कर्करोग होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना कर्करोगकारक घटक असे म्हणतात. तंबाखूचे सेवन, आहाराबाबत वाईट सवयी तसेच काही प्रमाणात आनुवंशिकताही कर्करोगाला कारणीभूत असते. यांत्रिकीकरण, नागरिकीकरण, वाढती लोकसंख्या याद्वारे निसर्गात सातत्याने उत्सर्जित प्रदूषके (Pollutants) कर्करोगाचे प्रमाण वाढवतात. परंतु एखाद्या आजाराविरुद्ध लढत असताना आपली शारीरिक स्थिती व प्रतिकारशक्ती यांचीही भूमिका महत्त्वाची असते.
कर्करोग होण्याची संभाव्य धोकादायक कारणे :
(१) तंबाखूचा वापर : तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होतो याची नोंद 1739 मध्ये केलेली आढळते. अमेरिका, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन या देशांमध्ये धूम्रपान व कर्करोग यांचा संबंध संशोधनाने सिद्ध केला आहे. धूम्रपानाने फुप्फुसाचा कर्करोग होतो हे आता जगजाहीर झाले आहे. जास्त वेळा जास्त मात्रेच्या तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. भारतात तंबाखू खाण्याने, बिडी, चिलीम, सिगारेट, सिगार अन्ननलिकेद्वारे ओढल्यामुळे, तपकिरीच्या नाकाद्वारे वापराने, जाळलेली तंबाखू मिश्रीद्वारे दात घासताना वापरल्याने अनेक प्रकारचे रोग उद्भवलेले संशोधनाने आढळून आलेले आहे. तंबाखूच्या या वेगवेगळ्या सेवन प्रकारांनी श्वासनलिकेचा, फुप्फुसाचा, यकृताचा, अन्ननलिकेचा, पोटाचा, लहान व मोठ्या आतड्याचा कर्करोग उत्पन्न झाल्याचे निदर्शनास आले आहे. तंबाखूच्या धुरात अनेक वायूंचे मिश्रण ज्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असे कण आणि लहान द्रवबिंदू असतात. या धुरामध्ये जवळपास एक हजार वेगवेगळे विषारी घटक असतात. त्यांपैकी 270 घटक आजपर्यंत ओळखले गेले आहेत. यापैकी अत्यंत महत्त्वाचे विषारी घटक म्हणजे निकोटीन, कार्बन मोनॉक्साइड वायू व टार हे होत.
टारमध्ये कर्करोग उत्पन्न करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे बहुवलयी अॅरोमॅटिक हायड्रोकार्बने हे असतात. हे घटक सुरुवातीस तंबाखूमध्ये असत नाहीत. परंतु तंबाखूच्या सेवनाच्या वेळी अर्धवट ज्वलनाने तयार होतात. जवळपास 20 मिग्रॅ. धुराचा टार एक सिगारेट ओढल्याने माणसाच्या शरीरात जातो. हे प्रमाण जेवढे जास्त तेवढी फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
त्याचप्रमाणे संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की, तंबाखूचा (विडी, सिगारेट, चिलीम, सिगार) धूर वातावरणात राहिल्यानेसुद्धा (दुय्यम धूम्रपान), ओढणाऱ्या व्यक्तीच्या सतत जवळ राहणाऱ्या माणसांत सुद्धा फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
(२) मद्यसेवन : पुष्कळ प्रमाणात मद्य पिणाऱ्यांना तोंडाचा, घशाचा, स्वरयंत्राचा, गळ्याचा, अन्ननलिकेचा आणि जठराचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. जे लोक मद्य आणि तंबाखूचेही सेवन करतात, त्यांना या कर्करोगांचा धोका अधिक प्रमाणात असतो.
(३) किरणोत्सर्ग (Radiology) : किरणोत्सर्गी प्रयोगशाळेत काम करणारे प्रयोगशाळा कर्मचारी सातत्याने किरणोत्सर्गाच्या विशेषत: क्ष- किरणाच्या सान्निध्यात येत असतात. त्यामुळे त्यांना त्वचेचा व रक्ताचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु आता सर्व राष्ट्रांत कर्मचाऱ्यांना किती किरणोत्सर्गास सामोरे जावे त्यावर बंधने आणली गेली आहेत. भारतात त्यासाठी आण्विक ऊर्जा नियमन समिती (Atomic Energy Regulation Board, AERB; एईआरबी) नामक भारत सरकारची संस्था नियंत्रण ठेवते. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना कर्करोग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे आण्विक ऊर्जेपासून ऊर्जा तयार करणाऱ्या विक्रियकामध्ये (Reactor) देखील असे नियंत्रण केले जाते.
सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होतो.
(४) जीवाणू व विषाणू संसर्ग : जीवाणूंच्या आणि विषाणूंच्या संसर्गाने अनेक प्रकारांचे कर्करोग होतात.
तक्ता : कर्करोगकारक घटक |
कर्करोगकारक घटक | कर्करोगबाधित अवयव/प्रकार |
बेंझोपायरीन (तंबाखू) | फुप्फुस |
अल्कोहॉल | तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका |
खाण्यातील स्निग्ध पदार्थ | स्तन |
अॅस्बेस्टस | श्वासनलिका, श्वसनेंद्रियाभोवतालची आवरणे |
आंबवलेले अन्नपदार्थ | पोट |
इस्ट्रोजेनयुक्त पदार्थ/औषधे | गर्भाशय अस्तर, बीजांड, स्तन |
अतिनील किरण (Ultraviolet rays) | त्वचा |
क्ष-किरण व गॅमा किरण किरणोत्सर्ग | रक्तरोग, थायरॉइड, स्तन, फुप्फुस, तोंड, पोट, मोठे आतडे/बृहदांत्र, मूत्राशय, बीजांड, त्वचा, मध्यवर्ती चेतासंस्था |
टॅमॉक्झिफेन | गर्भाशय अस्तर |
इनव्हिट्रो डायएथिल स्टिलबेस्ट्रॉल | लहान मुलांचा कर्करोग |
उदरपारितश्राव्यातीत ध्वनिकी (Transabdominal Ultrasound) | लहान मुलांचा कर्करोग |
आल्फा-टॉक्झिन | वृषणाची पिशवी |
निकेल (निकेल कारखाना) | फुप्फुस, नाक |
लाकडाचा भुसा | नाक |
क्रोमियम (कातडे कमाविणे कारखाना) | फुप्फुस |
मस्टर्ड गॅस | श्वासनलिका, फुप्फुस |
नॅप्थॅलीन | मूत्राशय |
ह्युमन पॅपिलोमा विषाणू (HPV virus) | गर्भाशयमुख, बीजांड, घसा, योनी, तोंड, वृषण पिशवी, गुदद्वार |
हेलिकोबॅक्टर पायलोरी (जीवाणू) | पोट |
ईबीव्ही विषाणू (EBV) | टी-पेशीलसीका मांसार्बुद (T-cell lymphoma), नाक, घसा, पोट |
परिसर्पविषाणू (Herpes Virus) | कॅपोसी मांसकर्क (Kaposi’s sarcoma) |
पॉलिओमा विषाणू | मेंदू |
ह्युमन टी-लिंफोट्रॉपिक विषाणू टाइप-१ (HTL-1 virus) | टी-पेशी कर्करोग/ रक्ताचा कर्करोग (Leukemia) |
हिपॅटिटिस विषाणू (बी व सी) | यकृत |
शिस्टोसोमा/खंडितकायी परजीवी (Schistosoma parasite) | मूत्राशय |
एपस्टाइन-बार विषाणू | बारकिट लिंफोमा |
नॉनहॉजकिन लिंफोमा | हॉजकिन लिंफोमा |
(५) हॉर्मोने (Hormones) : हॉर्मोनांच्या असंतुलनामुळे स्त्रियांमध्ये स्तनाचा (इस्ट्रोजेन हॉर्मोन; estrogen hormone; स्त्रीमदजनक) व पुरुषांमध्ये प्रोस्टेटचा (टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन; Testosteron Hormone) कर्करोग होतो हे आता संशोधनाने सिद्ध झाले आहे. अनेक प्रदूषकांमुळे व आहारातील घटकांमुळे शरीरातील हॉर्मोनांचे संतुलन बदलते.
(६) वय : जसजसे माणसाचे वय वाढत जाते, तसतसे त्याला कर्करोग होण्याचे प्रमाण वा शक्यता वाढते हे आढळून आले आहे. सामान्यत: वयाच्या 65 वर्षानंतर कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. पुरुषांमध्ये वयाच्या 50 वर्षानंतर हे जास्त प्रकर्षाने दिसून आले आहे. वृद्धापकाळात कर्करोगाचे प्रमाण कशामुळे वाढते याविषयी नक्की सांगता येत नाही, परंतु उतारवयामधील अल्प प्रतिकारशक्ती आणि कर्करोग उत्पन्न करणारे घटक (Carcinogen) शरीरात अधिक काळ निद्रिस्त अवस्थेत असलेले कर्करोगकारक घटक या कारणांमुळे कर्करोग उद्भवू शकतो.
(७) जात, कुळ, वंश : विविध वंशाच्या व जातीच्या लोकांना झालेल्या कर्करोगांचा अभ्यास (संशोधन) केल्यानंतर असे आढळून आले आहे की, काही वंशाच्या लोकांत विशिष्ट प्रकारचे कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असते.
(८) वैवाहिक स्थिती : लवकर लग्न झालेल्या स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग जास्त प्रमाणात दिसून येतो.