(बॅब्लर). पक्षिवर्गातील पॅसेरिफॉर्मिस गणाच्या लाओथ्रोसिडी कुलातील पक्ष्यांना सातभाई म्हणतात. हे पक्षी नेहमीच सहा-सातच्या समूहाने राहतात. म्हणून त्यांना ‘सातभाई’ हे नाव पडले आहे. भारतात सातभाई पक्ष्याच्या सात जाती आढळून येतात; छोटा सातभाई, बडा सातभाई, मोठा राखाडी सातभाई, लालसर-तपकिरी सातभाई, पट्टेरी सातभाई, निमुळत्या चोचीचा सातभाई, पिवळ्या चोचीचा सातभाई.
सातभाई भारतात सर्वत्र आढळतात. सामान्यपणे हे पक्षी मध्यम आकाराचे, फिकट तपकिरी रंगाचे असतात. कोरड्या मैदानी प्रदेशात तसेच खुरट्या गवताच्या प्रदेशात ते वावरतात; समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीहून वर व दाट वनांमध्ये ते आढळत नाहीत. ते खूप कलकलाट करतात आणि झाडाझुडपांच्या खाली जमिनीवरील माती, पालापाचोळा सतत विस्कटून अन्न शोधत असतात. यावेळी काही सातभाई झुडपांच्या शेंड्यावर बसून कोणी येत नाही, याची टेहळणी करतात. शत्रूची चाहूल लागताच ते जवळच्या झुडपात/गवतात लपून बसतात. जमिनीवर वावरताना, बहुधा शेपटी उभी करून ते वावरतात. कीटक, लहान फळे हे त्यांचे मुख्य अन्न आहे. एका ठिकाणी अन्न टिपून झाल्यानंतर एकामागून एक असे समूहातील सर्वजण उडून दुसऱ्या जागी जातात. त्यांना फार लांब उडता येत नाही. उडताना ते जोराने पंखांची फडफड करतात व थोडे दूर जातात. नंतर पंख पसरून हवेतून संथपणे तरंगत जातात.
सातभाई पक्ष्याचा विणीचा हंगाम मार्च–मे आणि जुलै–सप्टेंबर असा वर्षातून दोनदा असतो. त्यांच्या एका समूहात एका वेळी काही जोड्या प्रजनन करताना आढळतात. या काळात काही प्रौढ सातभाई समूहातील अन्य प्रौढ पक्ष्यांची मानेवरची, डोक्यावरची पिसे नीट करताना दिसतात. घरटे काटेरी झुडपात किंवा दाट गवतात, सहसा कोणाला दिसणार नाही, अशा जागी बांधतात. घरटे वाटीच्या आकाराचे असून मुळ्या, काड्या यांच्यापासून ते बनलेले असते. मादी एकावेळी २-३ फिकट निळ्या रंगाची अंडी घालते. १३–१५ दिवसांत अंडी उबतात. अंडी उबवणे, पिलांना खाऊ घालणे इ. कामे नर व मादी करतात. पिले एका आठवड्यात उडू लागली, तरी ती समूहाबरोबर राहतात. काही वेळा समूहातील इतर पिले जन्मलेल्या पिलांची व त्यांच्या आईची काळजी घेतात. चातक आणि पावशा यांसारखे पक्षी सातभाईच्या घरट्यात अंडी घालतात.
(१) छोटा सातभाई : (टरडॉयडीस कॉडेटस; कॉमन बॅब्लर). याच्या शरीराची लांबी सु. २३ सेंमी. असते. वरची बाजू फिकट तपकिरी असून पाठीवर गर्द तपकिरी रंगाच्या रेषा असतात. खालची बाजू पिवळी, तकतकीत असते. शेपटी लांब, हिरवट–तपकिरी रंगाची आणि निमुळती असते. डोळे पिवळ्या रंगाचे, चोच फिकट तपकिरी आणि पाय हिरवट–पिवळे असतात. नर आणि मादी सारखेच दिसतात.
(२) बडा सातभाई : (टरडॉयडीस स्ट्रायटस; जंगल बॅब्लर). याच्या शरीराची लांबी सु. २५ सेंमी. असते. रंग मातकट तपकिरी असतो. शरीरावर आणि गळ्यावर हलक्या रेषा असतात. पोटाकडील बाजू फिकट पिवळसर असते. चोच फिकट पिवळी असते. बुबुळे पांढरी असून डोळ्यांभोवती पिवळी वलये असतात. शेपटी लांब असते. अन्न शोधताना त्यांचा एकसारखा कर्कश आवाज चालू असतो. ते एकमेकांशी लढतात, एकमेकांचा पाठलाग करतात. लहान थव्यांमध्ये ते सहकारी वृत्तीने एकत्र राहतात. काही वेळा मतभेद झाल्यावर त्यांच्यात झुंज होते. यावेळी ते एकमेकांवर चोच, नखे यांच्याद्वारे हल्ला करतात. दिलजमाई झाल्यावर पुन्हा सर्व व्यवहार सुरळीत होतात. दुसऱ्या एखाद्या पक्ष्याने हल्ला केल्यास ते सर्व एकत्र येऊन त्या पक्ष्याला हाकलून देतात किंवा काही वेळा निपचित पडून मेल्याचे सोंग घेतात. बंदिवासात त्याचे आयुर्मान सु. १७ वर्षे आढळून आले आहे.
(३) मोठा राखाडी सातभाई : (टरडॉयडीस माल्कोमी; लार्ज ग्रे बॅब्लर). हा पक्षी राखाडी तपकिरी रंगाचा असतो. भारत आणि नेपाळ या देशांमध्ये हा पक्षी दिसून येतो. त्याने घातलेली अनुनासिक शीळ आणि शेपटी पसरल्यावर दिसणारी पिसे यांवरून हा पक्षी ओळखता येतो.
(४) लालसर तपकिरी सातभाई : (टरडॉयडीस सुब्रुफा; रुफस बॅब्लर). हा पक्षी भारतातील दक्षिण भागाच्या पश्चिम घाटात आढळतो. शरीराची लांबी सु. २५ सेंमी. असते. शेपटी सु. ११ सेंमी. लांब असते. शरीराचा रंग लालसर तपकिरी असतो. ‘ट्रीं, ट्रीं’ अशी मोठ्या आवाजात तो शीळ घालतो. विणीचा हंगाम फेब्रुवारी–नोव्हेंबर असून मादी एका वेळी २–४ गडद निळ्या रंगाची अंडी घालते.
(५) रेखीत/पट्टेरी सातभाई : (टरडॉयडीस अर्लाई; स्ट्राएटेड बॅब्लर). पाकिस्तान ते म्यानमार यांच्या दरम्यान असलेल्या पट्ट्यांत हा पक्षी आढळतो. छोटा सातभाईपेक्षा याची शेपटी लहान असते. शरीर प्रमाणबद्ध असल्याने व बुबुळे पिवळी असल्याने सर्व सातभाई पक्ष्यांमध्ये हा वेगळा दिसतो.
(६) निमुळत्या चोचीचा सातभाई : (टरडॉयडीस लाँगिरॉस्ट्रिस; स्लेन्डर बिल्ड बॅब्लर). हा पक्षी भारताखेरीज बांगला देश, नेपाळ, म्यानमार या देशांत आढळतो. निमुळते शरीर, काळी चोच आणि कसल्याही खुणा नसलेला पिसारा या शरीरवैशिष्ट्यांमुळे सर्व सातभाईंमध्ये त्याचे वेगळेपण दिसून येते.
(७) पिवळ्या चोचीचा सातभाई : (टरडॉयडीस अफिनिस; यलो बिल्ड बॅब्लर). हा पक्षी भारत आणि श्रीलंका येथे आढळतो. बऱ्याचदा पिवळ्या चोचीचा सातभाई आणि बडा सातभाई सारखेच दिसतात; परंतु पिवळ्या चोचीचा सातभाईच्या माथ्यावरील भाग पांढरा, डोळे निळसर पांढरे, पंखांचा रंग फिकट आणि शेपटी तसेच पार्श्वभाग राखाडी असून शेपटीचे टोक राखाडी असते.