यांचे अद्वैत सुचविले आहे.

समीक्षक : कला  आचार्य