लहानशा क्षेत्रावर अल्पकाळात अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणात कोसळणार्‍या स्थानिक स्वरूपाच्या पावसासाठी ढगफुटी हा लोकप्रिय किंवा सर्वसाधारण पारिभाषिक शब्द वापरतात. ढग हे घनरूप पाण्याचा पुंज असून तो त्या क्षेत्रावर फुटतो, असा पूर्वी समज असल्याने ढगफुटी ही संज्ञा रूढ झाली. ढगफुटीने एका एकर जमिनीवर ७० हजार टन एवढे पाणी जोराने पडते. वृष्टी वा वर्षाव या प्रकारचा हा पाऊस एका तासात १०० मिमी. वा अधिक प्रमाणात पडतो. म्हणजे ढगफुटीद्वारे १५ मिनिटांमध्ये २.५ सेंमी. एवढी पर्जन्यवृष्टी होते. ढगफुटी बहुधा गडगडाटी वादळाशी निगडित असते. यामुळे ढगफुटीत गारा, मोठे थेंब पडतात व गडगडाटही होतो. ढगफुटीच्या घटना बहुधा वाळवंटी किंवा डोंगराळ प्रदेशांत अथवा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील ग्रेट प्लेन्स यांसारख्या खंडांतर्गत भागांत घडतात. गडगडाटी वादळामधील वरच्या दिशेत झपाट्याने घुसणार्‍या वायुप्रवाहांमुळे पावसाच्या संघनित होणार्‍या थेंबांच्या रूपातील पाणी मोठ्या प्रमाणात तोलून किंवा उचलून धरले जाते; मात्र हे वायुप्रवाह अचानकपणे कमी किंवा मंद झाले, तर पाण्याची मोठी राशी लगेचच लहानशा क्षेत्रावर अचानकपणे कोसळून ढगफुटी होते. तसेच याच्या परिणामी जलप्रवाहांच्या स्तरांचे वेग वाढतात आणि नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी जलदपणे वाढते. ढगफुटीने अचानक व विनाशकारी पूर येतात.

ढगफुटीच्या घटना सामान्यपणे डोंगराळ भागांत घडतात; कारण गडगडाटी वादळातील गरम हवेचे प्रवाह डोंगराच्या वरील दिशेतील उतारावरून वर चढतात. डोंगराच्या उतारांवर मुसळधार पावसाचे परिणाम विशेषत: चकित करणारे असतात; कारण पडणारे पाणी दर्‍यांमध्ये व घळींमध्ये एकवटले जाते आणि अचानकपणे मोठे व विनाशकारी पूर येतात. सर्वांत गंभीर ढगफुटींमध्ये पावसाच्या तीव्रतेची केवळ अटकळ बांधता येते. पनामामधील प्वेर्त बेलो येथे २९ नोव्हेंबर १९११ रोजी तीन मिनिटांमध्ये ६३ मिमी. पाऊस झाल्याची नोंद स्वयंचलित पर्जन्यमापकावर झाली होती; तर २६ नोव्हेंबर १९७० रोजी ग्वादलूपमधील लेस ॲबिमेसजवळच्या बॅरट येथील पर्जन्यमापकात १ मिनिटात ३८ मिमी. पावसाची नोंद झाली होती. तथापि, याहून अधिक तीव्रतेच्या ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. हे ढगफुटीखाली पडणार्‍या पाण्यामुळे जमिनीत खोदल्या गेलेल्या खळग्यांवरून लक्षात येते.

ढगफुटीचे परिणाम :

  • जोरात आत घुसणारे पूर येतात.
  • वनस्पती नष्ट होतात, मृदेची झीज होते.
  • भूमिपात होतात.
  • घरे, रस्ते व वनस्पती, पूल इत्यादींचे नुकसान होते.
  • वृक्ष उन्मळून पडतात, तसेच वने नष्ट होऊ शकतात.
  • नदीकिनारे जलदपणे झिजतात.
  • पाणी-पुरवठा, सांडपाण्यावरील प्रक्रिया यांत अडचणी येतात.
  • मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी होते इत्यादी.

भारतात २०१३ मध्ये उत्तराखंड राज्यात घडलेल्या ढगफुटीच्या घटना प्रलयकारी ठरल्या. १६-१७ जून २०१३ रोजी रात्री उत्तरकाशी व रुद्रप्रयाग भागांत ४७९ मिमी. पर्जन्यवृष्टी झाली होती. तेव्हा उत्तराखंडामधील रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, चमोली, पिठोरगड व टेहरी या जिल्ह्यांत सुमारे ६,००० लोकांचा बळी गेला होता.

भारतात बहुधा पर्वतीय भागात ढगफुटीच्या घटना घडतात. तेथे कमी उंचीवरील ढग उंच पर्वताने रोखले जातात; मात्र असे इतरत्रही घडू शकते. २६ जुलै २००५ रोजी मुंबईवरच्या ढगफुटीने १० तासांत १,४४८  मिमी. पाऊस पडला होता.

समीक्षक : वसंत चौधरी