ली ग्रॉस क्लार्क (Le Gros Clark W. E.) : (५ जून १८९५ – २८ जून १९७१). प्रसिद्ध ब्रिटीश शरीररचनाशास्त्रज्ञ व मानवशास्त्रज्ञ. ‘नरवानर गणाचे (प्रायमेट्स) तुलनात्मक शरीररचनाशास्त्र’ आणि ‘मानवी उत्क्रांती’ यांमध्ये ते अध्वर्यू होते. त्यांचे पूर्ण नाव सर विल्फ्रिड एडवर्ड ली ग्रॉस क्लार्क असे होते. ली ग्रॉस क्लार्क यांचा जन्म इंग्लंडमधील हेमेल हेम्पस्टीड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ब्लंडेल्स प्रशालेमध्ये झाले. इ. स. १९१२ मध्ये सेंट थॉमस हॉस्पिटल्स मेडिकल स्कूल येथे त्यांनी वैद्यकशास्त्राच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि इ. स. १९१६ मध्ये ते सर्जन झाले. त्यानंतर इ. स. १९१८ मध्ये रॉयल आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये ते रुजू झाले. काही काळ त्यांनी फ्रान्समध्ये काम केले. इ. स. १९१९ मध्ये रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या फेलोशिपची परीक्षा देऊन त्यांनी फेलोशिप मिळविली. इ. स. १९२० मध्ये सारावाक व बोर्निओ येथे त्यांची मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. तेथे तीन वर्षे काम केल्यानंतर इ. स. १९२४ मध्ये ‘चेअर ऑफ  अ‍ॅनाटॉमी’ म्हणून सेंट बार्थोलोम्यूज हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमध्ये प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर इ. स. १९२७ मध्ये ते प्राध्यापक झाले. इ. स. १९२९ मध्ये सेंट थॉमस हॉस्पिटल मेडिकल स्कूलमध्ये ‘चेअर ऑफ अ‍ॅनाटॉमी’ हे पद त्यांना मिळाले. इ. स. १९३४ ते १९६१ या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठात ते प्राध्यापक होते. येथून १९६२ मध्ये निवृत्त झाले.

ली ग्रास क्लार्क यांचा मेंदूची रचना आणि रंगज्ञान हा अभ्यासाचा विषय होता. ऑस्ट्रॅलोपिथिसिन्स हे होमिनीडच होते, हे ठासून सांगण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. रेमंड डार्ट यांच्या टाँग बालकाच्या कवटीविषयी मताला ली ग्रास यांनी दुजोरा दिला. पिल्टडाऊनच्या भ्रष्ट शोधाचा पर्दाफाश करण्यात ली ग्रास क्लार्क यांचा पुढाकार होता.

ली ग्रास क्लार्क यांना इ. स. १९३४ मध्ये ‘चेअर ऑफ डॉ. लीज प्रोफेसरशिप इन अ‍ॅनाटॉमी’ यासाठी आमंत्रित केले गेले. हे पद ऑक्सफर्ड विद्यापीठाचे वैधानिक प्राध्यापक असे पद होते. नरवानर गण उत्क्रांतीमधील त्यांच्या कार्याची नोंद घेऊन इ. स. १९३५ मध्ये फेलो ऑफ रॉयल सोसायटी म्हणून त्यांची निवड झाली. इ. स. १९५० मध्ये इंटरनॅशनल अ‍ॅनाटॉमिकल काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले, तर १९५२-५३ मध्ये ते अ‍ॅनाटॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष होते. १९६१ मध्ये ते ब्रिटीश आसोसिएशन फॉर दी अ‍ॅड्व्हॉन्समेंट ऑफ सायन्सचे अध्यक्ष झाले. त्यांना १९६१ मध्ये रॉयल सोसायटीचे ‘फेलो ऑफ दी रॉयल’ मेडल देऊन गौरविण्यात आले.

ली ग्रास क्लार्क यांचे नरवानर गणाची उत्क्रांती आणि मानवी उत्क्रांती या विषयीचे योगदान अर्ली फोररनर्स ऑफ मॅन (इ. स. १९३४), हिस्टरी ऑफ दी प्रायमेट्स (१९५८), अँटिसीडेंट्स ऑफ मॅन (१९५९), मॅन एप्स ऑर एप्स मॅन (१९६७) या पुस्तकांतून स्पष्ट होते.

ली ग्रॉस क्लार्क यांचे निधन बर्टन ब्रॅडस्टॉक, इंग्लंड येथे झाले. त्यांच्या निधनानंतर डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅनाटॉमी या विभागाच्या इमारतीला ली ग्रॉस क्लार्क यांचे नाव देण्यात आले.

संदर्भ : Srivastava, R. P., Morphology of the Primates & Human Evolution, New Delhi, 2009.

समीक्षक : सुभाष वाळिंबे