जमिनीवरील विविध स्रोतांमधून मूलद्रव्यांचा अव्याहत ओघ जलप्रवाहात येऊन मिळत असतो. त्यामुळे अशा जलसंस्था आणि त्यांचे कार्य यासाठी आवश्यक असलेल्या मूलद्रव्यांपेक्षा वाढीव प्रमाण पाण्यात आढळते. याला युट्रोफिकेशन असे म्हणतात. सागरात पाण्याचे सगळेच प्रवाह येऊन मिळतात, त्यामुळे येथील समुद्री परिसंस्थेला युट्रोफिकेशनचा मोठा धोका वर्तविला जातो. नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य घटकांबरोबरच अन्य अनेक रासायनिक घटक समुद्राच्या पाण्यात मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय कारखाने आणि अन्य उद्योगातून विसर्जित होणारे अवजड धातू मातीमधून शोषून घेऊ शकणार्‍या खारफुटींकडे अशा दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे घटक म्हणून मोठ्या प्रमाणावर बघितले जात आहे. मोठ्या प्रमाणावर असलेले बायोमास आणि विस्तृतमुळे खारफुटींना अवजड धातू ग्रहण करणे शक्य होते. असे असले तरीही खारफुटींवर युट्रोफिकेशनचे काही नकारात्मक परिणामदेखील दिसून आले आहेत.

लाल समुद्रामध्ये (Red Sea) केलेल्या एका अभ्यासानुसार, खाडीमधील सांडपाण्याच्या भागात वाढलेल्या तिवर (Avicennia marina) ह्या खारफुटी वनस्पतीची वाढ खुंटलेली दिसली. श्वसनमुळांच्या -हासामुळे हे घडले असण्याची शक्यता आहे. युट्रोफिकेशनमुळे मातीमधील क्षारता खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. याच संदर्भाने एका अभ्यासानुसार क्षारतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले की, एका विशिष्ट प्रकारच्या समुद्री पोखरकिड्यांचे प्रमाण वाढते. तसेच नायट्रोजनच्या वाढलेल्या प्रमाणासोबतच सांडपाण्यामधील रासायनिक कीटकनाशकांचे घटक, अवजड धातू आणि काही जैविक पदार्थदेखील खारफुटींना धोकादायक ठरतात. पानांची रोडावलेली संख्या आणि खोडाचा कमी झालेला व्यास ही काही या नकारात्मक परिणामांची लक्षणे आहेत. खारफुटी जंगले हा नायट्रस ऑक्साइडचा लक्षणीय स्त्रोत आहे. खारफुटी भागातल्या युट्रोफिकेशनमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नायट्रस ऑक्साइड खारफुटी वनस्पतींकडून बाहेर टाकले जाते. नायट्रस ऑक्साइड हा एक सक्षम हरितगृह वायू आहे, जो हवामानातील बदलांसाठी कारणीभूत ठरतो.

वातावरणातील बदलांचे मुख्य कारण कार्बन डाय – ऑक्साइडचे हवेमध्ये वाढलेले प्रचंड प्रमाण असे नमूद केले जाते. समुद्री भागामध्ये वातावरणातील हे बदल प्रकर्षाने जाणवतात. तापमानातील वाढ, समुद्राची वाढणारी पातळी, वादळांची वाढलेली वारंवारता हे काही ठळक बदल सहाजिकच खारफुटींवर परिणाम करतात. फार्न्सवर्थ आणि त्यांचे सहकारी यांनी १९९५ मधे कांदळ (Rhizophora mangle) या खारफुटी वनस्पतीमध्ये वाढत्या कार्बन डाय – ऑक्साइडमुळे झालेले बदल नमूद केले. खोडाचा विस्तार, पानांची वाढलेली संख्या, मुळांची वाढलेली संख्या यांसारखे परिणाम झालेले दिसले. ह्यामुळे जरी खारफुटींच्या वाढीचे प्रमाण वाढलेले असले तरीही हे प्रमाण खारफुटींवर झालेल्या नकारात्मक परिणामांमुळे कमी झालेल्या वाढीच्या प्रमाणापेक्षा अल्पच आहे.

कार्बन डाय – ऑक्साइडच्या वाढलेल्या प्रमाणामुळे प्रकाशसंश्लेषणाचे प्रमाण जरी वाढू शकत असले, तरीही प्रकाशसंश्लेषण आणि वनस्पतींचे श्वसन हे तापमानाला संवेदनशील असते. दिवसभरातल्या तापमान वाढीमुळे प्रकाशसंश्लेषणाचा दर कमी होतो. त्यामुळे वाढलेले तापमान व कोरडी हवा यांमुळे खारफुटींची उत्पादन क्षमता कमी होते. आधीच अतिशय संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या समुद्री परिसंस्थेमधे प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्याचा प्रयत्न करणार्‍या खारफुटींना हवामानातील बदलांचा मोठा धोका संभवतो.

संदर्भ :

  • Farnsworth, EJ; Ellison, AM; Gong, WK; Bazzaz, FA Ecophysiological responses of mangrove seedlings to two facets to climate change. Bull Ecol Soc Am 76 [Suppl]: 88,1995.
  • Mandura, A.S. A mangrove stand under sewage pollution stress : Red Sea. Mangroves and Salt Marshes, Volume 1, 255–262, 1997.
  • Yim, M.W. & Tam, N.F.Y. Effects of Wastewater-borne Heavy Metals on Mangrove Plants and Soil Microbial Activities. Marine Pollution Bulletin. Volume 39, Issues 1–12, 179-186, 1999.

समीक्षक : शरद चाफेकर