समुद्र, सरोवरे अशा पाण्याच्या मोठ्या साठ्यांमध्ये राहणाऱ्या विविध सजीवांच्या विशिष्ट समूहाला प्लवक म्हणतात. प्लवक प्रवाहाविरुद्ध पोहू शकत नाहीत. ते प्रवाहाबरोबर वाहत जातात. नेक्टॉन सजीवांची वर्तणूक प्लांक्टन (प्लवक) सजीवांच्या नेमकी उलटी असते. नेक्टॉन सजीव भोवतालच्या प्रवाहाविरुद्ध पोहू शकतात आणि आपले स्थान नियंत्रित करू शकतात. उदा. मासे, जलीय सस्तन प्राणी इ.

बहुतांशी प्लवक सूक्ष्मजीव असतात. या सूक्ष्मजीवांमध्ये प्राणी, वनस्पती आणि जीवाणू यांचा समावेश होतो. ते गोड्या पाण्यात किंवा समुद्रात राहतात. मोठ्या जलचरांच्या अन्नाचा ते मुख्य स्रोत असतात. आकारमानानुसार त्यांचे अतिसूक्ष्म प्लवक (२–२० मायक्रोमीटर), सूक्ष्म प्लवक (२०–२०० मायक्रोमीटर) आणि मोठे किंवा बृहत् प्लवक (०.२–२ मी.) असे वर्गीकरण केले जाते. बहुसंख्य प्लवक आकारमानाने सूक्ष्म असले, तरी जेलीफिशसारखे काही प्लवक आकारमानाने मोठे असतात.

प्लवकांचे वर्गीकरण त्यांच्या शरीररचनेनुसारही करतात: (१) जीवाणुप्लवक : हे पाण्यातील सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर असेंद्रिय पदार्थांत करतात. उदा., सायनोबॅक्टेरिया पेलॅजिबॅक्टर. (२) वनस्पतिप्लवक : स्वयंपोषी, एकपेशीय किंवा बहुपेशीय शैवाल. हे प्लवक सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास अनेक चौकोनी, वर्तुळाकार, लंबगोलाकार पेशी दिसून येतात. त्यांच्या पेशींमध्ये हरितलवक किंवा तांबड्या रंगाचे द्रव्य असते.‍ ते पाण्याच्या पृष्ठभागाखाली जेथे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध होतो तेथे आढळतात व अन्न तयार करतात. उदा., डायाटम, नीलहरित जीवाणू, डायनोफ्लॅजेलेट, कोकोलिथोफोर, ड्युनालिला, क्लॅमिडोमोनास. (३) प्राणिप्लवक : या प्लवकांमध्ये आदिजीव, जेलीफिश, टोमोप्टेरिस (वलयी), कवचधारी संधिपाद प्राण्यांची अंडी आणि झोईया व मायसिससारखे डिंभ, म्हाकुळ डिंभ (मृदुकाय), बहुसंख्य सागरी प्राण्यांची अंडी आणि डिंभ यांचा समावेश होतो. त्यांच्या आकारात विविधता असते. त्यांपैकी जे पूर्ण जीवनभर प्लवक अवस्थेत राहतात त्यांना पूर्ण प्लवक (होलोप्लॅंक्टन) म्हणतात. अनेक माशांची पिले प्रारंभी प्लवक अवस्थेत असतात. प्लवक अवस्था संपून आपापल्या अधिवासात स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांना अंश प्लवक (मेरोप्लँक्टन) म्हणतात. उदा., खेकड्याच्या झोर्इया व मेगालोपा या अवस्था प्लवकाच्या असतात. किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात असणारे प्राणिप्लवक पारदर्शक असतात. काही प्राणिप्लवकांत जीवदीप्ती उत्सर्जित करण्याची क्षमता असते. उदा., नॉक्टिल्युका. काही बृहतप्राणिप्लवकात पाण्यावर तरंगण्यासाठी शरीररचनेत अनुकूल बदल झालेले असतात. उदा., फायसेलिया आणि व्हेलेला या आंतरदेहगुही प्राण्यांच्या शरीरावर तरंगण्यासाठी हवेच्या पिशव्या असतात.

अन्नपुनर्चक्रक, अन्ननिर्माता आणि अन्नग्राहक अशा तीन गटांमध्येही प्लवकांची विभागणी केली जाते. मात्र काही प्लवकांची पोषण पातळी सहजासहजी निश्‍चित करता येत नाही. जसे डायनोफ्लॅजेलेट हे वनस्पतिप्लवक अन्नपुनर्चक्रक आणि अन्ननिर्माता असे दोन्ही प्रकारचे कार्य करते. ते सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर असेंद्रिय खनिज पदार्थांत करते; तसेच प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे अन्ननिर्मिती करते. नीलहरित जीवाणू (सायनोबॅक्टेरिया) हे प्लवक अन्ननिर्मिती करू शकतात,‍ तसेच ते नायट्रोजन चक्र व ऑक्सिजन चक्र यांमध्येही भाग घेतात.

महासागर, समुद्र, सरोवर, तलाव, डबके अशा ठिकाणी प्लवक आढळून येतात. जलीय पर्यावरणात सर्वच प्लवकांच्या परिसंस्था सूर्यप्रकाशावर अवलंबून असतात. सूर्यप्रकाश कमी असेल, तर पाण्याच्या पृष्ठभागाशीच त्यांचे स्वयंपोषण व प्रकाशसंश्लेषण घडून येते. प्लवकांची मुबलकता सूर्यप्रकाशाशिवाय पोषणमूल्यांच्या उपलब्धतेवरही अवलंबून असते. सागरी पाण्यात सर्वत्र सूर्यप्रकाश उपलब्ध असला तरी नायट्रेट, फॉस्फेट व सिलिकेट या पोषणमूल्यांची उपलब्धता कमी असल्यास प्रकाशसंश्‍लेषण किंवा अन्न तयार होण्याची क्रिया मंदावते. पोषणमूल्यांची उपलब्धता कमी होण्याचे कारण म्हणजे सागरी प्रवाहामुळे होणारी उलथापालथ. अशा ठिकाणी प्राथमिक अन्नघटकांचे उत्पादन खूप खोलीवर घडून येते आणि त्यांचे प्रमाण खूप कमी असते. कारण तेथे सूर्यप्रकाश क्षीण असतो.

काही सागरी प्रवाहांमध्ये भरपूर पोषक घटक असूनही अन्ननिर्मिती होत नाही. कारण त्या भागात सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असणाऱ्या लोहाचा अभाव दिसून येतो. पाण्यात जर लोहाचे क्षार अधिक प्रमाणात असतील, तर वनस्पतिप्लवकांचा बहर दिसून येतो. समुद्राच्या पृष्ठभागावर धूळ जमा होत जाऊन महासागरात लोहाचे प्रमाण वाढत जाते. उदा., आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातून व्यापारी वारे अटलांटिक समुद्राच्या पूर्व भागात धूळ वाहून आणतात. पाण्याच्या पृष्ठभागाजवळ तसेच खोलवरही वनस्पतिप्लवक भरपूर प्रमाणात वाढतात. पृष्ठभागावर जेथे प्राथमिक अन्ननिर्मिती भरपूर होते तेथून खालपर्यंत सेंद्रिय पदार्थ बुडत जातात. खोल पाण्यात जेथे प्राथमिक अन्ननिर्मिती प्रक्रिया होत नाही त्या भागातील प्राणिप्लवक व जीवाणुप्लवक हे सेंद्रिय पदार्थ खातात. त्यामुळे सर्व स्तरांतील जलचरांना अन्न मिळते. वनस्पतिप्लवकांवर प्राणिप्लवक जगतात आणि प्राणिप्लवकांवर लहान सागरी जीव जगतात. काही वेळा शार्क, व्हेल आणि डॉल्फिन यांचे खाद्यसुद्धा वनस्पतिप्लवक असतात.

समुद्रात असलेल्या प्लवकांच्या घनतेनुसार त्या भागात किती प्रमाणात मासे पकडता येतील, याचा अंदाज करता येतो. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर प्लवकाच्या वाढीसाठी पावसाळ्याचा काळ अनुकूल असतो. या काळात जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यात नायट्रेट व फॉस्फेट इ. क्षार मिसळलेले असतात. त्यामुळे प्लवकांची वाढ होण्यास मदत होते. पावसाळ्यात माशांचा अंडी घालण्याचा हंगाम असतो. माशांच्या पिलांना मुबलक प्लवक मिळाले तर त्यांची वाढ जोमाने होते. खारफुटीच्या वनांतील दलदलीत प्लवकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तेथे लहान मासे व कोळंबीची पिल्ले मोठ्या प्रमाणात आढळून येतात. भारताच्या ओशनसॅट या उपग्रहाद्वारे दूरस्थ संवेदनाग्रहणाने समुद्रातील प्लवकांची घनता समजते. त्यानुसार कोणत्या ठिकाणी माशांचे प्रमाण अधिक आहे, ते समजते.

प्लवक हे जलीय पारिस्थितिकीचा पाया आहेत. आगामी काळात प्लवकांपासून अन्न उपलब्ध होऊ शकते. प्लवकांची शेती करणे व त्यांची पिके घेणे आता सहज शक्य झाले आहे. सध्याच्या घडीला प्लवकांचे व्यापारी उत्पादन जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्पेन, फ्रान्स इ. देशांत घेतले जाते व सागरी जलजीवालयांमध्ये अन्न म्हणून निर्यात केले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा