ख्रिस्ती ऐक्य : त्रैक्यीय परमेश्वरातील मानवी शरीर धारण केलेल्या प्रभू येशू ख्रिस्त यांच्यावर श्रद्धा ठेवून जीवन जगणाऱ्या लोकसमूहाला ‘चर्च’ संबोधिले जाते. ते चर्च मूळात एकच एक आहे व ते एकच राहण्याची प्रखर इच्छा स्वत: येशू ख्रिस्त यांनी क्रूसावर मरण्यापूर्वी व्यक्त केली : ‘‘माझी (विश्वासणाऱ्यांसाठी) अशी प्रार्थना आहे की, हे पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये आहे, तसे त्यांनीही आम्हामध्ये एक व्हावे, म्हणजे तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा’’ (योहान १७ : २१). विविध ख्रिस्ती पंथांच्या ऐक्याचा फायदा अखिल जगतातील लोकांना होऊ शकतो. चर्चचे झालेल्या विभाजनामुळे ख्रिस्ती चर्च जगाला चालना देणाऱ्या योगदानात कमी पडते. चर्च जर एकोप्याने जगायला लागले, तर जगभरात दर्जेदार, विपुल प्रमाणात चर्चचे योगदान पोहोचेल.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ही लोकसमूहाचा अविभाज्य भाग असते. ख्रिस्ती माणसाची अस्मिता चर्चशी अतूट नात्याने जगण्यात असते. त्या अस्मितेला तडा जाऊन एका लोकसमूहाचे अनेक तुकडे झाले हे इतिहास नमूद करतो. आजच्या काळाला धरून परत एकदा सर्व ख्रिस्तींनी ‘ऐक्यात असलेले चर्च’ म्हणून नांदावे या प्रार्थनामय प्रयत्नांना विविध ‘ख्रिस्ती पंथांचे ऐक्य साधणारी चळवळ’ असे म्हणतात.
ही चळवळ प्रेरित होण्याला दोन गोष्टी कारणीभूत झाल्या : एडिंबर, स्कॉटलंड येथे संपन्न झालेली १९१० मधील धार्मिक सभा आणि रोम येथे १९६२ – ६५ दरम्यान संपन्न झालेली दुसरी व्हॅटिकन परिषद. दोन्ही घटनांमध्ये ‘येशू ख्रिस्त यांनी एकच एक चर्च स्थापन केले’ म्हणून ख्रिस्ती पंथांच्या श्रद्धावंतांनी त्यांच्या कह्यात असलेले प्रयत्न पणाला लावून परमेश्वराकडे एकच एक चर्च (ते कसे व कोणत्या प्रकारचे असेल हे परमेश्वरच सूचित करेल) असण्यासाठी कंबर कसून काम करावे म्हणून आवाहन केले.
ही चळवळ टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे. प्रथम विविध पंथांत तयार झालेल्या परंपरांना, विचारांना आणि घडामोडींना एकमेकाने नीट समजून घेणे व झालेल्या गैरसमजूतींना तिलांजली देणे; येशू ख्रिस्त यांच्या आद्य प्रेषितांची मूळ शिकवण प्रमाण मानण्यासाठी त्याकडे वळणे; ज्या ज्या गोष्टी एकमेकांपासून अलिप्त राहण्यास भाग पाडतात त्याचा अभ्यास होणे; ज्या गोष्टी सर्व पंथांना सामान्य आहेत, त्या गोष्टींना उजाळा देऊन ख्रिस्ती श्रद्धा अधिक बळकट करणे; प्रत्येक पंथ मूळ शिकवणुकीला धरून येशू ख्रिस्त यांच्यात मूळावणे आणि प्रत्येक पंथातील अनुयायांत मैत्रीची, सलोख्याची व सहिष्णूतेची नाती बांधण्यासाठी बंधुभावनेने एकमेकांना भेटत राहणे. या सर्व गोष्टींना प्रार्थनेचे पाठबळ मिळणे अत्यावश्यक आहे; कारण विविध ख्रिस्ती पंथांतील ऐक्य हा फक्त माणसांनी आखलेला कार्यक्रम नसावा, तर ज्या परमेश्वराने चर्च स्थापन केले, त्या परमेश्वराची इच्छा प्रमाण मानली जावी.
आज प्रामुख्याने दोन जागतिक केंद्रे विविध ख्रिस्ती पंथांतील ऐक्याला दिशा, प्रेरणा, मार्गदर्शन, नेतृत्व आणि उद्दिष्ट दर्शवितात : १) १९४८ साली जिनीव्हा, स्वित्झर्लंड येथील वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस (सर्व ऑर्थोडॉक्स व प्रॉटेस्टंट चर्चेस) आणि २) पोपमहोदयांच्या आधिपत्याखाली कार्यरत असलेले पॉन्टिफिकल कौन्सिल फॉर प्रमोटिंग ख्रिश्चन युनिटी, व्हॅटिकन (रोम). दोन्ही भागांमध्ये – म्हणजे दहाव्या व सोळाव्या शतकांत दुभंगून अनेक ख्रिस्ती पंथ तयार झालेल्या ख्रिस्तीजनांमध्ये नियमित, सक्रिय आणि ऐक्य साधणारा संपर्क १९६०च्या दशकापासून जोमाने सुरू आहे. संपर्क, एकमेकांचे ऐकून घेणे, अभ्यास, नवीन सिद्धान्त विचारार्थ पुढे ठेवणे, अवघड प्रश्न न लपविता चर्चा करून एकत्र सोडविणे अशा विविध मार्गांनी ऐक्य साधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.
विविध ख्रिस्ती पंथांतील ऐक्यभावना संपूर्ण ख्रिस्ती जगताला देवाकडून मिळालेला मोठा आशीर्वादच ठरतो. एकतेत विविधता व विविधतेत एकता याचा सुंदर अनुभव सर्वच ख्रिस्ती अनुभवत आहेत. मात्र मूलभूत फरकावर दुर्लक्ष करून चालणार नाही, हेसुद्धा मान्य केले जाते.
मूळ ग्रीक शब्दातून आलेला ‘एक्युमेनिझम’ म्हणजे ‘चराचर सृष्टीशी ऐक्य साधणे’ होय. येशू ख्रिस्त यांनी त्यांच्या शिष्यांना देवाबरोबर व परस्परांत ऐक्याने नांदण्याची आज्ञा केली. तरीसुद्धा, दहाव्या शतकात पौर्वात्य ख्रिस्तीजनांत फाटाफूट झाली. ऑर्थोडॉक्स (ग्रीक संस्कृतीप्रधान पूर्वेकडील देश) आणि पाश्चिमात्य कॅथलिक देश (लॅटिन संस्कृतीप्रधान पाश्चिमात्य देश) असे प्रामुख्याने दोन गट पडले. नंतर ऑर्थोडॉक्स चर्चसमूहात फाटाफूट होऊन त्यांचे नवीन समूह उदयास आले. कॉन्स्टंटाइन पॅट्रिऑर्केटला इतर ऑर्थोडॉक्स पंथीयांकडून ऐक्याचे प्रतिक म्हणून संबोधिले जाते. त्यामध्ये आलेक्झांड्रिया, अंत्युखिया, जेरूसलेम, रशिया, सर्बिया, रूमानिया, बल्गेरिया, जॉर्जिया, सायप्रस, ग्रीस, पोलंड इ. देश मोडतात. आज प्रामुख्याने पूर्वेकडील देशांत (भारत, रशिया, टर्की इतर मध्य व उत्तरेकडील यूरोपीय देशांत) ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती अनेक समूहांत राहतात. वसाहतीकरणामुळे संपूर्ण जगात निरनिराळ्या ऑर्थोडॉक्स पंथाचे ख्रिस्ती विखुरलेले आहेत. येशू ख्रिस्त यांच्यावरील श्रद्धा प्रकट करण्यात दोन्ही गटात लक्षवेधी फरक जाणवत नाही. परंतु शतकानुशतके विभक्त राहिल्यामुळे काही अडचणी मात्र निर्माण झाल्या; कारण काळानुरूप ख्रिस्ती श्रद्धेचा विचार निरनिराळ्या संकल्पनांत, शब्दांत, मतांत, भावनांत व संस्कृतींत झाला.
सहाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्वतंत्र ख्रिस्ती चर्चसमूह स्थापन होण्याला सुरुवात झाली. १४व्या-१५व्या शतकात पोप यांचा अधिकार दुर्बळ बनत चालला होता. एकाच वेळेला तीन पोप स्वत:ला गादीवर बसवत व एकमेकांना बहिष्कृत करण्याचे आदेश देत. पाश्चिमात्य जग मध्ययुगीन व आधुनिक काळात जगत होते. आज संपूर्ण जगभर इंग्लंडचे चर्च हे अँग्लीकन चर्च आणि एपिस्कोपल चर्च या नावांखाली आढळतात. १५३४ साली आठव्या हेन्रीने अधिकृत रीत्या कॅथलिक चर्चमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. १८६७ मध्ये जगात स्वतंत्र रीत्या स्थापन झालेल्या सर्व चर्चसमूहांचा ‘अँग्लीकन कम्युनियन’ म्हणून परिवार स्थापन झाला. यात सु. साडेआठ कोटी अनुयायी होते (२०२१). अँग्लीकन कम्युनियन बहुतकरून धर्मसुधारणा चळवळीशी (प्रॉटेस्टंट पंथीयांशी) जोडली जाते. १५१७ साली मार्टिन ल्यूथर यांच्या नेतृत्वाखाली कॅथलिक चर्च फुटून धर्मसुधारणेच्या चळवळीमधून प्रॉटेस्टंट धर्मपंथ स्थापन झाला. प्रॉटेस्टंट धर्मपंथाचेदेखील अनेक समूह उदयास आले. उदा., धर्मसुधारणा किंवा रिफॉर्म्ड चर्चेस, ल्यूथरन चर्च, मेथडिस्ट चर्च इत्यादी.
विसाव्या शतकाच्या समाप्तीला येशू ख्रिस्त यांच्या नावाने अनेक नवीन समूह जगभर झपाट्याने पसरले. या समूहांची सुरुवात प्रामुख्याने अमेरिकेत झाली. स्थानिक संस्कृतीतून, जगभर सुरू झालेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीतून, धर्माला आलेल्या बाजारी स्वरूपातून सुरुवात होऊन झपाट्याने हे छोटे-मोठे समूह जगातील पाचही खंडांत पसरले. प्रामुख्याने दोन प्रमुख गटांत हे सर्व समूह मोडतात. १) इव्हँजेलीकल आणि २) पेन्टेकॉस्टल. समूहासमूहात तत्त्वत: अनिवार्य आणि न जुळणारे फरक जाणवतात. तरीपण अलीकडे हे सर्व समूह एका मेजाभोवती संभाषण साधण्यासाठी एकत्र जमण्याचे प्रयत्न होत आहेत. ‘ग्लोबल ख्रिश्चन फोरम’ म्हणून आंतरदेशीय संस्था खूप सक्रियपणे अशा समूहांना एकत्रित आणून ख्रिस्ती ऐक्यात सामील करून घेण्यात यशस्वी ठरत आहे; कारण संस्थापित ख्रिस्ती पंथांना अशा समूहांविषयी भीती आणि काळजी वाटते.
जगातील अनेक चर्च वर्ल्ड कौन्सिलचे सभासद आहेत. भारतातील ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ व ‘चर्च ऑफ साउथ इंडिया’ वर्ल्ड कौन्सिलचे सभासद असून, १९६१ मध्ये दिल्ली येथे कौन्सिलचे जे अधिवेशन भरले, ते ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याच अधिवेशनात रोमन कॅथलिक चर्चने पहिल्यांदाच आपले निरीक्षक पाठविले होते.
चर्च दुभंगून तिचे तुकडे होण्याच्या इतिहासापासून भारत देश दूर आहे, तरी निरनिराळ्या ख्रिस्ती पंथांत ऐक्य साधले जाणे अत्यंत आवश्यक मानले जाते. जरी समस्या आणि तोडगा निराळा असला, तरी चढाओढ, खेचाखेच, स्पर्धा, चुरस ही कोणत्याही धर्माला न शोभणारी गोष्ट आहे. सर्व ख्रिस्तीजनात बंधुत्वाची नाती असणे फार जरूरीचे भासत आहे व त्याप्रमाणे ऐक्यासाठी पावले पडत आहेत, ही आनंददायक बाब ठरते. धार्मिक बाबतीत भारतीयांची छाप जगावर उमटलेली आहे व ख्रिस्ती जगात भारतीय ख्रिस्ती लोकांनीसुद्धा आपले योगदान जगाला देणे स्वागतार्हच ठरते.
संदर्भ :
- Desseaux, Jacques; O’Connell, Matthew, Twenty Centuries of Ecumenism, New York, 1984.
- Flanery, Austin, Vatican Council II : The Conciliar & Post Conciliar Documents, Vols. 1 & 2, Mumbai, 2014.
- Pope Benedict XVI; Trans., Miller, Michael J., Youth Catechism of the Catholic Church, Bangalore, 2011.
- Rouse, Ruth; Neill, Sthephen Charles, Eds., A History of the Ecumenical Movement 1517–1948, Philadelphia, 1954.
- Rusch, William G., Ecumenism : A Movement Toward Church Unity, Philadelphia, 1985.
- Tirimanna, Vimal, Ed., Asian Faces of Christ : OTC Theological Colloquium, Bangalore, 2005.
- Van der Bent, Ans J., Major Studies and Themes in the Ecumenical Movement, Geneva, 1981.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया