कहाण्या, मराठी : धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा. व्रतवैकल्याच्या निमित्ताने  सांगितली जाणारी गोष्ट. श्रद्धेने आचरणात येणाऱ्या व्रताची फलनिष्पत्ती सांगणे, हा कहाणीचा मुख्य उद्देश. अशा कहाण्या श्रावणमासात लेकीसुनांना वडीलधाऱ्या स्त्रिया सांगतात. त्यांना त्यायोगे चांगले वळण लागावे, हा हेतू त्यामागे असतो. ह्या कहाण्या फार प्राचीन काळातील आहेत. कोणते व्रत केव्हा आणि का घ्यावयाचे, याचा खुलासा होण्यासाठी या कहाण्यांमधून पौराणिक दाखले दिलेले  असतात. ‘सोमवारच्या कहाणी’त घरातील नातलगांनी  आपल्यावर प्रसन्न व्हावे, म्हणून अंगिकाराव्या लागणाऱ्या एका कडक व्रताची माहिती आलेली आहे. प्रत्येक वाराच्या अशा वेगवेगळ्या कहाण्या आहेत. काही कहाण्या देवदेवतांचे माहात्म्य सांगणाऱ्याही आहेत. ‘आदित्यराणूबाईची  कहाणी’ ही त्यांपैकीच एक. अशा कहाणीमध्ये ज्या देवतेसंबंधी हकीकत आलेली असते, त्या देवतेस उद्देशूनच कहाणीचा प्रारंभ केला जातो. उदा., ‘पाच देवांच्या कहाणी’ची सुरुवात ‘ऐका पाची देवांनो तुमची कहाणी’ अशी केली गेली आहे. अशा कहाण्यांचा एक विशिष्ट साचा असतो.

कहाणीमधील घटना सामान्यत: ‘आटपाट नगरात’ घडून येतात. आटपाट नगर म्हणजे आठ पेठांचे नगर. जुन्या काळातील लोकमान्य नगररचना. या नगरात घडणारे प्रसंग अद्‌भुतरम्य असतात. त्यांत चमत्कारांना स्थान आहेच. त्यासाठी धार्मिक जीवनातील संकेतांचा आधार घेतलेला असतो. कहाणीचा शेवट ‘ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ असा केलेला असतो. कहाण्यांची वाक्यरचना सुटसुटीत असते. वाक्ये लहान लहान असतात. शैली लयबद्ध असते. शब्द सूचक असतात. क्रियापदांची ठेवण जुन्या मराठीची असते. उदा., करीस, असस, जास, दाखवीस इत्यादी. ‘काकणलेल्या लेकी दे’, ‘मुसळकांड्या दासी दे’ या प्रकारच्या वाक्यांतील विशेषणे अभिनव आहेत. पुनरावृत्ती हा कहाणीचा प्राण असतो. रचनेच्या दृष्टीने कहाण्या आकर्षक असतात. भाषेच्या दृष्टीने सुबोध असतात. लयबद्ध रचनेमुळे व सुबोध भाषेमुळे कहाण्यांमधील जीवन तजेलदार वाटते. निरूपण डौलदार होते. येथे श्रोत्यांचा उल्लेख नसतो. वक्त्त्याचाही नामनिर्देश नसतो.

मराठीतील लोककथेलाही खेडेगावी कहाणी म्हणून संबोधतात. मात्र ही कहाणी व्रतवैकल्यांच्या कहाणीपुरतीच मर्यादित नसते. हिचे कथनश्रवण सर्वत्र सारख्याच आवडीने होते. सामाजिक वर्गवारी  व वय यांचे वावडे तिला नसते. स्त्रीपुरुष हा भेदभाव ती मानीत नाही. अशा कहाण्यांचे अनेक संग्रह प्रकाशित झालेले आहेत.

संदर्भ :

  • दांडेकर, मालतीबाई, माईंच्या गोष्टी (मजेदारलोककथा), मुंबई, १९४९.
  • दाते, शं.ग. (संपा). लोककथा, १९६८.
  • बाबर, सरोजिनी, (संपा).मराठी लोककथा, पुणे, १९७०.