अँगस्ट्रॉम, अँडर्स योनास : (१३ ऑगस्ट १८१४ – १८ जून १८७४) स्वीडन मधील मेडलपॅड येथे अँडर्स यांचा जन्म झाला. हार्नोसंड येथे शालेय शिक्षण संपवून अँडर्स ह्यांनी उप्प्साला विद्यापीठांत प्रवेश घेतला आणि तेथूनच त्यांनी भौतिकशास्त्रातील पीएच्.डी. ही पदवी मिळवली आणि भौतिकशास्त्राचे प्रपाठक म्हणून ते तेथे काम करू लागले. नंतर त्यांनी स्टॉकहोम वेधशाळेचे व्यवस्थापक म्हणून काम पहाण्यास सुरुवात केली, तर काही वर्षातच उप्प्साला विद्यापीठाच्या वेधशाळेचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी सुत्रे हाती घेतली. पुढे अँडर्स ह्यांची नियुक्ती उप्प्साला विद्यापीठातील भौतिकशास्त्राच्या अध्यासनपदी करण्यांत आली.
अँडर्स ह्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राविषयी कुतुहल होते. ह्या जिज्ञासेपोटी त्यांनी स्वीडनमधील वेगवेगळ्या जागांवर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांची नोंद केली. ह्या त्यांच्या कामामुळे स्टॉकहोम ॲकेडेमी ऑफ सायन्सेस ह्या संस्थेने युजीन बोटीने तिच्या १८५१ ते१८५३ ह्या काळातील पृथ्वी भ्रमणादरम्यान गोळा केलेली पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या माहितीची सुसूत्र मांडणी करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले. उष्णता आणि प्रकाशकीय भौतिकशास्त्र ह्यांत अँडर्स ह्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. उष्मावाहकता मोजण्यासाठी त्यांनी नवीन पद्धती विकसित केली. आपल्या संशोधनाने त्यांनी असे दाखवून दिले की उष्मावाहकता आणि विद्युतवाहकता ह्या समानुपाती असतात.
विद्युत प्रज्योतीतून (electric arc) निघणाऱ्या प्रकाशाचे विश्लेषण करून त्यांनी असे दाखवले की विद्युत प्रज्योतीचा वर्णपट हा दोन वर्णपटांनी बनलेला असतो. एक वर्णपट इलेक्ट्रोडच्या धातूचा असतो तर दुसरा वर्णपट वायूचा असतो. त्यांनी असेही दाखवले की वायू गरम असताना ज्या वारंवारतेच्या वर्णपंक्ती उत्सर्जित करतो, त्याच वर्णपंक्तींचे थंड झाल्यावर अवशोषण करतो.
सूर्याच्या वर्णपटाच्या अभ्यासापासून त्यांनी सूर्याच्या वातावरणात हायड्रोजन असतो हे दाखवून दिले. अँडर्स आणि त्यांचे सहकारी टेनन ह्यांनी अनेक रासायनिक मूलद्रव्यांच्या आणि सूर्यप्रकाशाच्या वर्णपटातील पंक्तिरेखांच्या तरंगलहरी मोजल्या व त्यांचे आलेखन केले. ह्या आलेखांत तरंगलहरींसाठी १०–१० मी हे एकक त्यांनी वापरले होते. अँडर्स ह्यांच्या संशोधनाच्या सन्मानार्थ १०–१० मी हे एकक अँगस्ट्रॉम म्हणून संबोधले जाते. ‘अरोरा बोरीॲ लिस’ म्हणजेच ध्रुवीय प्रकाशाचा अभ्यास करणारे. अँडर्स हे पहिले शास्त्रज्ञ होत. ध्रुवीय प्रकाशाच्या वर्णपटात ऑक्सिजनची पंक्तिरेखा (तरंग लहरी ५५७७०A) असते असे त्यांनी दाखवले.
आपल्या मोजण्यात चूक असल्याचा अँगस्ट्रॉम ह्यांना संशय होता. त्यांच्या मृत्युनंतर टेनन ह्यांना अँडर्स ह्यांचा संशय खरा असल्याचे लक्षात आले. मोजमापासाठी वापरण्यात आलेली मीटरची पट्टी लांबीला थोडी कमी असल्याने ही चूक झाली होती.
आपल्या कारकीर्दीत अँडर्स ह्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली. स्वीडिश रॉयल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी लंडन, इन्स्टिट्यूट द फ्रांस इत्यादी संस्थांच्या सदस्यपदी ते निवडून आले होते. चंद्रावरील विवराला अँगस्ट्रॉम ह्यांचे नाव देण्यात आले आहे.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Anders-Jonas-Angstrom
- http://what-when-how.com/physicists/angstrom-anders-jonas-physicist/
- https://www.youtube.com/watch?v=hujgsbOqNRA
समीक्षक : हेमचंद्र प्रधान