फ्रिअरी, पाउलू (Freire, Paulo) : (१९ सप्टेंबर १९२१ – २ मे १९९७). प्रसिद्ध ब्राझीलीयन शिक्षणतज्ज्ञ व तत्त्वज्ञ. पाउलू यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात ब्राझीलमधील रेसिफ येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव पाउलू रिग्लस निवेस फ्रिअरी असे होते. इ. स. १९२९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक महामंदीचा तडाखा ब्राझीलला बसल्याने इ. स. १९३० साली गरिबी आणि उपासमारीचा परिचय पाउलू याना झाला. त्यामुळे इ. स. १९३१ मध्ये त्यांचे कुटुंब कमी खर्च येणाऱ्या जाबोटाओ डॉस गुआरारापेस या शहरात राहण्यास गेले. ३१ ऑक्टोबर १९३३ मध्ये वडिलांच्या अकाली निधनाने त्यांचे शिक्षण काही काळ मागे पडले. सभोवताली वावरणाऱ्या गरीब व उपासमार मुलांमध्ये राहिल्याने प्राप्त झालेल्या त्या अनुभवातून त्यांना शिक्षणाबाबतचा नवीन विचार सुचला. त्यांच्या कुटुंबात आर्थिक सुधारणा झाल्यानंतर त्यांनी मान्यताप्राप्त सस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. इ. स. १९४३ मध्ये त्यांनी  रेसिफ विद्यापीठातील विधीशाखेत प्रवेश घेतला. तेथे त्यांनी घटनाशास्त्र आणि भाषेतील मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. पुढे त्यांनी वकिली न करता माध्यमिक शाळेमध्ये पोर्तुगीज शिकविण्यास सुरुवात केली. त्यांनी इ. स. १९४४ मध्ये एल्झा माइआ कोस्टा दे ऑलिविअरा या आपल्या सहकारी शिक्षिकेशी लग्न केले. त्यांना पाच मुले होती. पत्नीच्या निधनानंतर (१९८६) त्यांनी मारीआ हिच्याशी दुसरे लग्न केले.

पाउलू यांची इ. स. १९४६ मध्ये पिर्नाम्बुको राज्यात शिक्षण आणि सामाजिक सेवा संस्कृती विभागाचे  प्रमुख पदी नेमणूक झाली. गरीब लोकांबरोबर काम करताना त्यांनी स्वतःची non orthodox form of liberation theology विकसित केली. १९६१ मध्ये ते रेसिफ विद्यापीठातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख झाले. त्यांनी ‘लोक असाक्षरता’ या प्रकल्पात १९६२ मध्ये सहभागी होऊन उसतोड कामगारांना पंचेचाळीस दिवसांत ‘वाचन’ आणि ‘लेखन’ शिकविले. त्यांच्या या यशस्वी चळवळीचा परीणाम म्हणून ब्राझील सरकारने पुढे ती चळवळ अनेक राज्यांमध्ये सुरू केली. त्यांनी १९६३-६४ मध्ये २,००० सांस्कृतिक केंद्र विकसित करून २०,००,००० असाक्षर लोकांना साक्षर करण्याचे नियोजन केले; मात्र १९६४ मध्ये त्यांचे साक्षरतेचे प्रयत्न लष्कराने दडपून टाकले. त्या वेळी त्यांना ७० दिवस तुंरुगातही टाकले. पुढे त्यांनी बोलिव्हिया व नंतर चिली येथे युनोस्कोच्या माध्यमातून प्रौढ शिक्षणाद्वारे शेतीविषयक सुधारणा या प्रकल्पासाठी काम केले. हावर्ड विद्यापीठात १९६९ मध्ये ‘अभ्यागत प्राध्यापक’ म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले. पुढे १९७० मध्ये त्यांनी जिनीव्हा येथील वर्ड कौन्सिल ऑफ चर्चिलमध्ये सल्लागार म्हणून कार्य केले. या दरम्यान त्यांनी आफ्रिकेतील पोर्तुगीज कॉलनीमध्ये शैक्षणिक सुधार कार्यक्रमात सल्लागार म्हणून काम केले. १९८० ते १९८६ या काळात त्यांनी साऊँ पाउलू येथील प्रौढ साक्षरता प्रकल्पामध्येही मार्गदर्शक म्हणून कार्य केले.

पाउलू यांनी १९६७ मध्ये एज्युकेशन ॲज दी प्रॅक्टिस ऑफ फ्रिडम हे आपले पहिले पुस्तक प्रकाशीत केले. नंतर १९६८ मध्ये त्यांनी पेडॅगॉजी ऑफ दी ऑप्रेस्ड हे पुस्तक प्रथम पोर्तुगीजमध्ये प्रकाशीत केले. त्यांनतर त्याचे इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेत भाषांतर करण्यात आले. या पुस्तकात शिक्षक आणि समाज यांच्या सहसंबंधाबाबत नवीन प्रतिमानाची मांडणी त्यांनी केली. विद्यार्थी हा निष्क्रिय अध्ययनार्थी नसून शिक्षक आणि विद्यार्थी एकत्रित ज्ञान निर्मिती करणारे असतात, असा विचार त्यांनी पुस्तकात मांडला. तसेच त्यांनी यात प्रथम समाजाचे वास्तव मांडून प्रचलित शिक्षण पद्धतीतील दोष सांगितलेले आहेत. प्रौढांसाठी संवाद पद्धतीने शिक्षण देण्याची गरज सांगून त्यातील अडचणी, व्यूह रचनांची मांडणी केलेली आहे. संवादामध्ये कृती व प्रतिक्रिया दोन्ही अपेक्षित आहे. संवादासाठी ममत्व, करुणा, परंपराविषयी पूर्ण विश्वास, परिवर्तनाविषयी आस्था, कृतियुक्त विचार, चिकित्सक प्रक्रियेची अखंडितता अपेक्षित आहे आणि त्यांच्यामध्ये अस्मिता जागृत करणे हा हेतू आहे. सवांद पद्धतीचा अभ्यासक्रम हा पूर्वनिर्धारित नसून तो निर्मितीश्रम आणि कृतीमूलक असतो. त्यांनी आपल्या पुस्तकातील शिक्षणक्रमांची चार गटांत विभागणी केलेली आहे. त्यात संघटकाची पूर्वतयारी, प्रश्नाची उकल, मधल्या काळात तज्ज्ञांशी चर्चा करून क्रम ठरविणे, शेवटी निष्कर्ष आणि कृतींचे मूल्यमापन करणे यांचा समावेश आढळतो.

पाउलू यांच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी बेल्जियम येथील बालडून राजाकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार (१९८०), युनोस्कोकडून शांतता व शिक्षणाबद्दलचा पुरस्कार (१९८६), अँडिज बिलो इंटर अमेरिकन पुरस्कार (१९९२) इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. मुक्त विद्यापीठकडून आणि ओमाहा येथील नेब्रास्का विद्यापीठाकडून त्यांना सन्मानाने विद्यावाचस्पती पदवी अनुक्रमे १९७३ व १९९६ मध्ये देण्यात आली. २०१२ मध्ये पाउलू फ्रिअरी सामाजिक न्याय धर्मदाय शाळा, तसेच  हॉलहोके येथे स्वतंत्र पब्लिक हायस्कूल सुरू करण्यात आले. १९९२ मध्ये कॅरोमोन्ट विद्यापीठाकडून त्यांना पदवी प्रदान करण्यात आली. पाउलू यांनी एकूण २० पुस्तकांचे लेखक व सहलेखक केले असून ती पुस्तके शिक्षण, अध्यापनशास्त्र आणि इतर विषयांशी संबंधित आहेत.

पाउलू यांचे निधन साउँ पाउलू येथे झाले.

समीक्षक : के. एम. भांडारकर