आफ्रिकेतील मध्य सहारा प्रदेशातील एक पर्वतरांग. तिबेस्ती मासिफ या नावानेही ही पर्वतरांग ओळखली जाते. मध्य सहारामधील मिड-सहारा राइज प्रदेशाचा हा एक भाग आहे. चॅड या देशाच्या उत्तर भागात आणि लिबिया देशाच्या दक्षिण भागात ही पर्वतरांग पसरलेली असून सर्वाधिक विस्तार चॅडमध्ये आहे. पर्वताची लांबी ४८० किमी., रुंदी २८० किमी. आणि क्षेत्रफळ  ३९,००० चौ. किमी. आहे. पर्वताची सरासरी उंची २,००० मी. असून या पर्वतरांगेच्या दक्षिण टोकाशी असलेले एमीकूसी (३,४१५ मी.) हे ज्वालामुखी शिखर सहारामधील सर्वोच्च शिखर आहे. बीक्कू बीत्ती किंवा पिको बेत्ते (२,२६६ मी.) हे लिबियातील सर्वोच्च शिखर याच पर्वतरांगेत आहे. वालुकाश्माने वेढलेल्या अध:स्तर स्फटिकमय खडकातून ज्वालामुखी उद्रेकामुळे वेगाने वर उचलल्या गेलेल्या खडकांमुळे या पर्वताच्या मध्यभागाची निर्मिती झालेली आहे. यातील वालुकाश्मयुक्त कडे सभोवतालच्या मैदानी प्रदेशातून एकदम उंचावलेले दिसतात. पर्वताचे ज्वालामुखीक्षेत्र पूर्णपणे चॅड देशात असून हे क्षेत्र एकूण पर्वतीय क्षेत्राच्या एक तृतीयांश आहे. पर्वताचे उर्वरित क्षेत्र ज्वालामुखी पठाराने व्यापलेले आहे. पर्वताच्या माथ्यावर रुंद आधारतल (सुमारे ८० किमी. व्यास) आणि माथ्यावर ज्वालामुखी कुंड वा ज्वालामुखी महाकुंड असलेली पाच ज्वालामुखी शिखरे आहेत. त्यांपैकी तार्सो येगा या शिखरावरील महाकुंड सर्वांत मोठे असून त्याचा व्यास १९ ते २० किमी. आणि खोली ३०० मी. आहे. या पर्वतरांगेत खोलवर खोदलेल्या तीन कोरड्या प्रवाहमार्गांवरून या प्रदेशात पूर्वी अधिक आर्द्र हवामान असावे. पर्वतातील इतर नद्या किंवा वाडी जास्त बाष्पीभवनामुळे फार अंतरापर्यंत वाहू शकत नाहीत. या प्रदेशात तापमान अधिक असले, तरी सभोवतालच्या वाळवंटी प्रदेशापेक्षा पर्वतावरील हवा थंड असते.

तिबेस्ती म्हणजे पहाडी लोकांची वस्ती असलेले ठिकाण. या पर्वतीय भागात टूबू लोकांची वस्ती अधिक असून ते प्रामुख्याने वाडीच्या (छोटे कोरडे प्रवाह) काठांवर आणि क्वचितच आढळणाऱ्या मरुद्यानांभोवती राहतात. मरुद्यानांत ताड वृक्ष आढळतात आणि हे लोक तेथे थोड्याफार प्रमाणात धान्य पिकवितात. येथील पठारी भागात हिवाळ्यात गुरे चारतात, तर उन्हाळ्यात धान्य पिकवितात. टूबू लोक इ. स. पू. पाचव्या शतकात या प्रदेशात स्थायिक झालेले असावेत. तेदा आणि डाझा या भटक्या जमातीचे सुमारे ८,००० लोक या पर्वतीय प्रदेशात राहतात. येथे कुरंग आणि बार्बरी मेंढ्या हे प्राणी आढळतात. प्राचीन काळी या पर्वतीय प्रदेशात फार मोठी जैवविविधता असल्याचे पुरावे मिळतात.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम