रामन, सुकुमार :  ( ३ एप्रिल १९५५ ) सुकुमार रामन यांचा जन्म चेन्नई येथे झाला.  त्यांना लहानपणापासून जंगले आणि वन्य प्राण्यांची आवड होती. त्यांच्या आजीने त्यांना वनवासी असेच नाव ठेवले होते. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांना वनसंवर्धनात आवड असल्याने विज्ञान शाखेतील  पदवीसाठी त्यांनी वनस्पतीशास्त्र हा विषय निवडला. ते मद्रास विद्यापीठातून बी. एस्सी. आणि नंतर वनस्पतीशास्त्रात एम. एस्सी. झाले.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्यांनी पर्यावरणशास्त्र  विषयात पीएच्.डी.साठी काम सुरू केले. हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष म्हणजे आवश्यक जमीन हा त्यांच्या प्रबंधाचा मुख्य संदर्भ होता. या विषयात त्यांना पीएच्.डी. प्रदान करण्यात आली. नंतर ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पर्यावरणशास्त्र केंद्रात प्राध्यापकपदी रुजू झाले.

कालांतराने फुलब्राईट स्कॉलरशिप मिळवून ते अमेरिकत गेले. तेथील प्रतिष्ठित प्रिन्स्टन विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट नंतरची अधिछात्रवृत्ती (post-doctoral fellowship) मिळवून काम केले.

सुकुमार हे  गेली तीस-पस्तीस वर्षे आशियाई हत्ती या विषयात संशोधन करीत आहेत. ‘मुक्त वावरणाऱ्या हत्तीमधील ताण शरीरक्रियाविज्ञान’ (Current project is Assessment of stress-physiology in free-ranging Asian elephants ) हा त्यांचा सध्याच्या संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या संशोधनामुळे त्यांना हत्ती पुरुष – सुकुमार या नावाने ओळखले जाते.

हत्तींना सुरक्षित अधिवास लाभावा यासाठी सुकुमार यांनी देशभरातील वनक्षेत्रांमध्ये स्वतः जाऊन अनेक सर्वेक्षणे केली. हत्तींच्या कळपांना एका संरक्षित वनक्षेत्रापासून दुसऱ्या वनक्षेत्रापर्यंत सुकुमार यांनी सुरक्षित जोडमार्ग आखून उपलब्ध केले. असे जोडमार्ग नसतील तर रेल्वेगाड्या, ट्रक खाली येऊन हत्तींचे कळपच्या कळप कसे चेंगरून मरतात याच्या दुखःद बातम्या आपण वाचतो. उच्च विद्युत दाबाच्या तारा उघड्या झाल्या असतील तर त्यांच्या स्पर्शाने हत्ती मरतात. ह्या समस्येकडे सुकुमार यांनी लक्ष वेधले आणि सोंड उंचावली तरी हत्ती विजेच्या तारांना स्पर्श करू शकणार नाही अशी व्यवस्था करवली. हत्तींपासून खेडुतांच्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण व्हावे यासाठी खेडेगावांभोवती, शेता-पिकांभोवती कुंपणे घालण्यासारखे प्रयोग करून पाहिले. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली. जीपीएस (कृत्रिम उपग्रह, सॅटेलाईट) प्रणालीने हत्तींच्या हालचाली टिपून वनरक्षकांना सावध करणे. हत्तींना पिकांकडे, मानवी वस्तीकडे जाण्यास आडकाठी करणे आणि हत्ती आणि माणूस यात कटुता येऊ न देणे या कृतींनी सुकुमार यांनी हत्ती आणि माणूस संघर्षात, त्या दोघांचेही हित जपण्याचा व्यावहारिक मार्ग काढायचा प्रयत्न केला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेतर्फे (UNESCO), नीलगिरी आरक्षित जीव क्षेत्र (Nilgiri Biosphere Reserve) स्थापन करण्यात सुकुमार यांनी मोलाची कामगिरी बजावली. या आरक्षित जीवक्षेत्रात त्यांनी हवामानातील बदल, उष्ण कटिबंधातील जंगले आणि वन्यजीव संरक्षण, संवर्धन या गोष्टींशी संबंधित संशोधन केले. भारत सरकारला हत्ती प्रकल्पात हत्तींचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तांत्रिक बाबतीत आधार व सल्ला देणाऱ्या दिशादर्शक समितीचे सुकुमार सदस्य होते. इंडियन अकादमी ऑफ सायन्सेसचे आणि इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे सुकुमार सदस्य झाले.

जागतिक संवर्धन संघाच्या (World Conservation Union) आशियाई हत्ती विशेषज्ञ समूहाचे, सुकुमार सात वर्षे अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना अनेक पुरस्कार  मिळाले. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे इंग्लंडमधील व्हिटली सुवर्ण पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय कॉसमॉस पुरस्कार. वन्यजीव संवर्धनाचे काम अतिशय तळमळीने करणाऱ्या कार्यकर्त्याला व्हिटली सुवर्ण पुरस्कार दिला जातो. तर जपानतर्फे दिला जाणारा आंतरराष्ट्रीय कॉसमॉस पुरस्कार मानव आणि निसर्ग यात सौहार्द नांदण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.

हत्तींसंबंधी सुकुमार यांनी लिहिलेले आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेस यासारख्या प्रतिष्ठित प्रकाशनगृहांनी प्रकाशित केलेले चार ग्रंथ शास्त्रज्ञांपासून विज्ञानप्रेमी जनसामान्यांपर्यंत लोकप्रिय ठरले आहेत. या पुस्तकांतून हत्तींसंबंधीचे शास्त्रीय ज्ञान, त्यांची वर्तणूक, हत्तींचे संरक्षण, जतन, संवर्धन, मानवाशी घडणारा संघर्ष आणि त्यांचे व्यवस्थापन यांची माहिती दिली आहे. त्यासाठी अत्यंत आवश्यक लोकसहभाग मिळविण्याची गरज आणि मार्ग हे सर्व समाजापुढे आणले आहेत. आफ्रिकेत घडणाऱ्या हत्तींच्या हत्या सुळे (हस्तिदंत) तसेच मांसासाठी होतात. परंतु आशियाई संस्कृतीत – भारत, इंडोनेशिया, सुमात्रा आणि बोर्निओ, म्यानमार, मलेशिया, लाओस, श्रीलंका, थायलंड – या देशांत सुदैवाने बहुसंख्य सामान्य लोकांच्या मनात हत्तींबद्दल आत्मीयता आहे. देवळांत, उत्सवांमध्ये हत्तींना मानाचे स्थान आहे त्यामुळे मांसासाठी हत्ती मारणे सहसा घडत नाही. हत्तींचे संरक्षण, जतन, संवर्धन, इत्यादीमध्ये स्थानिक, विशेषतः वनवासी युवकांना वनविभागात बारमाही काम देऊन पूर्ण मानवजातीचा फायदा करून घेता येईल. एका सर्वेक्षणानुसार भारतात सुमारे अडीच हजार हत्ती जंगलात मोकळे नसून माणसांच्या ताब्यात आहेत. प्रवासी आणि दाट जंगलातील मालवाहतूक, झाडे पाडणे आणि त्यांचे ओंडके वाहणे, सर्कसमधील कामे अशा गोष्टींसाठी ते वापरले जातात. काही हत्ती प्राणिसंग्रहालये, देवस्थाने इ. ठिकाणी राहतात. अशा पाळीव हत्तींना चांगली वागणूक मिळेल हे पाहणे गरजेचे आहे. असे नवे मुद्दे सुकुमार सतत माध्यमापर्यंत पोहोचवत  आहेत.

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा