पॉल, संत जॉन दुसरे : (१८ मे १९२० — २ एप्रिल २००५). रोमचे बिशप आणि रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख (१९७८–२००५). पोप जॉन पॉल पहिले यांनी पोपपदाचे अधिग्रहण केल्यानंतर अवघ्या ३३ दिवसांत त्यांचे आकस्मिक देहावसान झाले. त्यांच्या जागी पोलंडमधील कार्डिनल कॅरॉल यूझेफ (जोसेफ) वॉयतिला यांची पोपपदी निवड झाली. १६ ऑक्टोबर १९७८ रोजी अधिकारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी जवळपास २६ वर्षे कॅथलिक चर्चचा आणि व्हॅटिकन सिटी या देशाचा कारभार पाहिला. दीर्घकाळ धर्मप्रमुखपदी राहणारे ते तिसरे पोप होते. पहिले पोप संत पीटर यांनी ३४ वर्षे प्रमुखपद भूषविले. त्यानंतर पोप पायस नववे हे पोपपदी ३१ वर्षे होते. पोप जॉन तेविसावे व पोप जॉन पॉल पहिले यांच्या सन्मानार्थ त्यांनी पोप जॉन पॉल दुसरे हे नवीन नाव स्वीकारले. ४५५ वर्षे केवळ इटालियन कार्डिनलच पोपपदी आरूढ होत असत. तब्बल ४५५ वर्षांनंतर इटलीबाहेरील पोलंडवासी पोप निवडून आल्याने एक नवा इतिहास घडला. भारताला दोन वेळा (१९८६ व १९९९) भेट दिलेले ते एकमेव पोप. त्याचप्रमाणे जगातील १२९ देशांना भेटी देणारेही ते एकमेव पोप होत.

त्यांचा जन्म पोलंडमधील वॅडोवाईस येथे झाला. ते आठ वर्षांचे असताना आईचे छत्र काळाने हिरावून नेले. ते १९ वर्षांचे असताना दुसरे महायुद्ध सुरू झाले. जर्मनीतील नाझींनी पोलंडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पोलंडमध्ये झालेला नरसंहार त्यांनी अनुभवला. नाझींच्याच रासायनिक कारखान्यात त्यांनी चार वर्षे नोकरी केली. त्याचवेळी धर्मगुरूंच्या हत्या त्यांनी डोळ्यांनी पाहिल्या, तरीही त्यांनी धर्मगुरू होण्याचे ठरविले. भूमिगत राहून त्यांनी धर्मगुरूपदाचा अभ्यास केला.

आपल्या सेवेच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी जगभरात कॅथलिक श्रद्धा अधिकाधिक दृढ करतानाच गर्भपात, कृत्रिम कुटुंबनियोजन, विवाहपूर्व लैंगिक संबंध, धर्मगुरूंचे ब्रह्मचर्य, महिलांसाठी धर्मगरूपद यांविषयी चर्चची पारंपरिक भूमिका उचलून धरली.

पोपपदी निवड झाल्यावर त्यांनी जगभर दौरे केले. आपल्या भेटीमध्ये मानवी हक्क जोपासना, मानवी प्रतिष्ठा, धर्मस्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, भौतिकवाद, भोगवृत्ती, जगभरातील वाढता चंगळवाद, फैलावणारी अश्लिलता, गर्भपात, दयामरण यांद्वारे उदयास येत असलेली मृत्युसंस्कृती यांवर आपले परखड विचार स्पष्ट शब्दांत त्यांनी जगासमोर मांडले. धर्माच्या नावाखाली हिंसाचारास पायबंद घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले, तर मृत्युदंडाच्या शिक्षेविरुद्धही आपला निषेध नोंदवला. संपूर्ण यूरोपमध्ये ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आवाहन केले.

पोलंडमध्ये सुरू झालेल्या ‘सॉलिडॅरिटी’ या कामगार संघटनेला शांततापूर्ण, अहिंसक मार्गाने आंदोलन करण्यास त्यांनी मार्गदर्शन केले. सोव्हिएट रशियाचे सर्वेसर्वा गार्बाचॉव्ह यांच्याबरोबर त्यांनी संवाद सुरू केला.

पोप जॉन पॉल दुसरे यांच्या दौऱ्यांमुळे लॅटिन अमेरिकेतील हुकूमशाही देशांत लोकशाही विचारांना प्रेरणा मिळाली. त्याच मार्गाचा अवलंब करून चिली व अर्जेंटिना या देशांतील तणाव निवळून युद्ध टाळण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जगात शांती-समेटाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून त्यांनी विविध धर्मीयांशी सुसंवाद साधला. १९८६ मध्ये जगातील धार्मिक नेत्यांना त्यांनी इटलीतील असिसी येथे आमंत्रित करून जागतिक शांततेसाठी प्रार्थना केली. त्यांनी आंतरधर्मीय सुसंवाद परिषद (Pontifical Council for Interreligious Dialogue) स्थापन करून सर्वधर्मीय सुसंवादाचे नवे पर्व सुरू केले.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून गॅलिलिओ यांवरील अन्यायाला त्यांनी न्याय मिळवून दिला. सत्याच्या प्रचारानिमित्ताने झालेल्या अत्याचाराबद्दल त्यांनी चर्चच्या वतीने जगाची क्षमा मागितली. पर्यावरण या विषयावर त्यांनी भाष्य करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी हाक दिली. पोप फ्रान्सिस यांनी त्यांना २७ एप्रिल २०१४ रोजी ‘संत’ म्हणून घोषित करून त्यांच्या जीवनकार्याचा गौरव केला.

वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे व्हॅटिकन सिटी येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Bokenkatter, Thomas, A Concise History of the Catholic Churches, Doublasday, 1990.
  • Joseph, Teresa; Teixeria, Banzelao, Two Popes who knew How To Pope, Mumbai, 2014.
  • Thomas, P. C. A Compact History of the Popes, Mumbai, 1992.
  • Tornielli, Andrea, Francis : Pope of a New World, Colifornia, 2013.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया