टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई:   (स्थापना – १९४५) टाटा मूलभूत संशोधन संस्था ही विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान या तीन क्षेत्रात मूलभूत संशोधन करणारी संस्था आहे. प्रसिद्ध उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांच्या सहकार्याने डॉ. होमी भाभा यानी या संस्थेची स्थापना केली. सुरूवातीला काही काळ या संस्थेचे कामकाज बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेतून चालायचे. परंतु लवकरच ते मुंबईला स्थलांतरित करण्यात आले. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर या संस्थेसाठी एक सुबक अशी इमारत १९६२ मध्ये बांधण्यात आली. तेव्हापासून या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथेच आहे. १ जून २०२०रोजी या संस्थेने ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. भारताचा अणूऊर्जा आयोग यांच्या अधिपत्याखाली ही संस्था चालविली जाते. भारत सरकारचे अणू विज्ञान आणि गणित राष्ट्रीय केंद्र (National Centre of the Government of India for Nuclear Science and Mathematics) अशी या संस्थेची ओळख आहे. या संशोधन संस्थेचे प्रामुख्याने तीन विभाग आहेत. गणित विभाग (School of Mathematics), निसर्ग विज्ञान विभाग (School of Natural Sciences) आणि तंत्रज्ञान विभाग (School of Technology). या प्रत्येक विभागाचे विशिष्ट संशोधनाच्या दृष्टीने आणखी उपविभाग स्थापन केले गेले. या प्रत्येक उपविभागात मूलभूत संशोधन केले जाते. हे संशोधन राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकातून प्रसिद्ध केले जाते. या कामाला जगात मान्यता मिळाल्यामुळे टीआयएफर आता एक जगप्रसिद्ध संशोधन संस्था म्हणून नावारूपाला आली आहे.
सन १९४५ मध्ये लहानशा स्वरूपात सुरू झालेल्या या संस्थेने आता एका मोठ्या संशोधन संस्थेचे रूप घेतले आहे. त्यात वेगवेगळ्या नवीन उपविभागांची भर पडत गेली. देशाच्या वेगेवेगळ्या भागात या संस्थेने आता प्रयोगशाळा उभारल्या आहेत. उदा., हैदराबादला बलून रिसर्च फॅसिलिटी, उदकमंडलम येथे रेडिओ टेलिस्कोप, पचमढी येथे गॅमा-रे अ‍ॅस्ट्रॉनॉमी, नारायणगाव जवळील खोडद येथे जायन्ट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप, बंगरुळू येथे जीवशास्त् संशोधन केंद्र. २०१४ साली हैद्राबाद शहरात एक मोठी जागा या संस्थेला देण्यात आली आहे. तेथे संशोधनाच्या आणखी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. संशोधनाबरोबरच अध्ययन अध्यापनाचे कार्यदेखील ही संस्था करते. विख्यात वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर ह्यांनी ह्या संस्थेत प्राध्यापक म्हणून योगदान दिले आहे. एम.एस्सी. आणि पीएच्.डी. या पदव्यांसाठी अभ्यास व संशोधन करण्याची सुविधा या संस्थेत आहे. २००४ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने या संस्थेला अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेऊन निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन संशोधनाच्या सुविधा पुरविल्या जातात. आपल्या संशोधन काळात अनेक मातब्बर संशोधकांशी संपर्क साधण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळते. या मार्गाने पदवी मिळवून अनेक तरूण संशोधक आपापल्या क्षेत्रात पुढे गेले आहेत.
उच्च शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षणात संशोधन करण्यासाठी या संस्थेत ने १९७४ मध्ये होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र नावाचे एक वेगळे राष्ट्रीय केंद्र स्थापन केले. या केंद्रात विज्ञान आणि गणित शिक्षणात मूलभूत संशोधन केले जाते. या दोन विषयासाठी देशस्तरावर वापरता येईल असा अभ्यासक्रम या केंद्राने तयार केला आहे. या खेरीज ऑलिंपियाड या जागतिक स्पर्धेसाठी राष्ट्रीय विभाग म्हणूनदेखील हे केंद्र कार्य करते. या स्पर्धेसाठी विद्यार्थी निवडणे, त्यांची पूर्वतयारी करून घेणे, त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जाणे अशी विविध कामे या केंद्रात केली जातात. ह्या विविध ऑलिंपियाड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी जवळ जवळ प्रत्येक वर्षी उत्तम यश प्राप्त केले आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने २०२० सालापर्यंत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्रज्ञ या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेचे आयोजनदेखील केले आहे.

संदर्भ :

समीक्षक : श्रीनिवास केळकर