पतंजलि मुनींनी रचलेल्या योगसूत्रांवर लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध भाष्य. इ. स. पू. सुमारे दुसऱ्या शतकात महर्षि पतंजलींनी १९५ योगसूत्रे लिहिली. योग तत्त्वज्ञानाच्या सर्व आयामांवर प्रकाश टाकणारी ही सूत्रे अतिशय कमी शब्दात योगातील विविध विषयांचा आशय साररूपाने स्पष्ट करतात. त्या योगसूत्रांवर अधिक विस्ताराने विवेचन करण्याच्या हेतूने व्यासांनी भाष्य लिहिले. व्यासभाष्याच्या रचनेचा काळ इ. स. सुमारे दुसरे शतक मानला जातो. भाष्यकारांचे नाव व्यास असल्यामुळे या भाष्याला ‘व्यासभाष्य’ असे म्हटले जाते.

भारताच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये व्यास हे नाव अनेक ठिकाणी उल्लेखिले आहे. परंतु, एका वेदाचे चार भागांमध्ये विभाजन करणारे व्यास, महाभारताची रचना करणारे व्यास, अठरा पुराणांची रचना करणारे व्यास, ब्रह्मसूत्रांची रचना करणारे व्यास आणि योगसूत्रांवर भाष्य लिहिणारे व्यास ही एकच व्यक्ती आहे की भिन्न याविषयी कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही. बहुतांश विद्वानांचे असे मत आहे की व्यास एकाच व्यक्तीचे नाव नसून वेगवेगळ्या व्यक्ती आहेत किंवा व्यास ही एक उपाधी आहे. योगसूत्रांवर भाष्य लिहिणाऱ्या व्यासांविषयी व्यक्ती म्हणून कोणतीही विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही.

योगदर्शनाच्या परंपरेत व्यासभाष्याचे योगदान महत्त्वाचे आहे. या भाष्यात सूत्रांतील शब्दांचे अर्थही स्पष्ट केले आहेत व सूत्रांमध्ये नसलेल्या परंतु, त्या विषयाचे पूर्ण ज्ञान होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्यही विषयांचा समावेश व्यासांनी केला आहे. योगसूत्रांत नसलेल्या परंतु, व्यासभाष्यात स्पष्ट केलेल्या काही महत्त्वाच्या संकल्पना पुढीलप्रमाणे आहेत –

चित्तभूमी : योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध ही व्याख्या स्पष्ट करताना व्यासांनी क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध या पाच चित्तभूमींचे वर्णन केले आहे (१.१, १.२). क्षिप्त, मूढ आणि विक्षिप्त भूमींमध्ये चित्तात अनेक वृत्ती उत्पन्न होतात; एकाग्र भूमीमध्ये एकच वृत्ती दीर्घकाळ राहते आणि निरुद्ध भूमीमध्ये चित्तात एकही वृत्ती राहत नाही. योग्याने अनेक वृत्ती असणाऱ्या (क्षिप्त, मूढ, विक्षिप्त) चित्ताला एकाग्र करण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्या एकाग्र चित्ताला वृत्तिरहित निरुद्ध अवस्थेकडे घेऊन जावे हा योगाचा संपूर्ण प्रवास आहे. पतंजलि मुनींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या योगसाधना एक तर अनेक वृत्ती असणाऱ्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी आहेत किंवा एकाग्र चित्ताला पूर्णपणे निरुद्ध करण्यासाठी आहेत. त्यामुळे व्यासांनी वर्णिलेल्या चित्ताच्या भूमी या समग्र योगसाधनांचे ज्ञान व त्यांचे प्रयोजन जाणून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

नऊ प्रकारची कारणे : कार्य-कारण संबंध हा सर्व दर्शनांमध्ये येणारा मुख्य विषय आहे. प्रत्येक दर्शनाने कारण आणि कार्य यांच्या व्याख्या, कारणाचे प्रकार, त्यांचे सत्-असत् स्वरूप याविषयी बराच ऊहापोह केलेला आहे. व्यासांनी अष्टांगयोगावर  भाष्य करताना नऊ प्रकारच्या कारणांचे उदाहरणांसहित स्पष्टीकरण केले आहे, जे योगसूत्रांमध्ये वर्णिलेले नाही. नऊ प्रकारची कारणे पुढीलप्रमाणे आहेत —  उत्पत्ति-कारण, स्थिति-कारण, अभिव्यक्ति-कारण, विकार-कारण, प्रत्यय-कारण, आप्ति-कारण, वियोग-कारण, अन्यत्व-कारण आणि धृति-कारण (२.२८).

असंप्रज्ञात समाधि : योगदर्शनात दोन प्रकारच्या समाधी सांगितलेल्या आहेत. संप्रज्ञात समाधीमध्ये चित्त एखाद्या विषयावर एकाग्र झाल्यावर त्या विषयाचे यथार्थ व संपूर्ण ज्ञान प्राप्त होते. चित्ताच्या सर्व वृत्ती निरुद्ध झाल्यावर कोणतेही ज्ञान प्राप्त होत नाही, ती अवस्था म्हणजे असंप्रज्ञात समाधी होय. पतंजलींनी सूत्रात ‘संप्रज्ञात’ हा शब्द वापरलेला आहे, परंतु त्यापेक्षा वेगळी अशी समाधी त्यांनी केवळ ‘अन्य’ या शब्दाने सूचित केली. त्याला त्यांनी कोणताही शब्द वापरला नाही. व्यासांनी त्या ‘अन्य’ अशा समाधीसाठी ‘असंप्रज्ञात’ शब्द वापरला (१.१८) व तो नंतरच्या सर्व टीकाकारांनी स्वीकारला.

चित्ताची एकाग्रता : महर्षि पतंजलींनी एकाग्रतेमध्ये येणारी विघ्ने दूर करण्यासाठी एक तत्त्वावर चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले आहे. ज्याप्रमाणे योगदर्शनात चित्त एकाग्र होण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत, त्याचप्रमाणे बौद्ध दर्शनामध्येही चित्ताच्या एकाग्रतेसाठी उपाय सांगितले आहेत. परंतु, बौद्ध दर्शनानुसार क्षणिकवादाचा सिद्धांत स्वीकारला असल्यामुळे योगी ज्या वस्तूवर चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करत असेल, ती वस्तूच क्षणिक असल्यामुळे एकाग्रता होऊच शकणार नाही. वस्तूवर एकाग्र होणारे चित्तही क्षणिक असल्यामुळे तेही दुसऱ्या क्षणी नष्ट होईल व एकाग्रता संभवणार नाही. म्हणून बौद्ध दर्शनात प्रतिपादन केलेला क्षणिकवाद आणि एकाग्रता साधण्याचे उपाय या दोन परस्परविरोधी गोष्टी असल्यामुळे त्यांचे खंडन करून योगातील एकाग्रतेचा अभ्यास व त्यातील उपाय हेच उपयुक्त आहेत याचे स्पष्ट प्रतिपादन व्यासांनी (१.३२) केले आहे.

काल : ‘काल’ या तत्त्वाविषयी सर्व भारतीय दर्शनांमध्ये विशेषत्त्वाने विचार करण्यात आलेला आहे. महर्षी पतंजलींनी योगसूत्रांमध्ये काळाची व्याख्या केलेली नाही, परंतु काही सूत्रांमध्ये त्यांनी कालवाचक शब्दांचा उल्लेख मात्र केलेला आहे. व्यासांनी या विषयावर मूलभूत आणि महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. व्यासभाष्यामध्ये (३.५२) काळाचे स्वरूप स्पष्ट करताना त्याचे यथार्थ आणि काल्पनिक असे दोन प्रकार केले आहेत. यथार्थ काल म्हणजे क्षण होय. ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाचे विभाजन करीत गेल्यास सर्वात सूक्ष्म अंश म्हणजे परमाणु होय, त्याचप्रमाणे काळाचे विभाजन करीत गेल्यास काळाचा जो सूक्ष्मतम अंश आहे, त्याला क्षण असे म्हणतात. अनेक क्षणांचा समूह / संघात असलेली व व्यवहारामध्ये काल मोजण्यासाठी वापरली जाणारी विविध परिमाणे म्हणजे काल्पनिक काल होय.

कर्मसिद्धांत : जीव आयुष्यात ज्या प्रकारची कर्मे करतो त्यांचे फळ त्याला भोगावे लागते, हा कर्मसिद्धांत चार्वाक वगळता सर्वच दर्शनांनी स्वीकारला आहे. पतंजलींनीही योगसूत्रांत याविषयी प्रतिपादन केले आहे. परंतु, व्यासांनी यावर भाष्य करताना अतिशय सखोल विवेचन केले आहे, जे अन्य कोणत्याही ग्रंथात मिळत नाही. जीवनात आपण अनेक प्रकारची कर्मे करतो. कोणत्या कर्माचे फळ लवकर मिळते, कोणत्या कर्माचे फळ उशिरा मिळते, एका कर्माचे एकच फळ मिळते की अनेक मिळतात, एखादे वाईट कर्म केल्यावरही त्याचे फळ टाळता येऊ शकते का अशा सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे व्यासांनी भाष्यात (२.१२, २.१३) दिलेली आहेत.

भुवनज्ञान : सूर्यतत्त्वावर संयम (धारणा, ध्यान आणि समाधी) केल्यामुळे योग्याला संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान होते, असे महर्षि पतंजलींनी सांगितले आहे. यावर भाष्य करताना व्यासांनी ब्रह्मांडाचे ज्ञान म्हणजे नक्की काय, ब्रह्मांडाची रचना, पृथ्वीचे स्थान व सप्तलोक यासारख्या अनेक संकल्पनांचे विवेचन केले आहे (३.२६).

चार प्रकारचे योगी : व्यासांनी प्रथमकल्पिक, मधुभूमिक, प्रज्ञाज्योति आणि अतिक्रान्तभावनीय अशा चार प्रकारच्या योग्यांचे वर्णन केले आहे (३.५१). जो चित्त एकाग्र होण्यासाठी प्रयत्न करतो आहे, तो योगी प्रथमकल्पिक होय. ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झालेला मधुभूमिक योगी होय. महाभूते आणि इंद्रिये यांवर नियंत्रण मिळविलेला प्रज्ञाज्योति योगी होय आणि कैवल्य प्राप्त केलेला अतिक्रान्तभावनीय योगी होय.

या काही विषयांव्यतिरिक्तही अनेक अन्य अनेक विषयांचे व्यासभाष्यामध्ये विवेचन केले गेले आहे, जे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्यासांनी अनेक ठिकाणी षष्टितंत्र  या ग्रंथातील वाक्ये उद्धृत केली आहेत. पंचाशिखाचार्य यांनी रचलेला हा ग्रंथ सांख्य-योग परंपरेत अतिशय महत्त्वाचा ग्रंथ होता, परंतु तो ग्रंथ आज उपलब्ध नाही. व्यासांनी क्वचित पुराणांमधील श्लोकही उद्धृत केले आहेत.

व्यासभाष्यावर विवेचन करण्याच्या हेतूने वाचस्पति मिश्रांनी तत्त्ववैशारदी, विज्ञानभिक्षूंनी योगवार्त्तिक, आचार्य शंकर यांनी विवरण, हरिहरानन्द आरण्य यांनी भास्वती अशा काही प्रमुख टीका लिहिल्या आहेत. अल्-बिरूनीने योगसूत्र आणि व्यासभाष्य यांचा अरबी भाषेतही व्याख्यापूरक अनुवाद केला आहे. व्यासभाष्याचा अभ्यास केल्याशिवाय योगसूत्रांचे संपूर्ण ज्ञान होऊ शकणार नाही, असा या अभ्यासकांचा अनुभव आहे. त्यामुळे योगदर्शनाच्या परंपरेत व्यासभाष्याचे योगदान महत्त्वाचे आहे.

पहा : असम्प्रज्ञात समाधि, चित्तभूमी (काल-योगदर्शनानुसार) , योगदर्शनानुसार कारणांचे नऊ प्रकार, योगसूत्रे.

                                                                                             समीक्षक : कला आचार्य