गुजरातमधील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. गोघा हे प्राचीन बंदर असून ते खंबातच्या आखाताच्या किनाऱ्यावर सध्याच्या भावनगर बंदरापासून १५ किमी. अंतरावर आहे. इ. स. पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी (Periplus Maris Erithrei) या पुस्तकात खंबातच्या आखाताचा आणि सु. १० किमी. अंतरावरील पिरम बेटाचा उल्लेख असला, तरी बंदराचा थेट उल्लेख आढळत नाही.

घोघा येथे मिळालेले नांगर, गुजरात.

घोघा बंदराबद्दलची पहिली नोंद मैत्रक घराण्याच्या कारकिर्दीतील (इ. स. ४८०–७२०) आहे. या ठिकाणी उत्तम दर्यावर्दी लोक आहेत आणि येथे अन्नपाणी घेण्यासाठी जहाजे थांबतात, असे नमूद केलेले आहे. ऐतिहासिक माहितीनुसार अरबांनी येथे इ. स. ६३६ मध्ये आपले ठाणे उभारले होते. घोघा येथील अरबी भाषेतील पहिला अभिलेख इ. स. ११७० मधील आहे. ब्रिटिश काळात एकोणिसाव्या शतकात येथे १५०० टन एवढ्या वजनाची जहाजे येत असल्याची नोंद आहे.

घोघा येथे मिळालेली झिलईदार भांडी, गुजरात.

गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानामधील पुरातत्त्वज्ञ अनिरूद्धसिंग गौर यांनी घोघा व आजूबाजूच्या प्रदेशात २००५ मध्ये पुरातत्त्वीय सर्वेक्षण केले. त्यांना घोघा येथे दोन डझन दगडी नांगर भरती-ओहोटीच्या क्षेत्रात आढळून आले. काही नांगर अर्धवट बनवलेल्या अवस्थेत होते. बहुधा हे नांगर घोघा येथे तयार केले जात असावेत. असेच नांगर त्यांना त्याच किनाऱ्यावरील हतब या प्रारंभिक ऐतिहासिक बंदराजवळ मिळाले होते. घोघा किनाऱ्यावर मिळालेला एक नांगर चीनजवळच्या समुद्रात मिळालेल्या नांगरासारखा होता. या नांगरांच्या आसपास मध्ययुगीन निळी, हिरवी आणि तपकिरी रंगाची झिलईदार खापरे आढळली.

 

संदर्भ :

  • Gaur, A. S.; Sundaresh & Tripati, Sila, ‘Marine Archaeological Investigations along the Saurashtra Coast, West Coast of Indiaʼ, Journal of the Asiatic Society of Bangladesh, 50:159-195, 2005.
  • Gaur, A. S. ‘Ghogha: an Indo-Arabian Trading Post in the Gulf of Khambhat (Cambay), Indiaʼ, The International Journal of Nautical Archaeology, 39(1) : 146-155, 2010.

                                                                                                                                                                                     समीक्षक : श्रीनंद बापट