हरभरा (सिसर ॲरिएटिनम) : (१) शेंगासहित झुडूप, (२) फुले, (३) बिया.

(बेंगॉल ग्राम / चिकपी). एक वर्षायू वनस्पती. हरभरा ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्रीय नाव सिसर ॲरिएटिनम आहे. वाटाणा, भुईमूग, घेवडा, सोयाबीन इत्यादी वनस्पतीही फॅबेसी कुलातील आहेत. हरभरा हे जगातील एक महत्त्वाचे कडधान्य आहे. याचे मूळस्थान निश्चित नसले, तरी तुर्कस्तानमध्ये सर्वप्रथम हरभरा पिकाची लागवड केली असे मानतात. कॉकेशस व हिमालय पर्वंतामध्ये या पिकाचा विकास होऊन नंतर त्याचा प्रसार सर्वत्र झाला. ग्रीसमध्ये इ.स.पू. ३५०० वर्षे हरभऱ्याच्या जुन्या बिया सापडल्या आहेत, तर फ्रान्समध्ये इ.स.पू. ६७९० वर्षे जुन्या हरभऱ्याच्या बिया आढळल्या आहेत. सिसर प्रजातीत सु. ४१ जाती असून त्यांपैकी सिसर ॲरिएटिनम या जातीची लागवड जगात सर्वत्र करतात.

जगामध्ये हरभऱ्याचे सर्वांत जास्त उत्पादन भारतात घेतले जाते. त्याखालोखाल टर्की, म्यानमार, पाकिस्तान व इथिओपिया या देशांतही हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील रब्बी हंगामातील हे एक महत्त्वाचे पीक आहे.

हरभरा वनस्पती हे लहान झुडूप असून ते सु. ०.५ मी. उंच वाढते. झुडपाला अनेक फांद्या असतात. हरभऱ्याची मुळे जमिनीत १.५ ते २ मी. खोल वाढतात. त्यांच्या मुळांवर रायझोबियम प्रजातीतील सहजीवी जीवाणू गाठी करून राहतात. त्यामुळे पिकाला हवेतील मुक्त स्वरूपातील नायट्रोजन उपलब्ध होतो. पाने संयुक्त व पिसांसारखी असतात, पर्णिका फार लहान असून त्यांवर ग्रंथियुक्त केस असतात. फुले लहान, पांढरी किंवा फिकट जांभळी पतंगांसारखी असून पानांच्या बगलेत येतात. फळे (शेंगा) लहान, लंबगोल, १.५-२ सेंमी. व टपोरी (फुगलेल्या) असतात. त्यात १-२ काळ्या बिया असतात. बिया पिंगट गुलाबी, पांढऱ्या किंवा पिवळ्या अशा विविध रंगाच्या असतात. शेंगांतील बियांना हरभरे, तसेच चणे म्हणतात.

हरभऱ्याच्या दाण्यांचे आकारमान, रंग यानुसार त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार केले जातात. भारतात हरभऱ्याच्या चार प्रकारांची लागवड होते. पिवळसर तपकिरी रंगाच्या हरभऱ्याची लागवड भारतात सर्वत्र होते. याचे दाणे सुरकुतलेले असतात. पांढऱ्या रंगाच्या दाण्याला काबुली चणा म्हणतात. हा खाण्यास नरम, गोड व स्वादिष्ट असून त्याची लागवड उत्तर भारतात केली जाते. गुलाबी हरभऱ्याचा रंग फिकट असून दाणे गोल व गुळगुळीत असतात. हिरव्या रंगाच्या हरभऱ्याचा रंग वाळल्यानंतर हिरवाच राहतो. काळ्या रंगाच्या हरभऱ्याची लागवड फक्त गोवा, कर्नाटक राज्यांत केली जाते.

भारत व मध्य पूर्वेच्या देशांमध्ये आहारात हरभऱ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. वातुळ, शीत, तुरट, मधूर, रुचिकर गुणधर्म असलेल्या या वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त आहेत. हरभऱ्यांच्या बियांमध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असून कर्बोदके, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह इत्यादी घटक असतात. हरभऱ्यामध्ये , -समूह, इत्यादी जीवनसत्त्वे असतात. १०० ग्रॅ. शिजवलेल्या हरभऱ्यांपासून ६०% पाणी, २७% कर्बोदके, ९% प्रथिने आणि ३% मेद मिळतात. हरभरा हे प्रथिनांचा स्रोत असलेले आणि स्नायूंना बल देणारे कडधान्य असल्याने किशोरवयीन, तरुण, क्रीडापटू तसेच कष्टकरी यांच्यासाठी ते एक पौष्टिक अन्न आहे.

हरभऱ्याच्या वनस्पतीच्या कोवळ्या पाल्याची, तसेच वाळवून साठवून ठेवलेल्या पानांची भाजी करतात. फुले येण्याच्या सुमारास हरभऱ्याच्या पानांवर एक प्रकारचे आम्ल तयार होते. पानांवर पहाटे दीड ते दोन तास ओलसर कापड पसरून ठेवले की, ते दवाने भिजते व पानांतील आम्ल त्यात उतरते. कापड पिळून हे आम्ल बाटलीत गोळा करतात; त्यापासून आंब किंवा खाटी तयार करतात. ही हिरवी आंब औषधी असून यात मॅलिक आम्ल व ऑक्झॅलिक आम्ल असते. ओकारी, अपचन, पटकी, आमांश यांवर ही आम गुणकारी आहे. हरभऱ्यापासून डाळ व बेसन (पीठ) तयार करतात. पीठापासून पिठले, भजी, शेव, गोड बुंदी, बेसण लाडू इत्यादी पदार्थ तयार करतात. हिरवा हरभरा उसळीसाठी, तर काबुली चणा छोलेसाठी वापरतात. देशी, गुलाबी, काबुली हरभऱ्यांपासून फुटाणे तयार करतात. घोड्यांसाठी हरभरा हे पौष्टिक खाद्य असते. तसेच गुरांना चारा म्हणून याची टरफले आणि पाला खाऊ घालतात.

हरभऱ्याच्या सु. ९० जातींचा जीनोम शोधून काढला गेला असून काबुली चण्यात सु. २८,००० जनुके असल्याचे आढळून आले आहे.