(इंडियन स्नेकरूट; राऊवोल्फिया सर्पेंटिना). बहुवर्षायू औषधी वनस्पती. सर्पगंधा ही ॲपोसायनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव राऊवोल्फिया सर्पेंटिना आहे. सदाफुली ही वनस्पती याच कुलातील आहे. राऊवोल्फिया हे प्रजाती-दर्शक नाव लेओनार्ट राऊवोल्फ या सोळाव्या शतकातील जर्मन वनस्पतितज्ज्ञ यांच्या आदरार्थ दिले गेले आहे; सर्पेंटिना हे जाती-दर्शक नाव सर्पगंधा या संस्कृत नावावरून घेतलेले आहे. या प्रजातीतील सर्व वनस्पती लहान वृक्ष किंवा झुडपे असून चिकाळ आणि कमी-जास्त प्रमाणात औषधी आहेत. आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका येथील उष्ण प्रदेशांत या प्रजातीतील वनस्पती आढळतात. सर्पगंधा मूळची भारत आणि पूर्व आशिया (भारत ते इंडोनेशिया) येथील असून भारतात तिच्या सात जाती आढळून येतात. भारतात हिमालयाच्या प्रदेशांत समुद्रसपाटीपासून सु. १,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांत, पूर्व तसेच पश्चिम घाटांत आणि अंदमान बेटांत तिचा प्रसार झालेला दिसून येतो. बहुधा ती साल, वड, पिंपळ, ऐन, शिसवी, आंबा इत्यादींच्या सावलीत दिसून येते.
सर्पगंधा हे सरळ वाढणारे लहान झुडूप सु. १५–४५ सेंमी. उंच वाढते. मुख्य मूळ मांसल, नरम व कधीकधी अनियमितपणे गाठाळ असते. खोडाची साल फिकट तपकिरी, त्वक्षायुक्त (बुच) व भेगाळ असते. पाने साधी, मोठी, प्रत्येक पेऱ्यावर तीनच्या झुबक्यात येतात; ती दीर्घवृत्ताकृती, भाल्यासारखी किंवा व्यस्त अंडाकृती, टोकदार किंवा लांबट टोकांची, वरच्या बाजूस गर्द हिरवी, तर खाली फिकट हिरवी असतात. फुले पांढरी किंवा लालसर, १.५ सेंमी. लांब, अनेक व वल्ली प्रकारच्या फुलोऱ्यात मार्च–मे महिन्यात येतात. फुलातील निदलपुंज व देठ लालभडक असतात; दलपुंज नलिकाकृती, तळाजवळ अरुंद आणि वर फुगीर असतो. फळाचे दोन भाग असतात; प्रत्येक भाग एकबीजी बाठायुक्त असतो. आख्खे फळ लंबगोल व तिरपे, ०.६ सेंमी. व्यासाचे, जांभळट काळे असते. बिया बारीक, अंडाकृती व भ्रूणपोषी असतात.
सर्पगंधेच्या सुकलेल्या मुळांना राऊवोल्फिया हे व्यापारी नाव आहे. ही मुळे कडू, उष्ण आणि कृमिनाशक असून त्यांना वास नसतो. ती काहीशी वेडीवाकडी, सुरकुतलेली, खरबरीत असून त्यांवर उभ्या रेषा असतात; त्यांवरची साल फिकट पिवळी ते तपकिरी असते. भारतात प्राचीन काळापासून सु. ४,००० वर्षांपूर्वीपासून राऊवोल्फियाचा वापर होत आलेला आहे. चरक कल्पम या आयुर्वेदिक ग्रंथात सर्पगंधाचा उल्लेख आहे. राऊवोल्फियामध्ये रेसर्पीन हे अल्कलॉइड असते. चेतासंस्थेच्या विविध तक्रारींवर त्याचा वापर केला जातो. उदा., चिंता, क्षोभ, निद्रानाश, उच्च रक्तदाब, छिन्नमनस्कता इत्यादी. तसेच राऊवोल्फियाच्या अर्काचा वापर पटकी, अतिसार, आमांश यांसारख्या आतड्याच्या विकारांवर करतात; मात्र दमा, श्वासनलिकेचे विकार, अल्सर यांवर करीत नाहीत. राऊवोल्फियात सु. २०० अल्कलॉइडे आढळून आली आहेत. भिन्न ठिकाणी वाढविलेल्या राऊवोल्फियाच्या मुळांमध्ये अल्कलॉइडांचे प्रकार आणि प्रमाण वेगवेगळे असते.