(इंडियन कर्सर). क्षिप्रचला हा पक्षी कॅरॅड्रिफॉर्मिस पक्षिगणाच्या ग्लेरिओलिडी कुलातील असून याचा आढळ भारत, पाकिस्तान, श्रीलंका या देशांत तसेच आफ्रिका खंडातील अनेक देशांत दिसून येतो. भारतात तो हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेपर्यंत बहुतकरून आढळतो. पश्चिमेला तो सिंधपर्यंत दिसून येतो; मात्र पश्चिम व वायव्य पंजाब येथे क्वचितच दिसतो.

क्षिप्रचलाच्या दोन प्रजाती आणि नऊ जाती आहेत. नऊ जाती पुढीलप्रमाणे : भारतीय क्ष‍िप्रचला (कर्सोरियस कोरोमंडेलिकस ), पिवळसर पांढऱ्या रंगाचा क्षिप्रचला (. कर्सर ), सोमाली क्षिप्रचला (. सोमालेन्सिस ), टेमिंक्स क्षिप्रचला (. टेम्मिंक्की ), बर्शेल्स क्षिप्रचला (. रुफस ), दुहेरी पट्ट्यांचा क्षिप्रचला (ऱ्हिनोप्ट‍िलस / स्मटसॉर्निस आफ्रिकन्स ), तिहेरी पट्ट्यांचा किंवा ह्युग्लिन क्षिप्रचला (ऱ्हि. सिंक्टस ), तांबेरी पंखांचा क्षिप्रचला (ऱ्हि. कॅल्कोप्टेरस ) आणि जर्डन्स क्षिप्रचला (ऱ्हि. बिटॉरक्वॅटस ). आफ्रिकेत आढळणाऱ्या ऱ्हि. कॅल्कोप्टेरस  या जातीची लांबी सु. ३० सेंमी. असून तो निशाचर आहे. जर्डन्स क्षिप्रचला ही जाती इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या संस्थेने गंभीर धोक्यातील जाती म्हणून घोषित केली आहे. भारतात क्षिप्रचलाच्या . कर्सर, . कोरोमंडेलिकस, ऱ्हि. बिटॉरक्वॅटस  या तीन जाती आढळतात. पुढील वर्णन . कोरोमंडेलिकस  या जातीचे आहे.

भारतीय क्षिप्रचला (कर्सोरियस कोरोमंडेलिकस )

भारतीय क्षिप्रचलाची लांबी सु. २० सेंमी. व उंची सु. ३० सेंमी. इतकी असून वजन १३० –१५८ ग्रॅ. इतके असते. नर आणि मादी सारखेच दिसतात. डोक्याचा माथा तांबूस पिंगट असून चोचीपासून निघालेले आणि डोळ्यांवरून गेलेले लांब, काळे पट्टे मानेच्या मागे एकत्र येतात. काळ्या पट्ट्यांच्या वर त्याच दिशेत पांढरा पट्टा असतो. शरीराच्या दोन्ही कडांवर खाली सर्वत्र पट्टा दिसतो. गळपट्टी मध्यम नारिंगी रंगाची असते. पाठीकडचा पिसारा करडा तपकिरी असतो; पिसे काळी असून अगदी आतील पिसे करडी असतात आणि पाठीचा रंग पांढरा होत गेलेला असतो. शेपटीच्या तळाशी पांढरा पट्टा असून शेपटीची मधली पिसे तपकिरी, तळाशी करडी तपकिरी, नंतर काळी व टोकाला पांढरी असतात. चोच काळी, बारीक, टोकदार असून टोकाला वाकडी असते. चोचीच्या खालचा भाग पांढरा असून मान व छाती पिवळसर गुलाबी ते मध्यम नारिंगी असते. छातीचा खालचा भाग आणि पोटाच्या वरच्या भागातील काळा पट्टा यांची छटा तांबूस पिंगट रंगासारखी झालेली दिसते. पाय लांब, भुरकट पांढरे असून प्रत्येक पायाला तीन नख्या असतात. सर्व नख्या पुढील बाजूस असल्याने त्याला उघड्या मोकळ्या जमिनीवर वेगाने धावता येते, म्हणून त्याला क्षिप्रचला हे नाव पडले आहे. तसेच त्याला ‘धाविक’ असेही म्हणतात.

क्षिप्रचला हा पक्षी ओसाड, उघड्या, कमी-अधिक उजाड व मध्यम बागायती टापूंत राहतो. जेथील गवत त्याच्या उंचीपेक्षा कमी आहे, अशा जमिनीवर तो आढळतो. सामान्यपणे हा पक्षी लहानलहान थव्याने वावरतो. याला बुजविला असता तो विशिष्ट आवाज करीत उंच भरारी घेतो. त्यावेळी पंख अगदी टोकदार दिसतात. अशा वेळी त्याची भरारी जोरकस आणि सरळ असून तेव्हा पंखांची फडफड वेगाने होते; थोड्या अंतराची भरारी मारून तो जमिनीवर येतो आणि उतरल्यावर काही अंतर वेगाने धावतो. जेव्हा त्याला धोका जाणवतो तेव्हा तो फार उंच, जोरात व वेगाने उडतो. अशा वेळी बहिरी ससाणाही त्याला पकडू शकत नाही.

कोरड्या जमिनीवरील लहान, काळे भुंगे (मुद्गल) हे क्षिप्रचलाचे मुख्य अन्न असून टोळ, मुंग्या, सुरवंट, इतर अळ्या व लहान मृदुकाय प्राणीही तो खातो. मार्च–ऑगस्ट हा याचा विणीचा हंगाम असून या काळात नर-मादी जोडीने वावरतात. जमिनीवर, उजाड सपाट प्रदेशात, गवताच्या झुपक्याखाली, वेड्यावाकड्या झुडपाखाली साधा खळगा असे त्यांचे घरटे असते. मादी २ किंवा ३ गोलाकार, २५ ते ३० मिमी. व्यासाची अंडी घालते. उबवण कालावधी १५-१६ दिवसांचा असतो. अंडी पांढरी ते फिकट पिवळसर रंगाची असून त्यावर तपकिरी, काळ्या व गर्द हिरव्या रंगाच्या रेषा, चट्टे असतात. आठवडाभर नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात. त्यानंतर पिले स्वतंत्र वावरतात. नैसर्गिक अधिवासात क्षिप्रचला पक्षी सर्वसाधारणपणे ६-७ वर्षे जगतो.