मानवी शरीरातील पेशींची अनियंत्रित व असामान्य वाढ म्हणजे कर्करोग. प्रत्यक्षात कर्करोग म्हणजे काही एकच रोग नाही तर एका विशिष्ट प्रकारच्या रोग समूहास कर्करोग म्हणून संबोधलेले जाते. कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कर्करोगांमधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. कर्करोगाचे मुख्यत: सौम्य / अघातक अर्बुद (Benign tumors) आणि घातक अर्बुद (Malignant tumors) असे दोन प्रकार पडतात. धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, अति चरबीयुक्त आहार, विषारी रसायनांसोबत काम करणे किंवा निवासस्थानाच्या परिसरात अति रसायनांचा वापर, आनुवंशिकता, काही विषाणूंशी संपर्क आल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इ. कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. कर्करोग असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दरवर्षी सु. ११ लाख नागरिकांना कर्करोगाची बाधा होते व त्यातील सु. ५ लाख लोक या आजारामुळे बळी पडतात अशी माहिती नॅशनल रजिस्ट्री प्रोग्राम मध्ये देण्यात आली आहे. जगातील दर सहा मृत्यूमागे एका मृत्यूचे कारण कर्करोग असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये उघड झाले आहे. कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याच्या प्रतिबंधास प्रोत्साहन देणे याकरिता ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

कर्करोग नियंत्रण व प्रतिबंध कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृती करण्याकरिता भारत सरकारने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली. ३१ डिसेंबर हा “तंबाखू प्रतिबंधक दिन” व ५ फेब्रुवारी हा “मौखिक आरोग्य दिन” म्हणून साजरे केले जातात. कर्करोगावरील उपचारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यान्वये वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय इत्यादींमधील स्त्रीरोगतज्ञ, रोगनिदानतज्ञ व प्रयोगशाळातज्ञ यांना पॅप चाचणी (Papanicolaou test) घेण्याच्या तंत्रात प्रशिक्षित करण्यात आले आहे. क्ष-किरण उपचार, एंडोस्कोपी यांसारख्या सुविधा विविध जिल्हा रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील दहा ठिकाणी जिल्हा रुग्णालयात विनामूल्य रासायनिक चिकित्सा केंद्र (chemotherapy centres) सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

परिचारिकेची भूमिका : वैद्यकीय क्षेत्रात कोणत्याही रोग किंवा आजारासंबंधित जनजागृतीचे तसेच संसर्ग नियंत्रणाचे (Infection Control) महत्त्वपूर्ण कार्य परिचारिकेमार्फत उत्तमप्रकारे पार पाडले जाते. सामाजिक आरोग्य विभागामार्फत ग्रामीण रुग्णालय स्तरावर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र अशा विविध स्तरांवर जनजागृती करण्याचे महत्त्वाच्या कार्यात परिचारिकेचा सहभाग असतो. कर्करोगाचा प्रतिबंध हा समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीतील बदलामार्फत करणे आवश्यक असते. याकरिता आरोग्य संघाचा घटक म्हणून परिचारिका कर्करोगाबद्दल समाजातील विविध स्तरांवर समाजप्रबोधन करून आरोग्य शिक्षण देते. तसेच रुग्णांची वेळोवेळी विचारणा करून आरोग्यदायी जीवनशैली (Healthy Lifestyle) आत्मसात करण्यासाठी आरोग्यविषयी सल्ला देत असते.

परिचारिकेची कार्यपद्धती :

  • महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) व गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये महिला सामाजिक आरोग्य परिचारिका ग्रामीण भागातील स्त्रियांना स्तनातील गाठ स्वतःच तपासणीचे प्रात्यक्षिक दाखवते आणि महिलांना जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य करून स्तनाच्या कर्करोगाचे निदान प्राथमिक स्थितीतच करून  रोगातील पुढील क्लिष्टता रोखण्यात मदत करते.
  • कर्करोग प्रतिबंधासाठी प्राथमिक स्तरावर काम करताना परिचारिका विविध दृक्-श्राव्य पद्धतींचा उपयोग करते. ज्याद्वारे व्यक्तीला आपला आरोग्याचा स्तर उत्तम राखण्यास (Health Protection) व आरोग्याचे संवर्धन (Health Promotion) करण्यास साहाय्य होते.
  • उपचार पद्धतीचे नियोजन करून कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी कर्करोगाचे चेतावणी देणारे चिन्ह म्हणजे (CAUTION) याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.
  • समाजातील प्रत्येक स्तरावरील लोकांना कर्करोग, त्याची प्राथमिक लक्षणे-चिन्हे, त्वरित करावयाच्या कर्करोग निदान तपासण्या, पूर्ण उपचाराचे नियोजन, त्यासाठी उपलब्ध कर्करोग उपचार केंद्रांविषयी माहिती, संदर्भ सेवा इत्यादींबाबत माहिती देण्याचे काम सामाजिक आरोग्य परिचारिकेद्वारे केले जाते.
  • या सर्व सेवासोबतच रुग्णांसाठी कल्याणकारी योजना तसेच सामाजिक, खाजगी आणि सरकार मार्फत देण्यात येण्याऱ्या आर्थिक मदतीविषयी संपूर्ण माहिती पुरविण्यासाठी परिचारिका सामाजिक कार्यकर्त्या बरोबर समन्वय साधतात.

सामाजिक आरोग्य परिचारिका कर्करोगाच्या चेतावणी देणाऱ्या चिन्हाबद्दल समाजातील विविध स्तरांवर जागृती करण्याचे व प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्वपूर्ण काम तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली पार पाडत असते. अशा प्रकारे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना  सोबत घेऊन कर्करोगाला नियंत्रणात ठेऊन, एक निरोगी समाज घडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध असते.

 संदर्भ :

समीक्षक : रेशमा देसाई