फ्रान्समधील एक पर्वतश्रेणी. फ्रान्सच्या पूर्व भागातील ओ-रँ, बा-रँ आणि व्होज या विभागांत व्होज पर्वतश्रेणीचा (गिरिपिंडाचा) विस्तार झालेला आहे. फ्रान्स-जर्मनी यांच्या सरहद्दीजवळ या कमी उंचीच्या पर्वतरांगा आहेत. ऱ्हाईन नदीला समांतर, साधारणपणे नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत ही पर्वतश्रेणी पसरलेली असून ऱ्हाईन नदीच्या वरच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेशाची सीमा तिने निर्माण केली आहे. तिची लांबी सुमारे १२० किमी. असून क्षेत्रफळ सुमारे ८,००० चौ. किमी. आहे. व्होजच्या दक्षिणेस जुरा पर्वतश्रेणी आहे. या दोन पर्वतश्रेण्यांच्या दरम्यान बेलफॉर खंड (गॅप) किंवा ट्रुएद बेलफॉर हा खंड (खिंड) असून त्यातून सोन-ऱ्हाईन या नद्यांदरम्यानचा ऐतिहासिक मार्ग गेलेला आहे. या खंडाच्या उत्तरेस व्होजचा सर्वाधिक उंचीचा घुमटाकार पर्वतीय भाग असून त्यात प्राचीन खडक आढळतात. या पर्वतश्रेणीचा विस्तार पश्चिमेस ६४ किमी. मोझेल खोऱ्यापर्यंत आणि उत्तरेस १२० किमी. ऱ्हाईन नदीपर्यंत झालेला आहे. दक्षिण भागात ग्रॅनाइट खडक आणि उत्तर भागात तांबड्या वालुकाश्मातील खडक आढळतात.

व्होज पर्वतश्रेणीचे दक्षिणेकडून उत्तरेकडे हायर किंवा हाय व्होज, मिडल किंवा सँडस्टोन व्होज आणि लोअर किंवा लो व्होज असे तीन विभाग पडतात. उत्तर व्होज पर्वतातील स्ट्रॅस्बर्गच्या नैर्ऋत्य भागातील ली दॉनन पर्वताची उंची १,००८ मी. पर्यंत वाढलेली आढळते. कोल दे सव्हेर्न या खिंडीच्या पुढे ही उंची ६०० मी. पर्यंत कमी झालेली दिसते. सव्हेर्न ही खिंड उत्तर व्होज पर्वतातील सव्हेर्न कम्यूनजवळ असून तिच्यातून राष्ट्रीय महामार्ग आणि लोहमार्ग वाहतूक चालते.

व्होज पर्वतश्रेणीचा ऱ्हाईन नदीकडील उतार तीव्र स्वरूपाचा असून पश्चिमेकडील वनाच्छादित उतार मात्र मंद आहे. दक्षिण भागात या पर्वतातील सर्वाधिक उंचीची शिखरे असून त्यांना बलून असे म्हणतात. ही शिखरे साधारणपणे १,२०० मी. पेक्षा अधिक उंचीची आहेत. त्यांतील ग्रँड बलून (बलून दे गेबव्हीलर) या शिखराची उंची १,४२४ मी. असून त्याखालोखाल स्टॉर्केनकॉफ (१,३६६ मी.) आणि हॉहनेक (१,३६४ मी.) ही जास्त उंचीची शिखरे आहेत. नैर्ऋत भागातील पर्वतीय प्रदेश पर्यटनाच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध आहे. तेथील उतारावरील खोऱ्यात आणि सरोवरांच्या प्रदेशात उत्साहवर्धक हवामान आढळते. झेरार्मे आणि लाँगमर ही तेथील सरोवरे त्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.

व्होज पर्वतातील अधिक उंचीचा प्रदेश हिवाळ्यात हिमाच्छादित असतो. हा प्रदेश हिवाळी खेळांसाठी प्रसिद्ध असून पर्यटनाच्या दृष्टीनेही हा विशेष महत्त्वाचा प्रदेश आहे. आग्नेयीकडील उंच शिखरांच्या सान्निध्यातील अ‍ॅल्सेस हा प्रदेश ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असून तो द्राक्षमळ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. या गिरिपिंड प्रदेशात दोन संरक्षित प्रदेश आणि बलून्स देस व्होज नेचर पार्क आणि नॉर्दर्न व्होज रिजनल नेचर पार्क ही दोन नैसर्गिक उद्याने आहेत. नॉर्दर्न व्होज रिजनल नेचर पार्क आणि जर्मनीतील पलॅटनट फॉरेस्ट नेचर पार्क यांचा मिळून ‘पलॅटनट फॉरेस्ट-नॉर्थ व्होज बायॉस्फिअर रिझर्व्ह’ हा जीवावरणीय राखीव प्रदेश म्हणून यूनेस्कोने घोषित केला आहे.

समीक्षक : नामदेव स. गाडे