सदाफुली (कॅथरँथस रोझियस) : फुलांसहित वनस्पती

(मादागास्कर पेरिविंकल). एक सर्वपरिचित बहुवर्षायू वनस्पती. ही वनस्पती ॲपोसायनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅथरँथस रोझियस आहे. पूर्वी ही वनस्पती व्हिंका रोझिया या शास्त्रीय नावाने ओळखली जात असे. अजूनही ती व्हिंका अशा संक्षिप्त नावाने ओळखली जाते. सदाफुलीचे मूलस्थान मादागास्कर असून जगाच्या उष्ण प्रदेशात तिची लागवड शोभेसाठी आणि तिच्यात असलेल्या औषधी गुणधर्मांसाठी केली जाते. कॅथरँथस प्रजातीत एकूण आठ जाती असून त्यांपैंकी कॅ. रोझियस जातीचा प्रसार अधिक झालेला आहे.

सदाफुली ही सदाहरित वनस्पती सु. एक मी. उंच वाढते. पाने साधी, समोरासमोर, अंडाकार ते लांबट, हिरवी व चकचकीत असून सु. २.५ सेंमी. लांब आणि १–३.५ सेंमी. रुंद असतात. पानांचा देठ आखूड असून पानांची मध्यशीर फिकट असल्याने उठून दिसते. फुले सामान्यपणे २–३ पानांच्या बगलेत व कुंठित फुलोऱ्यात झुपक्यांनी वर्षभर येतात. त्यामुळे या वनस्पतीला मराठी भाषेत ‘सदाफुली’ हे नाव पडले आहे. फुले द्विलिंगी व तबकासारखी दिसतात. दलपुंज २–५ सेंमी. लांब असतो. फुलांच्या रंगात दोन-तीन प्रकार ठळकपणे दिसून येतात; पाकळ्या संपूर्ण पांढऱ्या रंगाची असलेली फुले, पाकळ्या संपूर्ण गुलाबी असलेली फुले आणि पाकळ्या पांढऱ्या पण मध्यभागी गुलाबी ते जांभळट ठिपका असलेली फुले. पेटिकाफळे उभी व लांबट असून त्यांत अनेक बिया असतात.

सदाफुलीची लागवड बागेत तसेच कुंडीत बिया लावून, रोपे लावून किंवा छाट कलम करून केली जाते. सदाफुलीच्या मुळांपासून आणि फांद्यांपासून काढलेला अर्क विषारी असून त्याचा वापर अनेक रोगांवर उपचारासाठी केल्याचा आयुर्वेदात उल्लेख आहे. चीनमध्येही पारंपरिक औषधांमध्ये जसे मधुमेह, हिवताप, हॉजकिन लिंफोमा (पांढऱ्या पेशीचा कर्करोग) यांवर सदाफुलीची मुळे आणि पाने यांचा वापर केलेला आढळतो.

सदाफुलीच्या मुळांपासून, फांद्यापासून आणि पानांपासून सु. २० पेक्षा अधिक अल्कलॉइडे मिळतात. त्यांपैकी व्हिन्ब्लास्टाइन, व्हिनक्रिस्टाइन, व्हिनोरेल्बाइन आणि व्हिन्डेसाइन ही अल्कलॉइडे कर्करोगावरील रसायनचिकित्सेमध्ये वापरली जातात. १९५० च्या सुमारास रॉबर्ट नोबल आणि चार्ल्स बीअर या वैज्ञानिकांनी सर्वप्रथम व्हिन्ब्लास्टाइन वेगळे केले. १९६१ मध्ये अमेरिकेतील बाजारात ते उपलब्ध झाले आणि कर्करोगावर ते प्रभावी असल्याचे लक्षात आले. महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांनी १९८० साली सदाफुलीतून व्हिन्ब्लास्टाइन वेगळे केले. सध्या ऊती संवर्धन तंत्र वापरून पानांच्या ऊतींपासून ही अल्कलॉइडे मिळवितात.

बाजारात व्हिन्ब्लास्टाइन ‘व्हेल्डे’ या नावाने आयात औषध उपलब्ध आहे. इतर देशांतील उत्पादनात वापरलेल्या तंत्रापेक्षा भारतातील उत्पादनपद्धती अधिक सुलभ व कमी खर्चिक आहे. हॉजकिन लिंफोमा, कृष्ण कर्करोग, तसेच फुप्फुस, मूत्राशय, मेंदू, वृषणे यांच्या कर्करोगांवर या अल्कलॉइडांचा उपयोग केला जातो. ते शिरेत अंत:क्षेपणाद्वारे (इंजेक्शनद्वारे) दिले जाते. ते कर्करोगबाधित पेशींचे विभाजन थांबविते. मात्र अन्य रसायनचिकित्सेमधील रसायनांप्रमाणे त्याचेही बरेच अनिष्ट आनुवंशिक परिणाम होतात. व्हिन्ब्लास्टाइनप्रमाणे दुसरे महत्त्वाचे अल्कलॉइड व्हिनक्रिस्टाइन फक्त ल्यूकेमियावर (रक्ताच्या कर्करोगावर) वापरतात.