नील्स बोहर इन्स्टिट्यूट, कोपनहेगन : (स्थापना – १९२१) नील्स हेन्रिक डेविड बोहर हे विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. अणूतील ऋणप्रभारी इलेक्ट्रॉन (आणि धनप्रभारी प्रोटॉन) या कणांची रचना कशी असते याविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण असे सिद्धांत मांडले. त्यांच्या या कार्यासाठी १९२२ चा नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्याच नावाने डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन या शहरात नील्स बोहर इन्स्टिट्यूट फॉर थिअरॉटिकल फिजिक्स ही संशोधन संस्था कार्यरत आहे. १९१६ मध्ये नील्स बोहर यांची कोपनहेगन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. सैद्धांतिक भौतिकशास्त्रात त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली. भौतिकशास्त्राचे अध्यापन आणि संशोधन त्या वेळेस एका पॉलिटेक्निक संस्थेत केले जात होते. तेथे असलेल्या सुविधा अगदीच तुटपुंज्या होत्या. सैद्धांतिक आणि प्रायोगिक भौतिकशास्त्रात संशोधन करण्यासाठी एका स्वतंत्र संस्थेची गरज असल्याचे त्यांनी विद्यापीठातील अधिकाऱ्यांना समजावून दिले. त्याच्या प्रयत्नांना यश येऊन १९२१मध्ये कोपेनहेगन विद्यापीठात इन्स्टिट्यूट फॉर थिअरॉटिकल फिजिक्स या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने स्थापन केलेल्या कार्लसबर्ग या बिअर बनविणाऱ्या कंपनीने या विभागाच्या स्थापनेला आर्थिक सहाय्य केले. याच संस्थेचे नामकरण बोहर यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी म्हणजे १९६५ मध्ये नील्स बोहर ह्यांच्या ८०व्या वर्धापनदिनी नील्स बोहर इन्स्टिट्यूट ऑफ थिअरॉटिकल फिजिक्स असे नामकरण करण्यात आले.

संस्थेच्या स्थापनेपासूनच आंतरराष्ट्रीय सहकार्याला उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यामुळे इतर अनेक देशातील शास्त्रज्ञांनी या संस्थेतील सुविधांचा उपयोग करून घेतला. जेव्हा बोहर यांना नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा हंगेरियन रसायनशास्त्रज्ञ गोर्ग हेवेसी आणि हॉलंडचे भौतिकशास्त्रज्ञ डर्क कोस्टर या संस्थेत काम करीत होते. बोहर यांच्या संशोधनाचा आधार घेऊन त्यांनी ७२अणूक्रमांक असलेल्या  हॅफनियम मूलद्रव्याचे भाकीत केले आणि झिर्कोनियमच्या खनिजातून ते मिळवून दाखविले. ज्या कोपनहेगन शहरात हे मूलद्रव्य शोधण्यात आले त्याला लॅटिन भाषेत हॅफनिया असे म्हणतात. म्हणून नव्याने शोधलेल्या मूलद्रव्याला हॅफनियम असे नाव देण्यात आले. नील्स बोहर ह्यांचे चिरंजीव आज (Aage) बोहर ह्यांनीही ह्याच संस्थेत संशोधन करून १९७५चा नोबल पुरस्कार  प्राप्त केला.

बोहर इन्स्टिट्यूट ही मूळची सैद्धांतिक भौतिकशास्त्रात संशोधन करणारी संस्था आहे. जसजशी गरज भासली तसतसे या संस्थेत नवनवीन विभाग स्थापन करण्यात आले. जेथे सोयीची जागा मिळेल तेथे नवीन विभागासाठी इमारती बांधण्यात आल्या. त्यामुळे बोहर इन्स्टिट्यूट कोपेनहेगन शहराच्या तीन वेगवेगळ्या भागात विखुरलेली आहे. आजच्या घडीला या संस्थेत सैद्धांतिक भौतिकशास्त्र, खगोलभौतिकी, जैवभौतिकी, भूभौतिकी, कणभौतिकी  (particle physics),  संगणकीय विज्ञान, रसायनभौतिकी, घनस्थितीभौतिकी आणि इ-विज्ञान. असे अनेक विभाग आहेत. या सगळ्या विभागात मोलाचे संशोधन सुरू आहे.

बोहर इन्स्टिट्यूटमध्ये पदव्यूत्तर शिक्षण घेणे किंवा संशोधन अनुभव घेणे मानाचे समजले जाते.

संदर्भ :

समीक्षक : श्रीनिवास केळकर