बिडामध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त क्रोमियम असेल तर त्याचा समावेश उच्च क्रोमियम बीड या वर्गात केला जातो. क्रोमियममुळे लोह व क्रोमियम यांची गुंतागुंतीची रचना असलेली कार्बाइड्स तयार होतात. या प्रकारच्या स्थिर (Stable) कार्बाइड्समुळे बिडामध्ये उष्णतारोधक (Heat Resistance) तसेच झीजरोधक गुणधर्म येण्यास मदत होते. या प्रकारची कार्बाइड तुटक असल्याने (Discontinuous) बिडाचा चिवटपणादेखील वाढतो. कार्बन तसेच क्रोमियम या रासायनिक घटकांचे प्रमाण बदलून विविध प्रकारचे उच्च क्रोमियम बीड तयार करता येऊ शकते. त्यांच्या प्रमुख प्रकारासाठी तक्ता पाहा.

लोह व क्रोमियम कार्बाइड अत्यंत स्थिर असल्याने अंतर्गत रचनेतील घटकांचे विघटन होऊ देत नाहीत. तसेच या प्रकारच्या कार्बाइड्सचे संरक्षक कवच तयार होते व ते पुढील गंजण्याच्या क्रियेस विरोध करते. उच्च क्रोमियम बीड हे उच्च सिलिकॉन बिडापेक्षा सरस असते. त्याचे यांत्रिक गुणधर्मही उच्च सिलिकॉन बिडापेक्षा चांगले असतात. झीजविरोधसाठी अंतर्गत रचनेत मार्टेन्साइट असणे आवश्यक असते. त्यामुळे रासायनिक घटकांचे प्रमाण त्याप्रमाणे निवडावे लागते. व्यवहारात उष्णतारोधक म्हणून खनिज उद्योगातील सिंटर प्लान्टमधील सिंटर बार, फायर बार, रिक्युपरेटर ट्यूब, बर्नर पार्ट, गंजरोधक म्हणून मोठ्या स्लरी पंपासाठी वापरले जाणारे केसिंग व इंपेलर, झीजरोधक म्हणून शॉर्ट ब्लास्टिंग मशीनमधील इंपेलर आणि विटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे डाय इत्यादीसाठी वापरले जाते.

संदर्भ : American Foundry Society (AFS) Ductile Iron Handbook, USA, 1 January 1992.

समीक्षक : प्रवीण देशपांडे