शी यु ची : जर्नी टू द वेस्ट (इं.शी). चिनी साहित्यातील चार महान कादंबऱ्यांपैकी एक लोकप्रिय कादंबरी. ही कादंबरी १६ व्या शतकात मिंग राजवंशाच्या काळात प्रसिद्ध झाली. वूछांग अन या लेखकाने ही कादंबरी लिहिली आहे. बौद्ध धर्माचा अभ्यासक युआन च्वांग याने सातव्या शतकातमध्ये आशियाचा दौरा केला, ही कादंबरी त्यावर आधारित आहे. या संदर्भातील अनेक कथा चिनी लोककथा म्हणून प्रचलित होत्या. या कथा वू ने लिखित स्वरूपात आणल्या. युआन च्वांग याने मध्य चीनमधून पश्चिमेकडे म्हणजे मध्य आशिया किंवा भारतीय उपखंडात प्रवास केला. बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी च्वांग भारतात आला. या प्रवासादरम्यान त्याला जे काही चांगले वाईट अनुभव आले ते या कादंबरीमध्ये वर्णन करण्यात आले आहेत. युआन च्वांग हे प्रवास वर्णन असून तो थांग राजवंशाचा लिखित स्वरूपातील इतिहासात आहे. पण वूछांग अन याने ही कादंबरी लिहिताना चिनी लोककथांचा आधार घेतला आहे आणि काही काल्पनिक गोष्टी पण लिहिल्या आहेत.

कादंबरीतल्या नायकाचे नाव थांग सानचांग असून तो एक बौद्ध साधू होता. पश्चिमेकडील प्रदेशात जाऊन बोधिसूत्र आणण्याचे काम गौतम बुद्धाने त्याला दिले होते असे या कादंबरीत म्हटले आहे. बौद्ध साधू युआन च्वांगचे आयुष्य ही या कादंबरीचे प्रेरणास्थान आहे. युआन च्वांगने चीन ते भारत हा प्रवास चालत केला होता. त्याचा प्रवास आणि त्याचे भारतातील वास्तव्य हा १४ वर्षांचा कालखंड होता. कादंबरीचा नायक थांग सानचांग किंवा त्रिपिटीक बोधिसूत्र आणण्याच्या कामगिरीवर जात असताना, या कामगिरीत त्याचे रक्षण करण्यासाठी तीन साथीदार पण बरोबर दिले होते. हे साथीदार म्हणजे माकड, डुक्कर आणि मासा असे होते. त्यांना अलौकिक व दिव्य शक्ती प्राप्त होत्या.

१०० प्रकरणे असलेल्या या कादंबरीचे चार मुख्य भाग पडतात. पहिल्या काही प्रकरणांमध्ये माकडाचा जन्म आणि त्याला प्राप्त असणाऱ्या शक्तींचे वर्णन केले आहे. एका पाषाणापासून सान वूखोंग या माकडाचा जन्म होतो. हे माकड ज्ञानी असून, चिनी समाजाचा मुख्य आधार असलेले ताओ तत्वज्ञान त्याला अवगत असते. सान वूखोंग हा ताओ तत्त्वज्ञान कसे अवगत करतो याची गोष्ट पुस्तकाच्या पहिल्या भागात सांगितली आहे. ताओ तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून सान वूखोंगला अमरत्व प्राप्त होते. कादंबरीच्या दुसऱ्या भागातले दुसरे पात्र थांग सानचांग म्हणजेच त्रिपिटीक याची गोष्ट. गौतम बुद्धाने त्याला दिलेले काम याचे वर्णन आहे. गौतम बुद्धाने बोधीसूत्र पश्चिमेकडील भागात गुप्तपणे ठेवली आहेत आणि कोणी चिनी अभ्यासक ही सूत्र शोधून ती चीनला घेऊन येईल. हा अभ्यासक म्हणजे त्रिपिटीका आणि त्याला गौतम बुद्धाने बोधीसूत्र शोधायचं काम दिले असल्याचे दुसऱ्या भागात वर्णन केले  आहे. तिसऱ्या भागात थांग सानचांग किंवा त्रिपिटीका बोधीसूत्राचा शोध घेण्यासाठी निघतो. आशिया खंडातील प्रसिद्ध रेशीम मार्गाने थांग सानचांग प्रवासाला सुरुवात करतो. भारतातील गौतम बुद्धाचे आवडते ठिकाण असलेल्या राजगीर किंवा गुध्रकूट या ठिकाणी त्याला जायचे असते. या प्रवासादरम्यान बोधिसत्व म्हणजेच अवलोकितेश्वर किंवा क्षमेची देवता त्यांचे संरक्षण करते. या देवतेच्या संकेतामुळे थांग सानचांगला त्याच्या प्रवासात सान वूखोंग माकड भेटते. या प्रवासात त्रिपिटीका वर अनेक संकटे येतात. त्याच्या या प्रवासात अनेक दानव, असुर बाधा आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्यातून तो सुरक्षित बाहेर पडतो आणि ध्येय गाठतो. बोधीसूत्र घेऊन थांग सानचांग परत पूर्वेकडे येण्याचा प्रवास सुरु करतो याची गोष्ट चौथ्या भागात सांगितली आहे. बोधिसूत्र हस्तगत करून ती चीनला सुरक्षित आणल्याबद्दल थांग सानचांग माकड व सन वूखोंग व त्याच्या साथीदारांना मोक्ष प्राप्ती होते आणि त्यांना स्वर्गात स्थान मिळते.

ही कादंबरी लोककथा आणि काल्पनिक कथांवर आधारित आहे आणि प्रामुख्याने चीन, भारत आणि जपान मध्ये आढळणाऱ्या लोककथांचा प्रभाव आहे असे मानले जाते. या लोककथा ऐतिहासिक घटनांवर आधारित आहेत. शी यु ची ह्या मूळ कादंबरीची भाषा अलंकारिक आहे, पण कादंबरीवर चिनी बोलीभाषा आणि चिनी संस्कृतीचा प्रभाव आहे. युआन च्वांग आणि माकडाला प्रवासादरम्यान ज्या प्रसंगांना सामोरं जावे लागले, त्यामधून चिनी स्थानिक संस्कृतीची कल्पना येते. शी यु ची कादंबरी ज्या कालखंडात लिहिली, त्यावेळी साहित्य लेखनात पारंपरिक चिनी भाषेचा वापर केला जात असे, पण लेखकाने ही पद्धत न वापरता बोली भाषेत कादंबरी लिहिली आहे. कादंबरीमधील विनोदी आणि साहसी गोष्टींमधून चिनी नोकरशाही आणि समाजावर भाष्य केले आहे. त्यामुळे शी यु ची ही कादंबरी लोकप्रिय झाली.

आर्थर वाली या लेखकाने शी यु ची या मूळ चिनी कादंबरीचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले, भाषांतरित मंकी  ही कादंबरी पाश्चिमात्य देशात प्रसिद्ध आहे. १९४२ मध्ये ती प्रसिद्ध करण्यात आली. जर्नी टू द वेस्ट  हे या कादंबरीचे इंग्रजी शीर्षक आहे.

संदर्भ :

समीक्षण : चंदा कानेटकर