शाळेने मुलांबरोबर रानात जाऊन खेळता खेळता, गप्पागोष्टी करत त्यांच्या मनात शिक्षणाविषयी कुतूहल निर्माण करणे, म्हणजे कुरण शाळा. कुरण शाळेत पुस्तके, पाटी, फळा, लेखणी यांचा वापर केला जात नाही. निसर्गाच्या निरीक्षणातून व तोंडी संभाषणातून निसर्गाच्या तत्कालिक घटनांचा कार्यकारणभाव शिकविण्याचे आणि समजून देण्याचे कार्य कुरण शाळेत केले जाते. त्याकरिता गप्पागोष्टी, खेळ, गाणी, किरकोळ प्रश्नोत्तरे, प्रत्यक्ष अनुभवावर जोर देणे इत्यादी गोष्टींवर प्रामुख्याने भर दिला जातो. मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळण्याच्या उद्देशाने कुरण शाळेचा शिक्षक आपल्याजवळील पिशवित टेप, फुटपट्टी, घड्याळ, भिंग अशी जुजबी साधने आळीपाळीने सोबत नेत असतो. सृष्टीचे निरीक्षण म्हणजेच कुरण शाळेतले वाचन समजले जाते.

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक यांनी १९५८ मध्ये कोसबाडच्या परिसरात प्राथमिक शिक्षणासाठी ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरू केलेल्या ‘विकासवाडी प्रकल्पाʼतील अनुभवातून कुरण शाळेचा प्रयोग सुरू केला. धान्याच्या पेरणीनंतर वर्षातून सहा महिने आदिवासी मुले-मुली दिवसभर गुरांना रानात चारायला नेत. त्यामुळे मुले शाळेत येत नसत. बोलवायला घरी जाणे, शिक्षणपद्धतीत बदल करणे, शाळेचा दिनक्रम नावीन्यपूर्ण करणे या उपायाचा उपयोग होत नव्हता. यावर ताराबाईंनी शाळेलाच रानात नेण्याचा आणि दफ्तराविना मुलांना निसर्गमय अनुभवातून शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्यातून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन कुरणशाळा ही संकल्पना उदयास आली. ताराबाईंनी केलेल्या कुरण शाळा प्रयोगाची शिक्षणक्षेत्रातील एक खास व मौलिक शोध म्हणून नोंद झालेली आहे.

कुरण शाळेत अनौपचारिक शिक्षणाचा वापर करून मुलांना निसर्ग परिचयातून गणित, भाषा, सामान्यज्ञान, भूगोल, आरोग्यशास्त्र इत्यादी शालेय विषयांची ओळख करून दिली जाते. त्यासाठी शिक्षक आवश्यक अशा पदार्थांचे संग्रहालय मुलांच्या मदतीने तयार करीत असत. या अभ्यासातून मुलांच्या मनात शालेय शिक्षणासाठी योग्य बैठक तयार होईल, असे ताराबाईंना वाटत होते. यातून वैज्ञानिक दृष्टी व प्रयोगशीलतेचा विकास होऊन मुले स्वत:च पाट्या-पेन्सिलीची मागणी करतील, अशीही त्यांची अपेक्षा होती. निसर्गाकडे कुतूहलाने व जाणिवपूर्वक पाहण्याची सवय मुलांना लागली, तर ते आयुष्यभर हा दृष्टीकोन विसरणार नाहीत, असा त्यांचा अंदाज होता. कदाचित लेखन, वाचन याचा कृत्रिम शैक्षणिक क्रिया मुले पुढे वापरणार नाहीत; पण निसर्गवाचन व कार्यकारणभाव यांचा वापर आपल्या जीवनपद्धतीत करतील, असा त्यांना विश्वास वाटत होता.

कुरण शाळेच्या शैक्षणिक प्रक्रियेची वैशिष्ट्ये  :

  • निसर्ग शाळेतील शिक्षक आणि संबंधित कार्यकर्ते मुलांचे खरेखुरे सखेसोबती बनून त्यांच्या जीवनात शिरतात.
  • मुलांना चार भिंती व छप्पर असलेल्या कोंदट शाळेत न बोलाविता शाळाच त्यांच्या बरोबर कुरणात जाते.
  • कृत्रिम व अनैसर्गिक बाबी कटाक्षाने टाळल्या जातात.
  • आकडेमोडीऐवजी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जातो.
  • लेखनाऐवजी श्रवणावर भर दिला जातो.
  • माहिती पाठ करणे म्हणून दाखविणे इत्यादी बौद्धिक व्यायाम वर्ज्य ठरविले जातात.

कुरण शाळेच्या शिक्षकांनी पाळावयाची पथ्ये :

  • शिक्षकाने कुरण शाळेचा खरा अभ्यासक्रम कुरणातच ठरविला पाहिजे.
  • अभ्यासक्रम ठरविताना आणि अध्यापन करताना कुरण शाळेचा साचा होऊ द्यायचा नाही.
  • शिक्षकाने अध्यापन करताना मुलांच्या गुणवत्तेच्या नियमित व तपशिलवार नोंदी ठेवल्या पाहिजे.
  • शिक्षकाने आवश्यक वैज्ञानिक दृष्टी व प्रयोगशीलतेची कास कधीही सोडता कामा नये.

कुरण शाळेत या सर्व गोष्टी तंतोतंत पाळण्यात येऊन कुरण शाळेचा प्रयोग यशस्वी केला जात असे.

आज गुराखी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तितकासा राहिला नाही. कुरणेदेखील फारशी उरली नाहीत. कोसबाडमधील आदिवासी लोकांना शिक्षणाचे महत्त्व जाणवू लागले. आज बहुतेक मुले शाळेत जाऊ लागली आहेत. गुरे पाळण्याचे काम घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडे आले; मात्र कोसबाडच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात आजही कुरण शाळेचा अंतर्भाव दिसून येते. कृत्रिम कुरण शाळा तयार करून हे काम विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते.

ताराबाई मोडक यांच्या कुरण शाळेने एक नवा विचार शिक्षणक्षेत्राला दिला. ‘आजवर विद्यार्थ्यांना जेथे शिक्षणसंस्था असतील तिकडे जावे लागत. यापुढे शिक्षणप्रवृत्तीने स्वत: होऊन जेथे विद्यार्थी राहतात तेथे पोचले पाहिजे,’ या क्रांतिकारी, युगांतरकारी विचारांचा प्रत्यक्ष प्रयोग करून पाहण्याची व तो यशस्वी करण्याची हिम्मत ताराबाई मोडक यांनी दाखविली होती.

संदर्भ : फाटक, पद्मजा, शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक, मुंबई, जून १९८१.

समीक्षक : अनंत जोशी