एका विशिष्ट गुंतवणुकीमुळे त्या उत्पादनापासून मागील अवस्थांमधील उत्पादनांना मिळणाऱ्या प्रेरणेला पश्चानुबंधन असे म्हणतात. अर्थशास्त्रीय अभ्यासात प्रामुख्याने वस्तू व सेवांचे उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, उत्पादन रचना, वितरण, विनिमय, उपभोग आणि उपभोग रचना यांवर लक्ष केंद्रित केले जाते. अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासासाठी कृषी, उद्योग आणि सेवा या क्षेत्रांत खाजगी व सार्वजनिक गुंतवणूक केली जाते. या गुंतवणुकीतून उत्पादन, रोजगार व उत्पन्नाला गती मिळून पर्यायाने पुरवठा आणि मागणीला प्रेरणा मिळते. या प्रेरणादायी विविधांगी घटकांमध्ये एक दुवा असतो. हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेली असतात. एखादी उत्पादनसंस्था अथवा उद्योग तो तयार करीत असलेल्या उत्पादनासाठी आवश्यक असणारी विविध आदाने स्वस्त आणि सुलभतेने उपलब्ध व्हावीत याकरिता या आदानांचा पुरवठा करणाऱ्या संस्थांशी आणि आपल्या उत्पादनाची मागणी करणाऱ्या संस्थांशी नियमित संबंध प्रस्थापित करीत असतात, याला अनुबंधन असे म्हणतात.

अनुबंधनाची संकल्पना सर्वप्रथम ॲल्फ्रेड हर्श्चमन यांनी असंतुलित वृद्धी सिद्धांतात मांडली. त्यांनी असंतुलित विकास तंत्राविषयी अध्ययन केले. त्यांच्या मते, अविकसित अर्थव्यवस्थेतील भांडवल न्यूनतेमुळे अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांत एकाच वेळी एकदम गुतंवणूक करणे अशक्य आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना अनेक उद्योगांपैकी निवडक उद्योगांची निवड करावी लागेल व अन्य उद्योगांतील गुंतवणूक पुढे ढकलावी लागेल. उद्योगांची निवड करताना त्या त्या उद्योगांकडून केली जाणारी आदानांची मागणी आणि प्रदानांचा पुरवठा या अनुषंगाने उपलब्ध अनुबंधनाची मदत होते. विभिन्न क्षेत्रांत जाणीवपूर्वक असमतोल निर्माण करून उपलब्ध होणाऱ्या अनुबंधनातून आर्थिक विकास साध्य करणे शक्य आहे.

अनुबंधनाचे पश्चानुबंधन आणि पुरोनुबंधन (फॉर्वर्ड लिंकेज) असे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. पश्चानुबंधन आणि पुरोनुबंधन हे ग्राहक आणि उद्योग यांमधील आर्थिक संबंध दर्शवितात. एखाद्या उद्योगाच्या उत्पादनासाठी लागणारी विविध आदाने खरेदी करण्याची प्रक्रिया पश्चानुबंधनात समाविष्ट होते. ही प्रक्रिया त्या उद्योगाला आदानांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांशी थेट संबंधित असते. म्हणजेच एखादा उद्योग इतरांकडून ज्या वस्तूंची खरेदी किंवा मागणी करतो त्यास त्या उद्योगाचा पश्चानुबंधन असे संबोधितात. उदा., मोठ्या स्वरूपाच्या वाहन उद्योगाच्या स्थापनेमुळे त्या वाहनासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन तयार करणाऱ्या इतर लहान उद्योगांना प्रेरणा मिळते. कापड उद्योगाच्या स्थापनेमुळे कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग (उदा., सूत गिरणी इत्यादी) व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते. अन्नप्रक्रिया उद्योगांच्या स्थापनेमुळे शेतकरी, स्वयंसहायता बचत गटांना प्रेरणा मिळते. थोडक्यात, मोठ्या उद्योगांच्या स्थापनेमुळे त्यांना लागणाऱ्या आदानांच्या निर्मितीला चालना मिळते आणि आदानप्रेरित बाजारपेठांचा विस्तार होतो. मोठ्या उद्योगांची प्रगती ही तो उद्योग ज्या आदानांच्या व सुविधांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो, त्या घटकांना मिळणारी प्रेरणा ठरते. ही प्रेरणा मोठ्या उद्योगातील गुंतवणुकीचे पश्चानुबंधन समजले जाते.

पश्चानुबंधन हे त्या प्रदेशातील अस्तित्वात असलेल्या इतर दुय्यम उद्योगांकडून मुख्य उद्योगाने केलेल्या आदानांच्या मागणीशी संबंधित आहे. या मागणीसंबधीचे नाते नियोजन आणि उद्योगाच्या परिप्रेक्ष्यातून महत्त्वपूर्ण असते. नियोजकाच्या परिप्रेक्ष्यातून नूतन उद्योगाचा स्थानिक अर्थव्यवस्थेतील प्रभाव पश्चानुबंधनाच्या आकारमानावर निर्भर असतो, तर उद्योगाच्या परिप्रेक्ष्यातून अस्तित्वातील पश्चानुबंधनाचे आकारमान उत्पादन प्रक्रियेतील आदानांच्या पुरवठादारांची उपलब्धता दर्शविते. सामान्यपणे तेजीच्या काळात पश्चानुबंधनाची निर्मिती होते.

पश्चानुबंधनाचे फायदे :

  • सहभागी सर्व उद्योगांची आदाने स्वस्त दरात उपलब्ध होतात.
  • व्यापारचक्राला योग्य प्रकारे तोंड देता येते.
  • व्यवस्थापन खर्चात बचत होते.
  • मध्यस्थांचे उच्चाटन होते.
  • नियंत्रण असलेल्या क्षेत्रात अतिरिक्त उत्पादन होत नाही.
  • कार्यक्षमतेत वाढ होते.
  • मागणी व पुरवठ्यातील संतुलन राखता येते इत्यादी.

पश्चानुबंधनाचे तोटे :

  • मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे मिळत नाही.
  • समान आदान निर्मिती उद्योगांमधील गळेकापू स्पर्धा नष्ट होत नाही.
  • आदानांची मागणी करणाऱ्या उद्योगांवरील परावलंबन वाढते आणि त्या उद्योगांची मक्तेदारी निर्माण होते.
  • जर काही कारणांमुळे मागणी बदलली, तर त्याचा लाभ पूरक उद्योगांना होतो.
  • एखाद्या उत्पादकाने घेतलेला निर्णय चुकीचा ठरला, तर त्याचा प्रतिकूल परिणाम सहभागी सर्व उद्योगांवर होतो इत्यादी.

न्यूनविकसित अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिप्रधान असतात. प्रारंभिक अवस्थेतील अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कृषी उत्पादन वाढणे व त्याची निर्यात होणे आवश्यक असते; मात्र अशा कृषिप्रधान अर्थव्यवस्थेत पश्चानुबंधन आणि पुरोनुबंधनाचा अभाव असतो. त्यासाठी असंतुलित विकास धोरणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनुबंधनात वृद्धी होणे अत्यावश्यक ठरते. याकरिता आल्फ्रेड हर्श्चमन प्रेरित औद्योगीकरणाचे धोरण सूचित करतात. यामुळे पश्चानुबंधन आणि पुरोनुबंधनाला चालना मिळते. निवडक मोठ्या उद्योगांच्या स्थापनेमुळे त्यावर निर्भरीत अशा अनेक लहान उद्योगांच्या स्थापनेला चालना मिळते आणि पश्चानुबंधनाची दीर्घसाखळी तयार होते. कोलंबिया, ब्राझिल, मेक्सिको या राष्ट्रांनी आर्थिक विकासासाठी या पथाचा अवलंब केला आहे. भारतानेही आर्थिक नियोजनाच्या प्रारंभिक अवस्थेत याच पद्धतीचा अवलंब केला. १९९१ पासूनच्या आर्थिक सुधारणा काळात भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा विकास हा विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या अंतःप्रवाहातील सातत्यपूर्ण वाढीचा परिणाम आहे.

संदर्भ : कुरुलकर, र. पु., विकासाचे अर्थशास्त्र व सिद्धांत, नागपूर, २००४.

समीक्षक : दि. व्यं. जहागिरदार