हेन्री मॅकेंझी : (२६ ऑगस्ट १७४५ – १४ जानेवारी १८३१). स्कॉटिश कादंबरीकार, नाटककार, कवी आणि संपादक. स्कॉटिश साहित्यातील भावविवश कादंबरीचा अर्ध्वयू अशी त्याची ख्याती आहे. सुप्रसिद्ध डॉक्टर जोशुआ मॅकेंझी आणि मार्गारेट रोझ यांचा तो मुलगा होय. मॅकेंझीचा संबध थेट मॅकेंझी कुळाचे प्रमुख किन्टेलच्या आठव्या बॅरनशी होता. मॅकेंझीचे शालेय शिक्षण एडिंबरो येथील विद्यालयात आणि उच्च शिक्षण एडिंबरो विद्यापीठात झाले. त्याने सुरुवातीला सरकारी कोषागारात लिपिक म्हणून काम केले, परंतु नंतर इंग्रजी कोषागार पद्धतीचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी १७६५ साली तो लंडनला रवाना झाला. लेखनाबरोबरच मॅकेंझीने व्यावसायिक कारकिर्दीचा उच्चांक गाठला होता. १७७३ साली त्याची स्कॉटलंडचा कर नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
१७६८ मध्ये स्कॉटलंडला परतल्यानंतर त्याने आपली व्यवसायिक जबाबदारी सांभाळत कादंबरी लेखनास सुरुवात केली. मॅकेंझीच्या सुरुवातीच्या कामांमध्ये स्कॉटिश बॅलड्ससारख्या (पोवाडे) पारंपारिक लोकसाहित्याच्या अनुकरणाचा भाग दिसून येतो. तथापि लंडनहून आल्यावर त्यांनी इंग्रजी साहित्यिक शैलीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. या कालखंडात भावना ही एक शक्तीशाली साहित्यिक प्रभाव बनत होती. मॅकेंझीने या भावविवश धाटणीतच आपली पहिली आणि सर्वात महत्वाची कादंबरी द मॅन ऑफ फीलिंग लिहिण्यास सुरुवात केली आणि १७७१ साली ती अज्ञातपणे प्रसिद्ध केली. या कादंबरीने मॅकेंझी यांना स्कॉटलंडमधील एक प्रमुख साहित्यिक म्हणून प्रकाश झोतात आणले. त्यांच्या लंडनमधील अनुभवांनी त्यांच्या कादंबरीचा नायक हार्लेच्या साहसांसाठी साहित्य मिळवून दिले. हार्ले हा त्याच्या आदर्श संवेदनशीलतेचं दर्शन देत त्याला भेटलेल्या लोकांच्या दुर्दैवी गोष्टींबद्दल वारंवार अश्रू ढाळतो. त्याचा निरागसपणा इतरांच्या सांसारिक तत्वांपेक्षा नेहमीच भिन्न ठरतो. या कादंबरीची अमेरिकन आवृत्ती याच नावाने १७८४ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर ही कादंबरी फ्रेंच, जर्मन, पोलिश सहित इतर नऊ भाषांमध्ये अनुवादीत झाली.
द मॅन ऑफ द वर्ल्ड (१७७३) आणि ज्युलिया डी रौबिन्ये (१७७७) या आणखी दोन कादंबर्या मॅकेंझी यांनी लिहिल्या. द मॅन… मध्ये मॅकेंझीने हार्लीच्या अगदी विरुद्ध असं सिंडल हे मोहक पण खलनायकी पात्र सादर केलं. तर ज्युलिया ही पत्ररूप कादंबरी होती. त्याने रिचर्डसनच्या क्लॅरिसा कादंबरीचे अनुकरण करत प्रिन्स ऑफ ट्यूनिस (१७७९) ही स्वच्छंदतावादी (रोमँटिक) शोकांतिका देखील लिहिली आणि एडिंबरो येथील रॉयल थिएटर येथे प्रथम सादर केली. या व्यतिरिक्त त्याने शिपरेक (१७८४, लिलोच्या फेटल क्युरिओसिटीची आवृत्ती), द फोर्स ऑफ फॅशन, अ कॉमेडी ही नाटके लिहिली. द फोर्स ऑफ फॅशन हे नाटक त्याने १७८९ साली कान्वेंट गार्डन येथे सादर केले; परंतु नाटकाला मिळालेला काहीसा निराशाजनक प्रतिसाद पाहता त्याने हे नाटक छापील स्वरूपात प्रसिद्ध केले नाही. नंतर १८०८ साली फॉल्स शेम ऑर द व्हाईट हिप्पोक्रीट : अ कॉमेडी या नावाने आणि थोड्याफार बदलासहित प्रसिद्ध केले. जीवन आणि समाज, नैसर्गिक भावना आणि सहिष्णुता यांचा पुरस्कार हा त्याच्या लेखनाचा मुख्य भाग होता. अभिमान आणि परोपकारी हेतू यांच्यामधील समतोल ही स्कॉटिश ज्ञानवर्धनाची मूलतत्त्वे मॅकेंझीने आपल्या लेखणीतून जपली. अठराव्या शतकातील मानकांनुसार त्याचे पत्रलेखन हे साहित्यिक, राजकीय नेते आणि राजनीतीज्ञ या घटकांच्या परिघाला व्यापणारे होते.
मॅकेंझीने सुप्रसिद्ध ब्रिटिश नियतकालिक संपादक अडीसनच्या स्पेक्टेटरचं अनुकरण करत द मिरर (१७७९) आणि द लोंजर (१७८५-८७) या दोन नियतकालिकांचे संपादनही केले. या साप्ताहिकांतील बहुतांश लेख मॅकेंझीने लिहिले. मॅकेंझी साहित्यिक आणि संपादक म्हणून इतके प्रसिद्ध होते की प्रकाशक बहुतेकदा हस्तलिखिते स्वीकारण्याअगोदर त्यांचा सल्ला घेत असत. प्रसिद्ध स्कॉटिश कवी रॉबर्ट बर्न्सच्या किल्मरनॉक या काव्यसंग्रहाच्या समीक्षेत त्याच्या लेखनाची प्रशंसा केली तसेच सर वॉल्टर स्कॉट यांच्या लेखन कारकिर्दीच्या सुरूवातीला मॅकेंझीने समर्थन दिले. इतकेच नव्हे तर १८०१ ते १८१० या कालावधीत मॅकेंझी हा रॉयल सोसायटी ऑफ एडिंबरोचा संस्थापक सदस्य होता आणि त्याने वॉल्टर स्कॉटला जर्मन लेखक गटे आणि गोट्फ्रिड ओगुस्तचे बॅलड्स (पोवाडे) अनुवादीत करण्यास प्रोत्साहित केले.
१८०१ ते १८१० या काळात मॅकेंझी हे सर वॉल्टर स्कॉट आणि विल्यम एर्स्किन यांच्यासमवेत रॉयल थिएटर एडिंबरोचे विश्वस्त होते. अठराव्या शतकाच्या शेवटच्या दोन आणि एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांतील एडिंबरोच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक उत्क्रांतीच्या अनुषंगाने मॅकेंझीचे समाजात व्यापलेलं स्थान आणि सर्व साहित्यात त्यांचा प्रभाव हा अनन्यसाधारण होता. मॅकेंझी यांचे एडिंबरो येथे वृद्धापकाळाने निधन झाले आणि त्यांना शहारामधील ग्रेफ्रिअर्स चर्चगार्डमध्ये दफन करण्यात आले.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Henry-Mackenzie
- https://www.oxforddnb.com/
- Quaintance, Richard E. “Henry Mackenzie’s Sole Comedy.” Huntington Library Quarterly, vol. 25, no. 3, 1962, pp. 249–251. JSTOR, www.jstor.org/stable/3816119.Accessed 9 June 2021.
- https://www.bl.uk/collection-items/the-man-of-feeling-a-sentimental-novel#
- Mackenzie, Henry. The Works of Henry Mackenzie, Esq…. Vol. 8. J. Ballantyne and Company, 1808.