बेली, जोआना : (११ सप्टेंबर १७६२-२३ फेब्रुवारी १८५१). १८ व्या शतकातील एक स्कॉटिश संवेदनशील कवयित्री, सर्जनशील नाटककार, प्रसिद्ध संपादक आणि समीक्षक. जन्म हॅमिल्टन, स्कॉटलंड येथे. जोआनाचा भाऊ शाळेत शिकत असे; मात्र जोआना तिच्या शिक्षणासाठी तिचे वडील जेम्स बेली यांनी घरीच दिलेल्या अनौपचारिक शिक्षणावर अवलंबून राहिली. जेम्स बेली यांनी त्या काळाप्रमाणेच आपल्या मुलीला तिच्या बौद्धिक कौशल्यांवर नैतिक क्षमता विकसित करण्याचे महत्त्व देणारी शिकवण दिली. भावनांना कधीही बळी पडू नये हे तत्व त्यांनी कसोशीने जोआनाच्या मनावर बिंबवले. तिनेच नमूद केल्याप्रमाणे तिला सुरुवातीला अभ्यासाची फार आवड नव्हती आणि ती वाचायला सुद्धा शिकली नाही. ती नऊ वर्षांची झाल्यानंतर तिला आणि तिच्या बहिणीला ग्लासगो बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आले. तिथेच जोआनाला तिच्या वर्गमित्रांचे मनोरंजन करण्यासाठी तिने वाचलेल्या साहित्यकृतींचे तसेच तिने पाहिलेल्या घटनांचे कथेत रूपांतर करून सांगण्याची आवड निर्माण झाली. यातच तिच्या वाङ्मयीन प्रवासाची बिजे आढळतात.

स्त्रोत : National Portrait Gallery, London.

हॅम्पस्टेडमध्ये राहताना तिचा ॲना बार्बाउल्ड, लुसी एकिन आणि वॉल्टर स्कॉट यासारख्या नामांकित समकालीन लेखकांशी परिचय झाला होता. तिच्या सर्जनशील साहित्यिक कौशल्यासाठी तिचे कौतुक केले गेले. यातुनच तिने हॅम्पस्टेड येथे तिच्या घरातच एका साहित्यिक गतिविधीची सुरुवातही केली होती. तिची बुद्धिमत्ता, सचोटी आणि विनयशील वर्तनामुळे ती अनेकांसाठी सज्जन ख्रिश्चन स्त्रीचे आदर्श प्रतीक बनली. तिने आपले साहित्य नैतिक तत्त्वज्ञानास केंद्रित करून आणि गॉथिक शैलीचा वापर करून निर्माण केले होते. प्लेज ऑन द पॅशन्स (तीन खंड : १७९८, १८०२, १८१२ ) आणि फुजिटिव्ह वर्सेस (१८४०) यासारख्या साहित्यकृतीमधे त्याची प्रकर्षाने प्रचिती येते. प्लेज ऑन द पॅशन्समधील काऊंट बॅसिल ही प्रेमावर आधारित एक शोकांतिका, द ट्रायल ही प्रणयरम्य सुखांतिका, डी मोनफोर्ट आणि ओर्रा ही द्वेषावर आधारित शोकांतिका आहे. जोआना बेलीच्या इतर साहित्यकृतींमधे नाटक – रेनर (१८०४), द फॅमिली लीजण्ड (१८१०) आणि कविता – मेट्रिकल लिजण्डस ऑफ एक्सहॉलटेड कॅरेक्टर्स (१८२१), अ कलेक्शन ऑफ पोएम्स (१८२३), लाईन्स टू एग्नेस बेली ऑन हर बर्थडे (कविता) यांचा मुख्यतः समावेश होतो.

बेलीने निर्मिलेल्या वाङ्मयीन कृतींमधे २६ नाटके आणि कवितांच्या अनेक खंडांचा समावेश आहे. तिच्या साहित्यकृती, नाटकाचा इतिहास आणि सिद्धांत तसेच नाट्यक्षेत्रातील स्त्रियांच्या भूमिकांबाबत अंतर्दृष्टी प्रदान करतात. तिची अनेक समीक्षकांनी प्रशंसा केली आहे. विल्यम वर्ड्सवर्थ, लॉर्ड बायरन आणि पर्सी शेली या ख्यातनाम कविंच्या कवितांवर जोआनाच्या लिखाणाचा गडद प्रभाव जाणवतो. पुढील पिढीतील महिला लेखकांसाठी तिने आदर्श म्हणून काम केले आहे असे अनेक समीक्षकांनी नमूद केले आहे. जोआना बेलीच्या मृत्यूनंतर साधारणपणे २०व्या शतकाच्या उत्तरार्धात तिच्या साहित्याकडे पुन्हा अभ्यासकांनी लक्ष केंद्रित केले होते. विशेषतः नाटककार, इतिहासकार आणि स्त्रीवादी भाष्यकार यांनी जोआनाच्या जटिल आणि मानसिकदृष्ट्या अंतर्दृष्टीपूर्ण चित्रणांचे तसेच तिने केलेल्या सामाजिक नैतिक मूल्यांवरील भाष्याचे महत्त्व विशद केले. वयाच्या ८८व्या वर्षी तिचे हॅम्पस्टेड, लंडन येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Clarke, Norma,”Baillie, Joanna (1762–1851), playwright and poet.”Oxford Dictionary of National Biography. 30. Oxford University Press. Date of access 1 Aug. 2021.

समीक्षण : लीना पांढरे