शुभ-शुक्रवार : ख्रिस्ती धर्मातील हा एक अत्यंत पवित्र व महत्त्वाचा दिवस असून तो ईस्टरच्या दोन दिवस अगोदर आणि उपासकाळाच्या शेवटी जो शुक्रवार येतो, त्या दिवशी पाळतात. ह्या दिवशी कडकडीत उपवास करतात व मद्यमांससेवन वर्ज्य मानले जाते.

ह्या शुक्रवारी रोमन गव्हर्नर पिलाता ह्याच्यासमोर येशू हा ‘राजा आहे का’, तो ‘देव आहे का,’ ह्याची परीक्षा पाहण्यात आली व पिलाताच्या हुकुमावरून येशू ख्रिस्ताला गुन्हेगाराप्रमाणे दोन चोरांच्या मध्ये क्रुसावर चढविण्यात आले. दुपारी तीन वाजता येशूचे प्राणोत्क्रमण झाले. क्रुसावर तीन तास मरणयातना सहन करीत असताना त्याने सात वाक्ये उच्चारली. येशूच्या आत्मबलिदानाने मानवजातीचे तारण घडून आले; त्या मरणाने माणसाला जीवन मिळाले म्हणून हा शुक्रवार ‘शुभ’ मानला जातो आणि दरवर्षी ह्या दिवशी सर्व ख्रिस्ती लोक चर्चमध्ये एकत्र जमून बायबल  पठणाद्वारे येशूने भोगलेल्या मरणयातनांचे भक्तिभावे स्मरण करतात आणि त्याने उच्चारलेल्या सात वाक्यांवर मनन करतात. चर्चमध्ये उपासनेसाठी एकत्र जमलेले हजारो भाविक या दिवशी क्रुसाला सामूहिकरित्या वंदन करतात व त्याचे चुंबन घेतात.

संदर्भ :

  • Sheen, Fulton J. Life of Christ, Banglore, 1977.
  • Vima, Dasan, His Word Lives, London, 2011.

समीक्षक : पास्कल लोपीस