सब्जा (ऑसिमम बॅसिलिकम) : (१) रोपटे, (२) फुले, (३) फळे.

(कॉमन बेसिल). फुलझाडांपैकी एक सुगंधी वनस्पती. सब्जा ही वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑसिमम बॅसिलिकम आहे. तुळस, कापूर इ. वनस्पतीही याच कुलात येतात. ऑसिमम प्रजातीत सु. १५० जाती असून भारतात ५ जाती आढळतात. या वनस्पतीचे खोड, पाने व देठ यांचा रंग, केसाळपणा, उंची, वाढ यांनुसार अनेक प्रकार केले जातात. ती मूळची मध्य आशिया, दक्षिण आशिया आणि ईशान्य आशिया येथील असून भारतातील पंजाब व वायव्य भारत ही तिची मूलस्थाने आहेत, तसेच केरळ, कानपूर, दिल्ली, गाझीपूर, जम्मू व महाराष्ट्र इ. ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात लागवडीत आहे.

सब्जा वनस्पतीचे रोपटे लहान व नाजूक असून ते ३०–९० सेंमी. उंच वाढते. रोपाला अनेक शाखा असतात. पाने साधी, समोरासमोर, टोकाला निमुळती, दातेरी किंवा अखंड व ग्रंथियुक्त असतात. फुले सहपत्री, लहान, पांढरी किंवा फिकट जांभळी असून ती शाखांच्या टोकाला कणिश फुलोऱ्यात येतात. फळे दृढफलिका प्रकारची, लहान, शुष्क, खाच असलेली व काळी असतात.

सब्जा वनस्पतीच्या १०० ग्रॅ. सेवनापासून २.६ ग्रॅ. कर्बोदके, ३ ग्रॅ. प्रथिने, ९२ ग्रॅ. पाणी मिळते. पानांमध्ये -समूह जीवनसत्त्वे, आणि के जीवनसत्त्वे तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे असतात.

सब्जाला साधारणपणे लवंगेसारखा वास व काहीशी खारट चव असते. त्यापासून ‘ऑइल ऑफ बेसिल’ हे सुगंधी व बाष्पनशील तेल मिळते. त्याचा उपयोग पदार्थांना स्वाद येण्यासाठी तसेच अत्तरासाठी करतात. बेसिल तेल कीटकांना दूर ठेवते आणि त्यांचा नाश करते. त्यामुळे घरात माश्यांचा, डासांचा उपद्रव कमी करायला उपयुक्त असते. सब्जाच्या निरनिराळ्या प्रकारांपासून मिळणाऱ्या तेलाचा वेगवेगळा वास असतो. या तेलात लिनॅलूल व मेथिल शॅविकॉल हे घटक मोठ्या आणि वेगवेगळ्या प्रमाणात असून यूकॅलिप्टॉल, यूजेनॉल, मिर्सीन इत्यादी घटक वेगवेगळ्या प्रमाणात असतात.

आयुर्वेद आणि युनानी या उपचार पद्धतीनुसार सब्जाच्या बिया शामक, उत्तेजक, मूत्रल, शीतल असून मूळव्याध, बद्धकोष्ठता या विकारांवर देतात. त्यांचे पोटीस व्रणावर लावतात. पाण्यात भिजवल्या असता सब्जाच्या बिया बुळबुळीत होतात. भिजवलेल्या बिया उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून सरबत, फालुदा, मिल्क शेक अशा शीतपेयांमध्ये मिसळतात. ही वनस्पती जगभर स्वयंपाकात वापरली जाते. तिच्या पानांबरोबर फुलांच्या कळ्याही खातात.