शमी (प्रोसोपिस सिनेरॅरिया) : (१) वृक्ष, (२) पाने, (३) शेंगा.

(खेजरी ट्री). साधारणपणे बाभळी किंवा खैरासारखा दिसणारा एक सदाहरित वृक्ष. शमी हा वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचा समावेश प्रोसोपिस प्रजातीत केला जातो. प्रोसोपिस प्रजातीत सु. ४५ जाती असून भारतात त्यांपैकी फक्त तीन जाती आढळतात. त्यांपैकी प्रोसोपिस सिनेरॅरिया ही जाती प्राचीन काळापासून भारतात माहीत आहे. प्रोसोपिस स्पायसिजेरा  अशा नावानेही ती ओळखली जाते. हा वृक्ष भारतातील उष्ण व रूक्ष प्रदेशात आढळत असून राजस्थानात तो मोठ्या संख्येने दिसतो. तेथे त्याला ‘खेजडी’ असे म्हणतात. अन्य दोन जाती प्रो. जुलिफ्लोरा  व प्रो. ग्लँडुलोजा  या अमेरिकेतून आणून त्यांची भारतात रुक्ष प्रदेशात लागवड केली आहे.

पूर्ण वाढलेला शमीचा वृक्ष १०—१५ मी. उंच व मजबूत असतो. सुरुवातीला वाढ मंद असल्याने बऱ्याच ठिकाणी त्याचे लहान वृक्ष दिसून येतात. ३० वर्षांत त्याचा घेर सु. ८० सेंमी. होतो. मुळे खोलवर, तसेच लांब अंतरापर्यंत आडवी पसरलेली असल्यामुळे पाया भक्कम असतो आणि त्यांद्वारे तो जमिनीतले पाणी शोषून घेतो. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात वाळूचे ढिगारे स्थिर ठेवण्यात शमी उपयुक्त ठरतो.

साधारणपणे हा वृक्ष सु. १२ मी. उंच वाढतो. तो काटेरी असून खोडाचा घेर सु. १.२ मी. असतो. खोडाची साल करडी, काळपट रंगाची, खडबडीत व भेगाळलेली असते. फांद्यांवर व डहाळ्यांवर लहान, विरळ व टोकदार काटे असतात. पाने संयुक्त, दोनदा विभागलेली व पिसांसारखी असून दलांच्या दोन जोड्या व प्रत्येक दलावर ७–११ दलकांच्या जोड्या असतात. फांद्यांच्या टोकांना तसेच पानांच्या बगलेत डिसेंबर ते मार्च महिन्यांत लहान व लांबट फुलोरे येतात. त्यावर असंख्य लहान, पिवळी व मंद सुंगध असलेली फुले असतात. फुले बारीक असून निदलपुंज व दलपुंज प्रत्येकी ५ असतात आणि ते संयुक्त असतात. फळ साधे, शिंबावंत असून रंगाने पिवळे असते. शेंग १०–१५ सेंमी. लांब, चपटी, वाकडी व दंडगोलाकार असते. शेंगांमध्ये १०–१५ लंबगोल, तपकिरी, चपट्या व जाड सालीच्या बिया असतात.

शमीचे लाकूड घरबांधणी, शेतीची अवजारे, ‍होड्या, फर्निचर, हातगाड्या यांसाठी वापरतात. कोवळी पाने व शेंगा जनावरांना चारा म्हणून देतात. खोडावरील सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी करतात. त्याच्या खोडापासून डिंकदेखील मिळतो. फुले व फळे यांत औषधी गुणधर्म असून सूज, श्वसनविकार यांवर ती गुणकारी आहेत. सालीपासून तयार केलेली आयुर्वेदिक औषधे दमा, कोड, कुष्ठरोग यांवर वापरतात. राजस्थान व तेलंगणा या राज्यांचा शमी हा राज्यवृक्ष आहे.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.