पिझारो, गाँथालो : (१५०६–१५४८). स्पॅनिश समन्वेषक व वसाहतकार. त्याचा जन्म स्पेनमधील त्रुहील्यो (Trujillo) येथे झाला. फ्रॅन्सिस्को (फ्रांथीस्को) पिझारो (१४७८–१५४१) या धाडसी समन्वेषकाचा हा सावत्रभाऊ. याच्या वडिलांचे नाव कॅप्टन गाँथालो, म्हणून यास गाँथालो (द्वितीय) म्हणून ओळखले जात होते. त्याचे वडील स्पेनच्या सैन्यात होते.
गाँथालोने १५३१ मध्ये फ्रॅन्सिस्कोबरोबर पेरूवरील मोहिमेत सैन्याचे नेतृत्व केले. या मोहिमेतील शौर्याबद्दल त्याची क्विटो (कीटो) येथील गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली (१५३३). तेव्हा क्विटोची जमीन म्हणजे दालचिनीची जमीन म्हणून ओळखली जात असे. काही काळातच त्याचे कुस्को या शहरात आगमन झाले. येथे त्याने आपले २०० शिपाई आणि १०० घोडेस्वार ठेवले. त्या काळी अमेरिकेतील ‘एल डोरॅडो’ च्या खोऱ्यात सोने असल्याची असल्याची अफवा पसरली होती. हे सोने शोधण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. गाँथालोसुद्धा या मोहिमेवर निघाला. त्यासाठी त्याने आपल्याबरोबर ६० हजार डकट्सचा (किमती नाणी) खजिना, ३५० धाडसी स्पॅनिश सैनिक, १५० सैनिकांचे घोडदळ आणि अंदाजे ४००० स्थानिक अमेरिकन इंडियन लोक, हत्यारे, डुकरे, उंटासारखे लामा नावाचे प्राणी यांसारख्या गोष्टी घेतल्या. १५३९ मधील ख्रिसमसच्या दिवशी ‘एल डोरॅडो’ च्या खोऱ्याकडे म्हणजे सध्याच्या एक्वादोरमधील क्विटो येथून प्रवास तो करत निघाला. वाटेत एका मुक्कामावर झालेल्या भूकंपामध्ये त्याचे काही घोडे मेले. पुढे ४०-५० दिवसांचा प्रवास करत ते अँडीज पर्वतरांगेजवळ आले, तेव्हा तेथील गोठवणाऱ्या थंडीत काही अमेरिकन इंडियन मरण पावले.
अखेर गाँथालोने पेरूला परत फिरण्याचा निर्णय घेतला. बर्फाच्छादित अँडीज पर्वतरांग ओलांडून तो विषुववृत्तीय घनदाट जंगलात शिरला. या धाडसी सफरीत त्याचे व त्याच्या सैनिकांचे खूप हाल झाले. जवळपास सर्व प्रवास त्याने खाऱ्या पाण्याची सरोवरे, दलदल आणि सोबतची आजारी माणसे घेऊन केला. या परतीच्या प्रवासात त्याच्या ताफ्यातील ४०० अमेरिकन इंडियन आणि २१० स्पॅनिश लोक मृत्यू पावले. सु. ५००० किमी.चा प्रवास करून ही मोहीम क्विटो येथे जून १५४२ मध्ये परतली; तेव्हा गाँथालोसोबत हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी माणसे शिल्लक राहिली होती. या मोहिमेला त्याला दोन वर्षे लागली. गाँथालोला ‘एल डोरॅडो’चा शोध लागला नाही; परंतु एका नदीचा मात्र शोध लागला. या प्रवासात त्याला काही अमेरिकन इंडियन स्त्रियांनी तुटपुंज्या शस्त्रांसह प्रखर प्रतिकार केला. या घटनेवरून ग्रीक पुराणकथांच्या आधारे गाँथालोने या नदीला ‘ॲमेझॉनʼ असे नाव दिले, असे मानतात.
क्विटो येथे परतल्यानंतर गाँथालोला त्याच्या भावाची हत्या झाल्याचे कळले. स्पेनच्या राजाने दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश लढवय्यांचे विशेष हक्क काढून घेण्याचे नवे धोरण अंमलात आणले. या धोरणाला विरोध करून उठावाचे नेतृत्व गाँथालोने केले आणि व्हॉइसरॉय ब्लास्को नुनेझ व्हेला याचा पराभव करून त्याला ठार मारले (१५४६). त्यानंतर पेद्रो दे ला गास्का हा नवीन व्हॉइसरॉय आला. त्याने आपल्या पूर्वसूरीचे धोरण बदलून स्थानिक लोकांना अनेक सवलती दिल्या, जुने कायदे रद्द करून बंडखोरांना माफी जाहीर केली. त्यामुळे गाँथालोचे बरेचसे सैनिक ऐन लढाईच्या वेळी त्याला सोडून निघून गेले. मग व्हॉइसरॉयने एकाकी पडलेल्या गाँथालोला पकडून कुस्को, पेरू येथे त्याला फाशी देण्यात आले.
संदर्भ :
- Markham, Clements R. Expeditions into the Valley of The Amazons, Hakluyt Society, London, 2010.
- जोगळेकर, प्रमोद, ‘स्पॅनिश साम्राज्यविस्तारासाठी धडपडणारा प्रवासी : गोंझालो पिझारोʼ, यांनी घडवलं सहस्रक, रोहन प्रकाशन, पुणे, २००३.
- https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110810105622110
- https://www.encyclopedia.com/people/history/explorers-travelers-and-conquerors-biographies/gonzalo-pizarro
समीक्षक : प्रमोद जोगळेकर