शेवगा (मोरिंगा ओलिफेरा) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) शेंगा.

(ड्रमस्टिक ट्री). शेवगा ही वनस्पती मोरिंगेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. मोरिंगा प्रजातीत शेवगा ही एकमेव वनस्पती आहे. ती मूळची भारताच्या वायव्य भागातील असून जगातील उष्ण तसेच उपोष्ण प्रदेशांत लागवडीखाली आहे. शेवग्याच्या उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर असून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रात शेतांमध्ये, बागांमध्ये तसेच शहरांमध्ये लागवडीखाली शेवग्याचे वृक्ष दिसून येतात.

शेवगा हा वेगाने वाढणारा पानझडी वृक्ष असून १०–१२ मी. उंच वाढतो. खोडाचा घेर सु. ४५ सेंमी. असून ते मऊ व ठिसूळ असते. साल जाड, त्वक्षीय (बुचासारखी) व भेगाळलेली असते. फांद्या पांढरट-राखाडी रंगाच्या असतात. पाने संयुक्त, सु. ४५ सेंमी. लांब, त्रिपिच्छकी व लंबगोल असून सर्व दल व दलके समोरासमोर असतात. फुलोरे स्तबक प्रकारचे असून फांद्यांच्या टोकांस येतात व त्यावर सुगंधी पांढरी फुले येतात. वनस्पतीची लागवड केल्यानंतर तिला सहा महिन्यांत फुले येतात. फळे (शेंगा) लोंबती, २०–४५ सेंमी. लांब असून त्यांना तीन कडा असतात. शेंगांमध्ये अनेक करड्या व गोलाकार बिया असून त्यांना पातळ कागदासारखे तीन पंख असतात. शेंगा पिकल्या की आपोआप तडकून त्यातील बिया वाऱ्याने पसरतात. शेवग्याच्या एका झाडापासून वर्षाला ३००–५०० शेंगा मिळतात.

आयुर्वेदानुसार शेवग्याचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे आणि बिया इ. भाग उपयुक्त आहेत. मुळांचा रस दमा, संधिवात, प्लीहा आणि यकृतवृद्धी, मुतखडा यांवर उपयोगी असतो. मुळांच्या सालींचा रस कानदुखीवर वापरतात. त्याची साल कोकणात नारूसाठी वापरतात. पाने व फुले कृमिनाशक, वायुनाशी मानली जातात. शेंगा आतड्याच्या कृमींवर प्रतिबंधक आहेत.

शेवग्याच्या शेंगांचा उपयोग आहारात अनेक प्रकारे करतात. शेवग्याच्या पानांपासून -समूह जीवनसत्त्वे, आणि के जीवनसत्त्वे मिळतात, तर शेंगांपासून -जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँगनीज इत्यादी खनिजे मिळतात. काही ठिकाणी बिया शेंगदाण्याप्रमाणे भाजून खातात. शेंगा व पाने यांची भाजी करतात. शेवग्याचा पाला शेळ्यामेंढ्याही खातात. बियांपासून काढलेल्या तेलाला बेन तेल (ओलेइक आम्ल, पामिटिक आम्ल, स्टिअरिक आम्ल, बेहेनिक आम्ल यांचे मिश्रण) म्हणतात. बेन तेल केस, त्वचा यांवरील सौंदर्यप्रसाधनात मिसळण्यासाठी, संधिवातावर मालिश करण्यासाठी तसेच घड्याळे व इतर सूक्ष्म यांत्रिक उपकरणांच्या दुरुस्तीसाठी ऑलिव्ह तेलासारखे वापरतात. या तेलाचा वापर जैवइंधन म्हणून देखील केला जातो. बेन तेल काढल्यानंतर मिळालेली पेंढ पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतात. त्याद्वारे पाण्यातील मातीचे कण खाली बसतात आणि पाणी स्वच्छ होते. काही देशांत जमिनीची धूप रोखण्यासाठी, जोराने वाहणाऱ्या वाऱ्याला रोध करण्यासाठी शेवग्याची लागवड करतात. भारतात आणि आफ्रिकेतील काही देशांत कुपोषणावर मात करण्यासाठी शेवग्याचा वापर करतात. अवर्षणग्रस्त भागात लागवडीसाठी शेवगा हा योग्य वृक्ष आहे.

कुलकर्णी, किशोर

 

शेवगा ही वनस्पती मोरिंगेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. मोरिंगा प्रजातीत शेवगा ही एकमेव वनस्पती आहे. ती मूळची भारताच्या वायव्य भागातील असून जगातील उष्ण तसेच उपोष्ण प्रदेशांत लागवडीखाली आहे. शेवग्याच्या उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर असून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रात शेती, बाग तसेच शहरांमध्ये लागवडीखाली शेवग्याचे वृक्ष दिसून येतात.

शेवगा हा वेगाने वाढणारा पानझडी वृक्ष असून १०–१२  मी. उंच वाढतो. खोडाचा घेर सु. ४५ सेंमी. असून ते मऊ व ठिसूळ असते. साल जाड, त्वक्षीय (बुचासारखी) व भेगाळलेली असते. फांद्या पांढरट-राखाडी रंगाच्या असतात. पाने संयुक्त, सु. ४५ सेंमी. लांब, त्रिपिच्छकी व लंबगोल असून सर्व पिच्छके व पिच्छिका समोरासमोर असतात. फुलोरे स्तबक प्रकारचे असून फांद्यांच्या टोकांना येतात व त्यावर सुगंधी पांढरी फुले येतात. वनस्पतीची लागवड केल्यानंतर तिला सहा महिन्यात फुले येतात. फळे (शेंगा) लोंबती, २०–४५ सेंमी. लांब असून त्यांना तीन कडा असतात. शेंगांमध्ये अनेक करड्या व गोलाकार बिया असून त्यांना पातळ कागदासारखे तीन पंख असतात. शेंगा पिकल्या की आपोआप तडकून त्यातील बिया वाऱ्याने पसरतात. शेवग्याच्या एका झाडापासून वर्षाला ३००–५०० शेंगा मिळतात.

आयुर्वेदानुसार शेवग्याचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे आणि बिया इ. अवयव उपयुक्त आहेत. मुळांचा रस दमा, संधिवात, प्लीहा आणि यकृतवृद्धी, मुतखडा यांवर उपयोगी असतो. मुळांच्या सालींचा रस कानदुखीत वापरतात. त्याची साल कोकणात नारूसाठी वापरतात. पाने व फुले कृमिनाशक, वायुनाशी मानली जातात. शेंगा आतड्याच्या कृमींवर प्रतिबंधक आहेत.

शेवग्याच्या शेंगांचा उपयोग आहारात अनेक प्रकारे करतात. शेवग्याच्या पानांपासून बी-समूह जीवनसत्त्वे, आणि के जीवनसत्त्वे मिळतात, तर शेंगांपासून -जीवनसत्त्व, तंतूमय पदार्थ, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँगॅनीज इत्यादी खनिजे मिळतात. काही ठिकाणी बिया शेंगदाण्याप्रमाणे भाजून खातात. शेंगा व पाने यांची भाजी करतात. शेळ्या-मेंढ्याही ती खातात. बियांपासून काढलेल्या तेलाला बेन तेल (ओलिक आम्ल, पामिटीक आम्ल, स्टिअरीक आम्ल, बेहेनिक आम्ल यांचे मिश्रण) म्हणतात. बेन तेल केस, त्वचा यांवरील सौंदर्यप्रसाधनात मिसळण्यासाठी, घड्याळे व इतर सूक्ष्म यांत्रिक उपकरणांच्या दुरुस्तीसाठी ऑलिव्ह तेलासारखे वापरतात. ते संधिवातावर मालिश करण्यासाठी, तसेच जैवइंधन म्हणून वापरतात. बेन तेल काढल्यानंतर मिळालेल्या केकचा वापर पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतात. त्याद्वारे पाण्यातील मातीचे कण खाली बसतात आणि पाणी स्वच्छ होते. काही देशांत जमिनीची धूप रोखण्यासाठी, जोराने वाहणाऱ्या हवेला रोध करण्यासाठी शेवग्याची लागवड करतात. भारतात आणि आफ्रिकेतील काही देशांत कुपोषणावर मात करण्यासाठी शेवग्याचा वापर करतात. अवर्षणग्रस्त भागात लागवडीसाठी शेवगा हा योग्य वृक्ष आहे.