स्टुअर्ट, डगलस : (३१ मे १९७६). स्कॉटीश-अमेरिकन लेखक, परिधान अभिकल्पक (फॅशन डिझायनर). सन २०२० चा बुकर पुरस्कार विजेता. जन्म ग्लासगो, स्कॉटलंड येथे. डगलस कुटुंबात तीन भावंडात सर्वात लहान. तो लहान असताना त्याच्या वडिलांनी कुटुंबियांना सोडले. मद्यपानासंबंधी आरोग्याच्या समस्यांनी त्याची आई मरण पावली तेव्हा डगलस १६ वर्षांचा होता. आईच्या मृत्यूनंतर काही काळ मोठ्या भावासोबत व नंतर आश्रमगृहामध्ये मध्ये तो राहिला. त्याने स्कॉटीश कॉलेज ऑफ टेक्सटाइल मधून पदवी आणि लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधून (एम.ए.) पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. परिधान अभिकल्पनामध्ये व्यवसाय करण्यासाठी वयाच्या २४ वर्षी तो न्यूयॉर्क शहरात आला. पल्विन क्लीन, राल्फ लॉरेन, बनाना रिपब्लिक, जॅक स्पाडे यासारख्या मोठ्या व्यावसायिक संस्थासह २० वर्षाहून अधिक काळ त्याने काम केले.

बनाना रिपब्लिक मध्ये वरिष्ठ संचालक म्हणून काम करत असताना त्याने पहिली कादंबरी लिहिली. मद्यविकाराशी त्याच्या आईने दिलेली झुंज व आई व त्याचे असलेले नातेसंबंध यासंबंधी शुगी बेन या कादंबरीत संघर्षाचे चित्रण त्याने केले आहे. शुगी बेन या पहिल्याच कादंबरीने बुकर पुरस्कार जिंकला (२०२०). ५१ वर्षांच्या काळात बुकर पुरस्कार मिळवणारा तो दुसरा स्कॉटीश-अमेरिकन लेखक आहे. सेंटर फॉर फिक्शनचा कादंबरी पुरस्कार, क्रिकस प्राईज, नॅशनल बुक अवार्ड फॉर फिक्शन या पुरस्कारासाठी या कादंबरीला अंतिम फेरीत नामांकन मिळाले होते. ग्रोव्ह अटलांटिक, युनायटेड किंगडम मधील पॅन मॅकमिलन पिकाडोर यासारख्या व्यक्ती संस्थांद्वारा एकूण बावीस भाषांमध्ये ही कादंबरी भाषांतरीत झाली आहे. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर द ऑब्झर्व्हर, द न्यूयॉर्क टाईम्स, द स्कॉटस्मन, टीएलएस, द हिंदू  यात या कादंबरी संदर्भात समीक्षा प्रकाशित झाली. पुस्तक वितरण समारंभात पॅनलचे अध्यक्ष मार्गारेट बुस्बी यांनी हे पुस्तक अभिजात असल्याचे वर्णन केले आहे.

स्टुअर्टची पहिली कादंबरी प्रकाशित होण्यापूर्वीच त्याच्या फाऊंड वॉन्टींग, द इंग्लिशमॅन या कथा द न्यू यॉर्कर मॅगझिन मध्ये प्रकाशित झाल्या होत्या. त्याचे पॉव्हर्टी, एंक्झायटी अँड जेंडर इन स्कॉटीश वर्कींग-क्लास लिटरेचर हे लेखन लिटल हब वर प्रसिद्ध झाले होते. नोव्हेंबर २०२० मध्ये स्टुअर्ट यांनी आपली दुसरी कादंबरी लोच अवे  ही १९९० च्या मध्यातच पूर्ण केल्याचे सांगितले. ही कादंबरी प्रादेशिक टोळ्यांत व सांप्रदायिकतेत विभागले गेलेल्या औद्योगिक उत्तरवर्ती ग्लासगोच्या पाश्वभूमीवर घडणारी प्रेमकथा आहे.

१९७०-८० च्या दशकातील श्रमजीवी वर्गाबाबत लिहीताना तो म्हणतो पुस्तकं नसलेल्या आणि दारिद्र्याने वेढलेल्या घरात तो वाढला. थॅचर युगातील आर्थिक धोरणांमुळे श्रमजीवी वर्गाचा नाश झाला. स्कॉटलंडच्या पश्चिम किनार्‍यापासून दूर जाणार्‍या उद्योगांनी बेरोजगारी, मद्यपान आणि व्यसनाधीनता मागे सोडली. स्टुअर्टकडे ब्रिटिश आणि अमेरिकन दुहेरी नागरिकत्व असून सध्या मॅनहॅटन येथील ईस्ट व्हिलेजमध्ये तो वास्तव्यास आहे.

संदर्भ :