फ्रान्समधील गुलामगिरीविषयक खटल्यातील एक महत्त्वाचा व्यक्ती. मूळचा दक्षिण भारतातील. त्याच्या पूर्व व उत्तरायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याला फ्रान्समध्ये घेऊन जाणारा ॲलेन फ्रान्स्वा इन्यास ब्रिन्यों हा फ्रेंच गृहस्थ १७४७ च्या सुमारास दक्षिणेतील पाँडिचेरीत व्यापार करत असल्याची नोंद आहे. व्यापारात त्याने बराच पैसा कमवला. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी त्याने अंदाजे आठ वर्षे वयाचे दोन लहान स्थानिक मुले प्रत्येकी आठ रुपयांना गुलाम म्हणून विकत घेतली. फ्रान्सच्या उत्तर किनारपट्टीवरील ब्रेतान्य प्रांतातील सेंट मालो शहरात राहणाऱ्या ॲलेन ब्रिन्योंच्या आईने या मुलांना ख्रिस्ती बनवून त्यांची नावे फ्रान्सिस्क व आंद्रे अशी ठेवली.

पुढे काही वर्षांनी ब्रिन्योंने फ्रान्सिस्क व आंद्रे यांना पॅरिसला बोलावले. तत्कालीन यूरोपीय उच्चवर्गात दूरदेशीचे गुलाम बाळगण्याची पद्धत होती. फ्रान्सिस्क आणि आंद्रे या दोघा भावांनी ब्रिन्यों नीट वागवत नसल्याने इतरांकडे काम मिळवण्याचा प्रयत्न केला (१७५७). यावर ब्रिन्योंने या दोघांनाही कैद करण्याचा हुकूम मिळवून त्यांना अटक करवली. मात्र सरकारतर्फे मुख्य वकिलाने (ॲटर्नी जनरल) न्यायालयात ब्रिन्योंच्या विरुद्ध दावा दाखल केला (फेब्रुवारी १७५८). कारण ब्रिन्योंचे वागणे ‘फ्रान्समध्ये पाऊल ठेवताक्षणी कोणताही गुलाम मुक्त होतोʼ या जुन्या तत्त्वाचा भंग होत असल्याने न्यायालयाने फ्रान्सिस्क आणि आंद्रे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर ब्रिन्योंने युक्तिवाद केला की, १७३८ च्या शाही फर्मानाप्रमाणे त्याने त्याच्याकडील गुलामांसाठी ३०० लिव्हर इतकी अनामत अगोदरच भरलेली असल्यामुळे त्याला गुलामांना पकडायचा पूर्ण हक्क होता. फ्रान्सिस्क व ब्रिन्यों यांमधील हे दावे-प्रतिदावे पूर्ण वर्षभर असेच चालू राहिले. तोवर फ्रान्सिस्कला विशेष न्यायालयीन कोठडीत ठेवले गेले; परंतु त्याचा भाऊ आंद्रे तेथून निसटला, तो कायमचा बेपत्ता झाला. अखेरीस फ्रान्सिस्कला मुक्त केले. पण ब्रिन्योंने या निकालाविरुद्ध फ्रेंच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली (१७५९). विरुद्ध बाजूने फ्रान्सिस्कनेही मोर्चेबांधणी केली.

फ्रान्सिस्कच्या वकिलांनी फ्रान्सिस्क आफ्रिकन कृष्णवर्णीय वंशाचा नसल्याने त्याला १७१६ व १७३८ चे कायदे लागू नाहीत, असा युक्तिवाद केला. त्यांनी दाखवून दिले की, ब्रिन्योंने मुळात फ्रान्सिस्कला फ्रान्समध्ये आणण्याकरिता पाँडिचेरीच्या फ्रेंच गव्हर्नरची परवानगीच मागितली नव्हती. याखेरीज फ्रान्समध्ये पोहोचल्यावर त्याची नोंदणीही आरमारी कार्यालयात (ॲडमिरल्टी ऑफिस) केली नव्हती. शिवाय, फ्रान्सिस्कला फ्रान्समध्ये आणण्यामागे त्याचा उद्देश त्याला कोणत्याही प्रकारचे शिक्षण देऊन काही काळाने वसाहतींमध्ये पुन्हा नेऊन सोडणे हाही नव्हता. थोडक्यात, यासंबंधीच्या कायद्याचे शब्दश: आणि हेतुश: असे दोन्ही प्रकारे त्याने उल्लंघन केले होते. अखेर फ्रान्समधील सर्वोच्च न्यायालयाने फ्रान्सिस्कला पूर्णपणे मुक्त केले. यानंतरही तो पॅरिसमध्ये राहिल्याचे दिसून येते. पॅरिसमध्ये स्वत:चे नाव एक नागरिक म्हणून नोंदवताना त्याने ‘जन्मत: स्वतंत्रʼ असे सांगितल्याची नोंद मिळते. बहुधा तो तेथेच मरण पावला असावा.

फ्रान्सिस्कच्या खटल्याचे गुलामगिरीच्या इतिहासाच्या दृष्टीने फ्रेंच न्यायालयीन इतिहासात एक वेगळे महत्त्व आहे. या खटल्यानंतर फ्रान्समधील गुलामांच्या संदर्भात अनेक कायदे करण्यात आले. गुलामांचे जे खटले सर्वोच्च न्यायालयापुढे आले, त्या खटल्यांमध्ये निर्णय हा गुलाम म्हणून होण्याऐवजी वंश नजरेसमोर ठेवून होऊ लागला. परिणामी उत्तरोत्तर कृष्णवर्णीय व अन्य गौरेतरवंशीय, मिश्रवंशीय लोकांचे अधिकार कमी कमी केले जाऊ लागले. त्यांचा फ्रान्समधील संचार मर्यादित ठेवण्याकडे कल वाढला.

संदर्भ :

  • Cohen, William Β. The French Encounter with Africans, Bloomington, Indiana,1980.
  • Peabody, Sue, ‘Race, Slavery and the Law in early modern Franceʼ, The Historian, 56 (3): 501-510, 1994.

                                                                                                                                                                             समीक्षक : प्रमोद जोगळेकर