(डिल). एक पालेभाजी. शेपू ही वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲनेथम ग्रॅविओलेन्स किंवा प्युसिडॅनम ग्रॅविओलेन्स आहे. ॲनेथम प्रजातीत शेपू ही एकच वनस्पती आहे. ओवा, जिरे, बडीशेप, कोथिंबीर, गाजर इत्यादी वनस्पतीही एपिएसी कुलातीलच आहेत. शेपू मूळची भूमध्य समुद्र प्रदेशातील असून दक्षिण यूरोप आणि पश्चिम आशिया येथील अनेक देशांत तिची लागवड केली जाते. भारतात गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत तिची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्रात खासकरून खानदेश, मराठवाडा या भागांत तिची लागवड होते.
शेपू हे बहुवर्षायू झुडूप असून ३०–९० सेंमी. उंच वाढते. देठ (खोड) तळाजवळ रुंद; पाने संयुक्त, एकाआड एक, पिसांसारखी असून टोके दोन किंवा तीन धाग्यांसारख्या (तंतूंसारख्या) पर्णिकांमध्ये विभागलेली असतात. फुले उच्छत्र (उलट्या छत्रीसारख्या) फुलोऱ्यात येत असून ती लहान व पिवळी असतात. फळे बडीशेप, धणे यांसारखी युग्मवेश्मी (कप्पे असलेले फळ) असतात; त्यांच्यावर कंगोरे असतात आणि अरुंद पंख असतात. फळे सुगंधी असून त्यांना काहीसा शहाजिऱ्यासारखा वास येतो. बिया ४-५ मिमी. लांब आणि १ मिमी. रुंद असून त्यांमध्ये तैलनलिका आणि कंगोरे एकाआड एक असतात. शेपूच्या बियांना बाळंतशोपा म्हणतात.
शेपूच्या पानांना एक विशिष्ट वास असतो. तिच्या पानांची भाजी करतात. पालेभाजी तिखट, कडवट, कफवातनाशक, कृमिनाशक व पाचक असते. पानांना तेल लावून पोटीस म्हणून वापरतात. फळे मसाल्यांत तसेच औषधांमध्ये वापरतात. स्त्रियांना प्रसूतीनंतर शक्तिवर्धक म्हणून फळांचा काढा देतात. बाळंतशोपा घालून उकळलेले पाणी लहान मुलांना पोटाच्या तक्रारीवर देतात. बिया कुटून व पाण्यात उकळून त्यामध्ये मुळे मिसळून संधिवात व सुजेवर बाहेरून लावतात. लहान बालकांसाठी देण्यात येणारे ग्राईप वॉटर तयार करण्यासाठी शेपूच्या बियांचा वापर करतात. बियांपासून सुगंधी तेल मिळते. हे तेल अत्तर आणि इतर सुगंधी द्रव्ये तयार करताना मिसळतात.