(ईस्ट इंडियन सॅटिन वुड / सिलोन सॅटिन वुड). मध्यम आकाराच्या रूटेसी कुलातील हळदू या वृक्षाचे शास्त्रीय नाव क्लोरोझायलॉन स्वायटेनिया असून क्लोरोझायलॉन क्लोरोझायलॉन या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. हा वृक्ष मूळचा दक्षिण भारत, श्रीलंका, मादागास्कर येथील असून उतारांवरील शुष्क, पानगळीच्या जंगलांत वाढलेला आढळतो. भारतात छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र इत्यादी राज्यांत; तर महाराष्ट्रात अहमदनगर, कोल्हापूर, पुणे, रायगड या जिल्ह्यांत हा वृक्ष आढळून येतो.

हळदू (क्लोरोझायलॉन स्वायटेनिया) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) फळे.

हळदू हा वृक्ष १५–२० मी. उंच वाढतो. खोडाची साल तपकिरी रंगाची, भेगाळलेली व खरबरीत असते. त्याच्या कोवळ्या भागांवर बारीक लव असते. पाने संयुक्त, पिसांसारखी, एकाआड एक, १५–२२ सेंमी. लांब असून पर्णिकांच्या १०–२० जोड्या असतात; पर्णिका लंबगोल, आयताकृती, गुळगुळीत, अर्धपारदर्शक ठिपके असलेल्या, फिकट निळसर हिरव्या असतात; त्यांच्या तळाशी एक अस्पष्ट शीर दिसते. मार्च-एप्रिल महिन्यात या वृक्षाला फुलोऱ्यात फुले येतात. फुलोरा केसाळ असून फुलांचे गुच्छ फांद्यांच्या बेचक्यात तसेच टोकांना येतात. फुले लहान, उभयलिंगी, हिरवट पांढरी, गोल आणि नियमित असतात. दले खोल खाचायुक्त असून निदलपुंज बाहेरच्या बाजूला पसरलेला असतो. दलपुंजाच्या तळाशी आतल्या बाजूला उंचवटा असलेली चकती असून खोलगट भागांत एकूण दहा स्वतंत्र पुंकेसर असतात. ते दलांपेक्षा आखूड असतात. फळ बोंड प्रकारचे असून २.५–४.५ सेंमी. लांब, आयताकृती, तपकिरी रंगाचे, त्रिखंडी, गुळगुळीत असून त्यात १–४ चपट्या बिया असतात.

हळदूचे लाकूड सोनेरी पिवळसर, चमकदार असून मजबूत, टिकाऊ, जड, गुळगुळीत व सुगंधी असते; वाळवी लागत नसल्यामुळे त्याला मोठी मागणी आहे. त्याचा उपयोग इमारती, फर्निचर, कपाटे, शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, बंदुकांचे दस्ते, खेळणी, कोरीव व कातीव काम यांकरिता करतात. ही वनस्पती दाहक आहे; तिच्यात क्लोरोझायलोनीन व क्लोरोझायलीन ही अल्कलॉइडे असतात. या झाडापासून लालसर, तपकिरी डिंक व एक पिवळे रंगद्रव्य मिळते. लाकडापासून बाष्पनशील तेल मिळते. सुकलेल्या पानांचा उपयोग जनावरांच्या अळ्या पडलेल्या जखमा लवकर भरून येण्यासाठी करतात. पारंपरिक औषधी उपयोगात संधिवात, सूज, मधुमेह, योनी मार्गातील संसर्ग यांवर औषध म्हणून तसेच गर्भरोधक व यकृताचे संरक्षक औषध म्हणून याचा उल्लेख केला जातो. फुलांपासून मिळणारा मध कडू असतो. साल व पाने माशांसाठी विष म्हणून वापरतात. लाकडासाठी या वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड झाल्यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. आययुसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस) या आंतरराष्ट्रीय संस्थेने याचा समावेश नष्ट होण्याची शक्यता असलेल्या वनस्पतींच्या यादीत केलेला आहे.