ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या पूर्व-मध्य भागातून वाहणारी प्रमुख नदी. लांबी ४६२ किमी., जलवाहन क्षेत्र सुमारे २२,००० चौ. किमी. लिव्हरपूल रेंज पर्वतश्रेणीचा भाग असलेल्या ‘मौंट रॉयल रेंज’ पर्वताच्या पश्चिम उतारावर ही नदी उगम पावते. उगमानंतर प्रथम काही अंतर ती वायव्येस व त्यानंतर सामान्यपणे नैर्ऋत्येस वाहत जाते. नैर्ऋत्य दिशेत वाहत असताना ती काही अंतर ग्लेनबॉन धरणाच्या जलाशयातून वाहते. त्यानंतर मस्वेलब्रुक व डेनमॅन नगरांवरून वाहत जाते. डेनमॅनपासून काही अंतरावर ती आग्नेयवाहिनी होते. तेथेच उजवीकडून वाहत आलेली गोलबर्न ही प्रमुख उपनदी तिला येऊन मिळते. त्यानंतर हंटर नदी सिंगलटन, मेटलँड, मॉर्पथ, रेमंड टेरस या शहरांजवळून वाहत जाऊन न्यू कॅसल येथे टास्मन समुद्राला मिळते. न्यूकॅसल हे तिच्या नदीमुख खाडीवरील संरक्षित व अद्ययावत प्रसिद्ध बंदर व औद्योगिक शहर आहे.

ग्लेनबॉन जलाशयाच्या वरच्या भागात या नदीला १०, तर जलाशयाच्या खालच्या भागात ३१ प्रमुख उपनद्या येऊन मिळतात. त्यांपैकी पेगस, गोलबर्न, विल्यम्स, पॅटरसन, मूनॅन ब्रुक, स्ट्यूअर्ट ब्रुक व वुलंबी ब्रुक या प्रमुख नद्या आहेत. न्यू कॅसलचे उपनगर असलेल्या हेक्समच्या पूर्वेस या नदीच्या दोन शाखा होतात. या दोन्ही शाखा वॉल्श पॉइंट येथे पुन्हा एकत्र येतात. नदीला कधीकधी हानीकारक पूर येतात. त्यांपैकी १९५५, २००७ आणि २०१५ मध्ये आलेले पूर मोठे होते. सेसनॉक, कुरी कुरी, मुरंडी आणि स्कून ही या नदीच्या खोऱ्यातील प्रमुख नगरे आहेत.

जून १७९६ मध्ये वाईट वातावरणापासून संरक्षण होण्यासाठी मासेमारी करणारे काही लोक या नदीच्या खोऱ्यात शिरले. त्यांना या भागात जमिनीवरच दगडी कोळसा आढळला. त्यावरून त्यांनी या नदीला ‘कोल’ नदी असे नाव दिले होते. त्यानंतर वसाहतीचे तत्कालीन गव्हर्नर जॉन हंटर यांच्या नावावरून या नदीला ‘हंटर’ हे नाव देण्यात आले (इ. स. १७९७). येथील सिंगलटन, मस्वेलब्रुक व डेनमॅन या शहरांच्या त्रिकोणाकृती भागात सर्वाधिक महत्त्वाच्या खाणी आहेत; परंतु या नदीच्या खालच्या खोऱ्यातील सेसनॉक आणि मेटलँड यांदरम्यान असणाऱ्या खाणी न्यूकॅसल येथील लोहपोलाद उद्योगाच्या विकासास विशेष उपयुक्त ठरल्या आहेत. या नदीच्या खोऱ्यात औष्णिक वीज निर्मितीचे सहा प्रमुख प्रकल्प असून त्यांतील वीज राज्याच्या इतर भागांत पुरविली जाते.

हंटर नदीचे खोरे वेगवेगळ्या प्रकारची शेती, फळांच्या बागा आणि द्राक्षमळे यांसाठी प्रसिद्ध आहे. नदीच्या वरच्या टप्प्यातील कुरणांवर गुरे, मेंढ्या आणि घोडे पाळले जातात आणि झाडे तोडून लाकूड उत्पादन मिळविले जाते. कुक्कुटपालन, मांसोत्पादन (बीफ) आणि दुग्धोत्पादन हे नदीखोऱ्यातील प्रसिद्ध व्यवसाय आहेत. नदीखोऱ्याच्या सखल भागात घोड्यांचे आणि गुरांचे खाद्य म्हणून मका, गवत, लूसर्न (अल्फाल्फा) गवत यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. अतिरिक्त वृक्षतोडीमुळे पुराचे प्रमाण खूप वाढले असून पूरनियंत्रणासाठी ग्लेनबॉनसारखी धरणे बांधली आहेत. ऋतूनुसार नदीच्या पाणीपातळीत बराच चढउतार होत असल्यामुळे जलवाहतुकीवर खूप मर्यादा येतात. त्यासाठी पर्याय म्हणून खोऱ्यातून एक लोहमार्ग आणि दोन महामार्ग काढलेले आहेत.

समीक्षक : नामदेव स. गाडे