मोडक, ताराबाई (Modak, Tarabai) : (१९ एप्रिल १८९२ – ३१ ऑगस्ट १९७३). प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक. ताराबाई या चाकण (जि. पुणे) येथील केळकर घराण्यातील. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. वडिलांचे नाव सदाशिवराव व आईचे उमाबाई. वडील सुबोध पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादनाबरोबरच हितोपदेश, कामगार ही साप्ताहिक आणि ज्ञानदीप हे मासिक चालवत असत. आईही स्त्री शिक्षण, विधवा विवाहासाठी काम करत असे. बुद्धिमान व सुधारणावादी आईवडीलांमुळे ताराबाईंकडे बुद्धिमत्तेचा वारसा आला. १९१४ मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून बी. ए. झाल्या. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत मुंबई येथे त्यांची कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी ओळख होऊन १९१५ मध्ये त्यांचा नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह झाला. त्याला दोन्ही घरच्या लोकांचा विरोध होता. कृष्णा मोडक अमरावती येथे वकिलीव्यवसाय करीत. त्यांना प्रभा ही मुलगी होती. पुढे ताराबाईंचे भावनगर, राजकोट, अमरावती, विकासवाडी इत्यादी ठिकाणी वास्तव्य झाले.

ताराबाईंनी १९२२ मध्ये राजकोट येथे बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये लेडी सुपरिटेंडन्ट म्हणून रुजू झाल्या. सदर कॉलेजमध्ये या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत. त्यानंतर त्यांनी गिजुभाई बधेका (Gijubhai Badheka) यांच्या साह्याने भावनगर येथे माँटेसरीच्या तत्त्वांवर आधारलेली ‘गीता शिक्षण पद्धती’ निश्चित केली. हाच ताराबाईंच्या बालशिक्षण कार्याचा प्रारंभ होय. शिक्षणाचा खरा पाया मुलांच्या बालवयातच घातला जाण्याची शक्यता व आवश्यकता असते, या दृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक शिक्षणाचे नवीन पाऊल टाकले. १९२३ – १९३२ ही नऊ वर्षे त्यांनी भावनगरच्याच दक्षिणामूर्ती शिक्षणसंस्थेत प्राध्यापिका म्हणून काम केले. १९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. पुढे बालशिक्षणाचे हे लोण महाराष्ट्रात पसरले. १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. या संस्थेने पुढे पूर्वप्राथमिक अध्यापन मंदिर सुरू केले. यातून मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषांच्या हजारांहून अधिक शिक्षक-शिक्षिकांचे प्रशिक्षण झाले.

ताराबाईंनी गिजुभाईंच्या मृत्यूनंतर पुढील १२ वर्षे नूतन बालशिक्षण संघाची धुरा वाहिली. ग्रामीण भागात बालशिक्षणाचा प्रसार करणे हे या संघाचे काम होते. खेड्यांमध्ये शास्त्रीय पद्धतिने मात्र कमी खर्चात बालवाड्या चालविण्यासाठी १९४५ मध्ये ताराबाईंनी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापिले. या संस्थेतूनच ग्रामीण बालवाडी व ग्राम बाल अध्यापन मंदिर या संस्था निघाल्या. या संस्थांचा लाभ आदिवासी मुलांना मिळावा, म्हणून त्यांच्या आदिवासी परिसरात आणि अंगणात बालवाडी चालविण्याचा उपक्रम करण्यात आला. या अंगणवाडीमुळे आदिवासींच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ (Anutai Wagh) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. १९५७ मध्ये बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र कोसबाड येथे हलविण्यात आले. ताराबाईंनी कोसबाडच्या परिसरात प्राथमिक शिक्षणासाठी ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी सुरू केलेल्या विकासवाडी या प्रकल्पातील अनुभवातून कुरणशाळेचा प्रयोग सुरू केला. प्राथमिक शाळेत मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न होता. मुले शाळेत हजर राहावे म्हणून ताराबाईंनी गृहभेटी, प्रचार फेऱ्या, दिंडी, मुलांसाठी बैलगाडीची सोय, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबविले. त्याचबरोबर भातशेती ह्या मूलोद्योगाच्या माध्यमातून विज्ञान, गणित, भाषा हे विषय शिकविण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुलांना शिक्षण घेण्यात गोडी देखिल वाटू लागली; परंतु धान्याच्या पेरणीनंतर सहा ते दहा वयोगटातील आदिवासी मुले व काही मुली पूर्ण दिवस गुरांना रानात चारायला नेत. त्यामुळे मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न पुन्हा ताराबाईंपुढे निर्माण झाला. यावर उपाय म्हणून ताराबाईंनी शाळेलाच रानात नेण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि त्याला कुरणशाळा (Meadow School) असे नाव दिले. शहराच्या ठिकाणाहून कोणतेही शैक्षणिक साधने न आणता त्यांनी विद्यार्थ्यांना रंग, स्पर्श, वजन मापन, अंक, आकार इत्यादी संकल्पना समजावे यांकरिता पिसे, बांगळ्या, शंख, दगडं, बिया, माती, रेती, बांबुफळे, डब्या इत्यादी स्थानिक वस्तूंचाच वापर केला. ताराबाईंनी १९५८ मध्ये आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या कुरण शाळा प्रयोगाची शिक्षणक्षेत्रातील एक खास व मौलिक शोध म्हणून नोंद झालेली आहे. पुढे १९७४ मध्ये भारत सरकारने या प्रयोगाचा आढावा घेणारी कुरणशाळा (मराठी) मेडोस्कूल (इंग्रजी) या पुस्तिका ताराबाईंकडून लिहून घेतली.

कुरण शाळेबरोबरच रात्रीची शाळा, व्यवसायशिक्षण हे पूरक प्रकार प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आले. येथील प्रशिक्षण महाविद्यालयात ताराबाईंनी पुरस्कारिलेली शिक्षणयोजना चालू असून तिला राज्य सरकारची मान्यता लाभली आहे. हा एक नवीन प्रयोग असल्याने आदिवासी विभागातील एकशिक्षकी शाळांतील मुलांच्या बुद्धिमापनासंबंधी अधिक संशोधन करून नव्या अभ्यासक्रमाची रचना, बालसाहित्यनिर्मिती व विज्ञानशिक्षण देण्याचे प्रयोग सुरू आहेत. परंपरागत शिक्षणपद्धतीमधील जबरदस्त शिक्षेच्या, वेळापत्रकाच्या सर्व कल्पनांच्या मुळावर घाव घालणाऱ्या माँटेसरीच्या मूळ तत्त्वांना त्यांनी धक्का लागू दिला नाही; मात्र त्यांचे शिक्षणविषयक धोरण एका बाजूने राष्ट्रीय, तर दुसऱ्या बाजूने स्थलकालातीत होते. आदिवासी मुलांचे जीवन विकसित करण्यासाठी ताराबाईंनी आपले आयुष्य वेचले.

ताराबाई या १९४०–१९५४ या काळात ग्राम बालशिक्षण संघाच्या चिटणीस होत्या. यादरम्यान त्यांनी शिक्षण पत्रिका या मराठी, गुजराती, हिंदी भाषिक मासिकाचे संपादन केले. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासदही होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

ताराबाई यांचे मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ :

 • फाटक, पद्मजा, शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक, मुंबई, १९८१.
 • बालविकास व बालशिक्षणाची मूलतत्वे, य. च. म. मु. वि., नासिक.

समीक्षक – संतोष गेडाम

This Post Has 7 Comments

 1. खुप उत्तम व अभ्यास पूर्ण लिखान. डाॅ.संगीताच्या महाजन आपल्याला खुप खुप शुभेच्छा

 2. Amruta bhalerao

  अप्रतिम लेखन.. ताराबाई यांची नव्याने ओळख लेखामधून होते

  .

 3. जितेंद्र महाजन

  अतिशय उत्कृष्ट व उद्बोधन लेखन केले आहे माझ्या एका लाडक्या लेखिकेने ते संपूर्ण वाचून मन खरोखर तृप्त झाले.एखादी व्यक्तिरेखा चित्रण करणं किंवा ते वाचन करताना लक्षात आले की किती सखोल व गाढ अभ्यास केला असेल हे प्रत्यक्ष जाणवले.आपण खरोखर एक उललेखनीय कामगिरी केली आहे.मला तरी आज ताराबाई मोडक यांची संपूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

 4. मंगला दोरीक

  छान संग्रहीत ठेवण्यायोग माहिती ?????

 5. प्रतिभा पाटील

  संगिता मॅडम , आपला लेख ताराबाई मोडक यांच्या विषयी चा सखोल अभ्यासचे उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण जीवनपट मोजक्या शब्दात मांडले आपण. आपल्या लेखा द्वारे, ताराबाई मोडक यांचे कार्यही समजले. या साठी आपले आभार मानावे तेवढे थोडे होईल.
  आपल्या येणाऱ्या अनेक लेखांचे आतुरतेने वाट पाहणारी वाचक, पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा ??
  – सौ प्रतिभा पाटील

 6. Dr.Pingala Dhande

  Very useful information and nice writing. Very good work

प्रतिक्रिया व्यक्त करा