मिहनाइटचा शोध विसाव्या शतकात दुसऱ्या दशकाचा शेवट व तिसऱ्या दशकाची सुरुवात या दरम्यान रॉस मिहन फौंड्री, इंग्लंड या ठिकाणी लागला. बिडाच्या धातुवितलनाच्या प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण व कॅल्शियम सिलिसाइडचा अंतःक्षेपक (Inoculant) म्हणून उपयोग ही या पद्धतीचे वैशिष्ट्ये होती. त्यासंबंधीचे एकस्वही (Patent) घेण्यात आले होते. मिहनाइट हे मिहनाइटच्या विविध ग्रेडचे व्यापारी नाव आहे. भारतात मिहनाइट फौंड्रीना परवानगी देण्याचे अधिकार कूपर इंजिनियरिंग लिमिटेड, सातारा रोड (हल्लीची वालचंदनगर इंडस्ट्रीज) यांच्याकडे होते. मिहनाइट पद्धतीमुळे खात्रीशीर गुणधर्माचे बीड तयार होऊ लागले. त्यामुळेच डिझाइन अभियंत्यांमध्येदेखील ते प्रसिद्ध पावले. मिहनाइटमध्ये सर्वसाधारण अभियांत्रिकी (General Engineering), उष्णतारोधक (Heat Resisting), झीजरोधक (Wear Resisting), गंजरोधक (Corrosion Resisting), एस मिहनाइट (Nodular Meehanite) हे पाच प्रमुख प्रकार आहेत.

सर्वसाधारण अभियांत्रिकी मिहनाइटचे GM 38, GA 35, GB 32, GC 28, GD 25, GE 21 असे सहा उपप्रकार आहेत. GC प्रकारात उष्णोपचार करून गुणधर्म आणखी सुधारता येऊ शकतात. जेथे औष्णिक वातावरण असते, तेथे दोन प्रकारची परिस्थिती असू शकते : कास्टिंग (ओतीव वस्तू) वरचेवर गरम व थंड होते व एक प्रकारचा औष्णिक धक्का बसतो. वरचेवर गरम व गार झाल्यामुळे औष्णिक ताण (Thermal Stresses) निर्माण होतात व कास्टिंगला तडे जाऊ शकतात किवा कास्टिंग ठरावीक तापमानास दीर्घकाळ राहते (Continuous Heating). यामुळे पर्लाइटचे विघटन होऊन कास्टिंगचे आकारमान वाढते. तसेच ऑक्सिडीकरणाच्या क्रियेचा वेग पण वाढतो. HE, खास HE, HD, HS, SC, HC/HB, HR अशा उष्णतारोधक मिहनाइटच्या ग्रेड आहेत. जेथे औष्णिक धक्क्यास विरोध करणे हाच प्रमुख हेतू असेल, तेथे HE किंवा खास HE वापरले जाते. जेथे काही प्रमाणात औष्णिक धक्का आहे, पण त्याशिवाय ताकद, काठिण्य व ऑक्सिडीकरणास विरोध करणे हे पण गुणधर्म पाहिजे त्या ठिकाणी HD, HS, SC हे प्रकार वापरले जातात. जेथे प्रामुख्याने वाढत्या आकारमानास विरोध (Groth Resistance) व ऑक्सिडीकरण विरोध (Resistance to Scaling and oxidation) हे गुणधर्म पाहिजे त्या ठिकाणी HC/HB व HR प्रकार वापरले जातात.

झीजविरोधक मिहनाइटचे WA, WB, WH, WBC WEC असे पाच प्रकार आहेत. WA या प्रकारास यंत्रण (Machining) करता येते. त्याचे काठिण्य 230-350 BHN या दरम्यान असते. WB या प्रकारास यंत्रण करता येत नाही. त्याचे झीजविरोधी गुणधर्म मँगेनीज स्टीलच्या जवळपास जातात. WH या प्रकारचे काठिण्य सर्वोच्च (600 BHN) इतके असते.  WBC जाड कास्टिंगसाठी, तर WEC पातळ कास्टिंगसाठी वापरले जाते. गंजविरोधी मिहनाइटमध्ये CB3, KC  CC/CB हे प्रकार आहेत. यापैकी जेथे तीव्र सल्फ्युरिक अम्लाचा संपर्क आहे तेथे CB3 वापरले जाते. कास्टिंग जेथे अल्कली गुणधर्माच्या रसायनाच्या संपर्कात असतील तेथे KC वापरले जाते. जेथे यांत्रिक गुणधर्म (Mechanical Properties) पण चांगले हवेत, शिवाय कास्टिंग रसायनांच्या संपर्कात आहे, तेथे CC/CB हा प्रकार वापरला जातो. जेथे सर्वसाधारण अभियांत्रिकी मिहनाइटपेक्षा ताकद व चिवटपणा खूप जास्त पाहिजे त्या ठिकाणी एस मिहनाइट वापरले जाते. SP, SPF, SF, SFF, SFT हे प्रकार आहेत. यापैकी SP हा प्रकार पर्लिटिक SPF पर्लिटिक फेरिटिक, तर उरलेले प्रकार हे पूर्णपणे फेरिटिक आहेत. SF पेक्षा SFF प्रकारात आघातविरोध जास्त प्रमाणात असतो. SFT हा प्रकार ९० से. तापमानापर्यंत उष्णतारोधक म्हणून वापरला जातो. पर्लिटिक ग्रेडवर उष्णोपचार करून त्याचे गुणधर्म आणखी सुधारता येतात. त्यामुळे SH ही ग्रेड तयार होते.

संदर्भ : American Foundry Society ( AFS ) Ductile Iron Handbook, USA, 1 January 1992.

समीक्षक : प्रवीण देशपांडे