केतकर, श्रीधर व्यंकटेश : (२ फेब्रुवारी १८८४ – १० एप्रिल १९३७). महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे निर्माते, समाजशास्त्रज्ञ, इतिहासज्ञ, कादंबरीकार व विचारवंत. जन्मस्थळ मध्य प्रदेशातील रायपूर. शिक्षण प्रवेश परीक्षेअखेर अमरावतीला, पुढे विल्सन महाविद्यालयात मुंबईला. पदवी न घेताच अमेरिकेस गेले आणि कॉर्नेल विद्यापीठातून १९११ साली पीएच्. डी. झाले. द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया – प्रथम खंड – (१९०९) हा पीएच्. डी. साठी लिहिलेला ग्रंथ पाश्चात्त्य विद्वानांत गाजला. त्यात मनुस्मृतीचा काल निश्चित केला असून मनुस्मृतिकालीन समाजस्थितीचे विशेषतः जातिसंस्थेचे स्वरूप उलगडून दाखविले आहे. जातिभेद व वंशभेद एकरूप नसून भिन्न आहेत, हा विचारही त्यात त्यांनी मांडला आहे. द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया – द्वितीय खंड – अथवा ॲन एसे ऑन हिंदूइझम, इट्स फॉर्मेशन अँड फ्यूचर (१९११) या दुसऱ्या ग्रंथाचे प्रतिपाद्य असे : मुळच्या चार वर्णांतून किंवा एकरूप समाजातून आजचा जातिभेदयुक्त असंघटित हिंदू समाज तयार झाला, अशी हिंदू समाजघटनेची मुख्य दिशा नाही. अनेक मानववंशांच्या शेकडो टोळ्या स्वतःचे स्वयंपूर्ण जीवन जगत परस्परांच्या शेजारी राहिल्या आणि त्यातून आजचा जातिनिबद्ध हिंदू समाज निर्माण झाला. पावित्र्याच्या चुकीच्या कल्पनांमुळे उच्चनीचभाव निर्माण झाला. बालविवाहांमुळे आईबापांच्या मतांवर अवलंबून राहणारी लग्ने जातीबाहेर होणे अशक्य होऊन जातिसंस्था दृढ झाली. तसेच ब्राह्मणांसारखे मूळचे वर्ण किंवा वर्ग पुढे अनेक जातींत रूपांतर पावले. शिवाय संप्रदाय व उद्यम ह्यांच्याही जाती बनल्या. अर्थात, मुसलमान ख्रिश्चन समाज व हिंदू समाज यांची घटना मूलतः भिन्न आहे. दळणवळणाची साधने वाढल्यामुळे जगातील विविध समाज यापुढे परस्परसदृश होत जातील आणि जग एक होईल. जगदैक्याच्या भवितव्याशी प्रादेशिक समूहच सुसंगत आहेत तेव्हा हिंदू समाजाचे रूपांतर प्रादेशिक समाजात म्हणजेच हिंदी राष्ट्रात करणे, हे आपले ध्येय असले पाहिजे असे मत त्यांनी मांडले आहे. ॲन एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स (१९१४) व हिंदू लॉ अँड द मेथड्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ द हिस्टॉरिकल स्टडी देअरऑफ (१९१४) या ग्रंथांत भारतीय अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचा विचार समाजशास्त्रीय दृष्टीने त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रीय ज्ञानकोश (विभाग १ ते २३, प्रकाशन १९२१-२९) हे केतकरांचे खरे जीवितकार्य. त्यांच्या ज्ञानकोशाने मराठीतील विश्वकोशरचनेचा पाया घातला. ज्ञानकोशाच्या शरीरखंडात (विभाग ६ ते २१) महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा हेतू मनात बाळगून ज्ञानाचे अकारविल्हे संकलन केले आहे. सूची खंडात (विभाग २२) ज्ञानकोशातील विषयांची सूची असून हिंदुस्थान खंडात (विभाग २३) हिंदुस्थानाविषयी हरतऱ्हेची माहिती अकारविल्हे बाजूस सारून विषयवार दिली आहे. प्रस्तावना खंडांत (विभाग १ ते ५) इतिहास व सांस्कृतिक माहिती यांचा एकेक प्रदीर्घ पट वाचकापुढे विषयवारीने उलगडला आहे. त्यांतील हिंदुस्थान आणि जग या पहिल्या विभागात भारतातील व भारताबाहेरील हिंदू समाजाची पाहणी केली असून मुख्यतः हिंदू समाजाच्या पुनर्घटनेविषयी अनेक विचार सांगितले आहेत. वेदविद्या या दुसऱ्या व युद्धपूर्व जग या तिसऱ्या विभागात आधुनिक वैदिक संशोधन दिले आहे. यात पाश्चात्त्यांच्या आणि भारतीयांच्या वैदिक संशोधनाचा आढावा आला आहे. प्रस्तावना खंडांतील चौथा व पाचवा हे विभाग म्हणजे बुध्दोतर जग व विज्ञानेतिहास. विज्ञानेतिहास बराचसा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरापर्यंतच दिला आहे.
केतकर ज्ञानकोशाचे जसे संपादक, तसेच व्यवस्थापकही होते. त्यामुळे ज्ञानकोशाच्या कार्यात त्यांचे सर्व कर्तृत्व कसाला लागले. हे कार्य हयातभर पुरेल वीस वर्षांत आटोपणार नाही, असे मोठ्या मोठ्यांचे कयास होते, पण त्यांनी ते १९१५ पासून चौदा वर्षांत हातावेगळे केले. प्रथितयज्ञ विद्वानांचे लेखनसहकार्य त्यांना दुर्दैवाने पुरेसे लाभू शकले नाही पण त्यांनी होतकरू लेखकांना हाताशी धरून ते पुरे करून घेतले. ज्ञानकोशात काही विचार ब्राह्मणजातिकेंद्रित आहेत. त्यांतील मजकुरामुळे अनेक हिंदू जाती, मुसलमान व बौद्ध रागावले. ज्ञानकोशाला मुद्रणाचा खोळंबा होऊन भयानक आर्थिक खोट आली तेव्हा धाडसाने केतकरांनी स्वतःचा छापखाना घातला. असले वाङ्मकार्य लिमिटेड कंपनी काढून तोवर कोणी उरकले नव्हते पण लिमिटेड कंपनीच्या काही संचालकांनी त्यांना बराच त्रास दिला पण मोठ्या हिकमतीने त्या संचालकांना त्यांनी दूर सारले. कंपनीचे भाग भांडवल खपविण्यात व ग्रंथांची विक्री करण्यात तर त्यांनी विक्रम केला. आपल्या ज्ञानकोशविषयक कामाचे परखड निवेदन माझे बारा वर्षांचे काम ऊर्फ ज्ञानकोश मंडळाचा इतिहास (१९२७) या पुस्तकात केतकरांनी केले आहे. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या आधाराने गुजराती, हिंदी वगैरे भाषांत ज्ञानकोश रचण्याचे केतकरांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. विद्यार्थिदशेतील महाराष्ट्र वाग्विलास हे मासिक चालविण्याचा प्रयत्न व ज्ञानकोश काळातील पुणे – समाचार हे दैनिक नि साप्ताहिक चालविण्याचा प्रयत्न यांनाही फारसे फळ लाभले नाही. मात्र ज्ञानकोश काळातील त्यांचे विद्यासेवक हे मासिक वैचारिक लिखाणाच्या दृष्टीने संस्मरणीय ठरले.
गोंडवनातील प्रियंवदा (१९२६), ब्राह्मणकन्या (१९३०) इ. सात कादंबऱ्या १९२६ ते ३७ या काळात लिहून केतकरांनी मराठी ललित साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण भर घातली. त्यांच्या कादंबऱ्या इतर कादंबऱ्यांहून अगदी वेगळा अनुभव वाचकांना देतात. विविध समाजसमूहांची अभिनव माहिती, मानवी मनाच्या काही अंगांची मर्मग्राही उकल व समाजसुधारणेसंबंधी विजेप्रमाणे धक्के देणारे क्रांतिकारक विचार यांनी त्या तुडुंब भरलेल्या आहेत. त्यांनी वाचकांच्या बुद्धीचे समाराधन होते, पण वाचकांची कलात्मकतेची अपेक्षा पूर्ण होत नाही, असे अनेक टीकाकारांचे मत आहे. महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण (१९२८) या पुस्तकात केतकरांनी आंग्लपूर्व महाराष्ट्रातील वाङ्मयविषयक अभिरुचीचा शोध घेण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. निःशस्त्रांचे राजकारण (१९२६) व व्हिक्टोरियस इंडिया (१९३७) ह्या दोन ग्रंथांत त्यांचे राजकीय विचार आहेत, तसेच त्यांच्या राजकीय उद्योगांची माहितीही आहे. १९२७ पासून सु. दहा वर्षे, महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर त्यांनी काम केले आणि त्याचे फळ प्राचीन महाराष्ट्र शातवाहन वर्ष (१९३५) हा ग्रंथ होय. परंतु हा ग्रंथ प्रमाणभूत ठरला नाही.
ज्ञानकोश संपत आल्यावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केतकरांचा गौरव झाला. १९२६ साली ‘शारदोपासक संमेलना’चे व १९३१ साली‘महाराष्ट्र साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. व्रात्यास्तोमविधीने हिंदू झालेल्या एका जर्मन ज्यू विदुषीशी १९२० साली केतकरांचा विवाह झाला. अपत्यहीनतेमुळे दोन अनाथ मुलांना त्यांनी मायेने घरी सांभाळले. त्यांचे कौटुंबिक जीवन आर्थिक ओढाताणीचे पण समाधानी होते. मधुमेहात एक जखम चिघळल्याचे निमित्त होऊन ते पुणे येथे मृत्युमुखी पडले.
संदर्भ :
- केतकर, शीलवती, मीच हे सांगितलं पाहिजे, मुंबई, १९६९.
- गोखले, द. न. डॉ. केतकर, मुंबई, १९५९.
- गोखले, द. न. डॉ. केतकरांच्या कादंबऱ्या, पुणे, १९५५.
- भागवत, दुर्गा, केतकरी कादंबरी, मुंबई, १९६७.