रामचंद्रन, गोपाल समुद्रम् नारायण : (८ ऑक्टोबर १९२२ – ७ एप्रिल २००१) गोपाल समुद्रम् नारायण रामचंद्रन यांचा जन्म केरळच्या एर्नाकुलम येथे जुन्या कोचीन संस्थानात झाला. वडील जी. आर. नारायण अय्यर, स्थानिक महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. त्यांच्यामुळे बालपणापासून त्यांना गणिताची आवड निर्माण झाली. त्यांच्या सर्व शिक्षणकाळात त्यांना गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण पडले होते. त्यावेळी असलेल्या इंटरमिजिएट परीक्षेत मद्रास राज्यात ते पहिले आले होते. त्रिचि येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन ते मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये भौतिकशास्त्रातील पदवी परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरू, या संस्थेत त्यांनी विद्युत अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला. परंतु आपला कल मूलभूत विज्ञानाकडे, विशेषत: भौतिकीकडे आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे उपयोजित शाखा सोडून ते भौतिकशास्त्रात एम.एस्सी. झाले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ सी. व्ही.रामन हे त्यांचे मार्गदर्शक होते. रामचंद्रन यांनी बंगळूरूतून मद्रास विद्यापीठात प्रबंध सादर केला. त्यांना त्या काळच्या ‘मद्रास’ आताच्या चेन्नई, विश्वविद्यालयाने स्फटिक भौतिकी आणि प्रकाशशास्त्र यातील संशोधन कामाबद्दल डी.एससी. पदवी प्रदान केली. मद्रास विश्वविद्यालयाबरोबरचे त्यांचे साहचर्य नंतरही जीवभौतिकी आणि क्ष किरण पंक्तिदर्शी (X-Ray spectroscopy) विभागाचे संचालक म्हणून कायम राहिले.

नंतर ते इंग्लंडमधील केंब्रिज विश्वविद्यालयात गेले. तेथे क्ष-किरण पंक्तिदर्शन तज्ज्ञ वूस्टर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी संशोधन केले. क्ष-किरणांमुळे होणारे विसरित विकीर्णन आणि त्याचे क्ष-किरण पंक्तिदर्शनात उपयोजन यासंबंधी संशोधनाबद्दल रामचंद्रन यांना पीएच्.डी. मिळाली. कालांतराने त्यांना रुडकी, हैदराबाद आणि वाराणसी विश्वविद्यालयांनीही डी.एससी. पदवी प्रदान केली.

नंतर ते भारतात परतले. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस्सी) मध्ये भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला. १९७१ ते १९७८ च्या दरम्यान ते आयआयएस्सीच्या रेण्वीय जीवभौतिकी विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते. त्यानंतरची तीन वर्षे गणितीय तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते आयआयएस्सीत कार्यरत होते. पुढे ते सीएसआयआर या भारतातील विज्ञान प्रयोगशाळा समूहाशी विशेष सन्मानित संशोधक म्हणून निगडीत होते.

१९५१ मध्ये केंब्रिज विश्वविद्यालयातील कॅव्हेन्डिश प्रयोगशाळेत त्यांना विल्यम लॉरेन्स ब्रॅग यांच्या बरोबर संशोधन करण्याची संधी मिळाली. विल्यम लॉरेन्स ब्रॅग यांना केवळ पंचविसाव्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. रामचंद्रन यांचे पूर्वीचे मार्गदर्शक वूस्टरदेखील या संशोधन प्रकल्पात सहभागी झाले होते. या संशोधनांती स्फटिक रचनेत स्थितिस्थापकतेचा स्थिरांक निश्चित करण्यास उपयुक्त अशी  गणितीय उपपत्ती रामचंद्रन यांनी मांडली. रामचंद्रन आलेखामुळे संकल्पित प्रथिन रेणूंची रचना अचूक आणि सुबकपणे, महागड्या यंत्रांविना, कमी मनुष्यबळात साकारणे शक्य झाले. या कामाचे फळ म्हणून रामचंद्रनना केंब्रिज विद्यापीठाची आणखी एक पीएच्.डी. मिळाली.

रामचंद्रन शिकागो विद्यापीठाच्या जीव भौतिकशास्त्र विभागात एक वर्षासाठी अतिथी प्राध्यापक म्हणून गेले. तेथे त्यांनी द्विमित विदा (2-D data) वापरून त्रिमित प्रतिमा घडविण्याच्या पद्धतीचा पाया रचला. त्यातून संगणक प्रतिमा रेखनतंत्र (computerized imaging) आकाराला आले.

केंब्रिज विद्यापीठात त्यांना विख्यात नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ लायनस पॉलिंग (Linus Pauling) यांची व्याख्याने ऐकायला मिळाली. त्यातील आशय त्यांना अमिनो आम्लांचे रेणू एकमेकांशी पेप्टाईड बंधांनी नेमके कसे जोडले जातात आणि अमिनो आम्लांच्या रेणूसाखळ्या कशा बनतात या घडणीचे बारीक तपशील समजण्यास उपयोगी पडले.

रामचंद्रन यांनी गणितीय प्रतिमानांचा उपयोग करून प्रस्तावित केलेल्या आलेखामुळे कोलॅजेन प्रथिन रेणूची रचना त्रिसर्पिल असते हे कळले. कोलॅजेन हे संयोजी ऊतीमधील प्रथिन विविध अवयव आणि स्थिरता (Structural protein) देते. रामचंद्रन यांच्या संशोधनातून मायोग्लोबीन या स्नायू प्रथिनाची रचना उलगडली.

बर्नालना यांच्या सल्ल्याने त्यांनी कोलॅजेन प्रथिनाच्या रचनेवर संशोधन केले. शरीरातील स्नायूबंध व अस्थिबंध कोलॅजेनने बनलेले असतात. कांगारूंच्या शेपटीच्या स्नायूपुच्छातील (tendon) कोलॅजेनची रेणूस्तरावरील रचना यावर रामचंद्रन आणि त्यांचे सहकारी, गोपीनाथ कार्थ यांनी संशोधन केले. या दोघांचा  शोधनिबंध नेचर या मासिकात प्रकाशित झाला.

रामचंद्रन यांनी शोधून काढलेला फी-साय आलेख प्रथिन रचना समजण्यासाठी अत्यावश्यक मानला जातो.

प्रथिने जीवधारणेसाठी महत्त्वाचे रेणू आहेत. प्रथिन रचनेसंबंधी रामचंद्रन यांनी काम केले. त्यांना ‘पॉल पीटर इवाल्ड पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार इंटरनॅशनल युनियन ऑफ क्रिस्टॅलोग्राफीतर्फे दर तीन वर्षांनी पंक्तिदर्शन (spectroscopy) क्षेत्रातल्या सर्वोत्तम वैज्ञानिकाला दिला जातो.

रामचंद्रन यांना विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च, असा भौतिकशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इंडियन नॅशनल सायन्स अकादमी, रॉयल सोसायटी आणि रॉयल सोसायटी ऑफ लंडन, काउन्सिल ऑफ इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाईड बायोफिजिक्स अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांचे ते सन्मानयीय सदस्य होते.

रामचंद्रन यांच्या आमंत्रणाला मान देऊन जगातील अनेक अव्वल दर्जाचे शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय जीवभौतिकी अभ्यासक व्याख्यानांसाठी मद्रास येथे येऊन गेले. त्यात लायनस पॉलिंग, सेवेरो ओछोआ, मॉरीस विल्किन्स, पॉल फ्लोरी, डोरोथी हॉज्किन, लॉरेन्स ब्रॅग यांचा समावेश होतो.

रामचंद्रन यांना भारतीय आणि पाश्चात्य संगीतात गती होती.

रामचंद्रन यांचे कंपवाताच्या दीर्घकालीन आजाराने चेन्नईमध्ये निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा