गेल्या २००० वर्षांतील बायबलच्या अन्वयार्थासंबंधीचा (Interpretation) इतिहास सातत्याच्या उलथापालथी व फाटाफुटी यांनी भरलेला आहे. ईश्वराविषयी संकल्पना, येशू ख्रिस्त यांचे दैवीपण, त्यांची आई मेरी (मरिया) यांचे स्थान, बायबलच्या शिकवणुकीचा यथोचित अन्वयार्थ विदित करण्याविषयी पोपमहोदयांचे स्थान इत्यादी विषयांसंबंधीच्या बायबलमधील मजकुरांबद्दल मूलभूत स्वरूपाचे मतभेद झाले. त्यामुळे चर्चचे ऐक्य दुभंगून येशू ख्रिस्त यांच्याच नावाने अनेक पंथ-उपपंथ उदयास आले.
बायबलमधील मजकुराच्या अन्वयार्थावरूनच झालेल्या मतभेदांमुळे पंधराव्या शतकात मार्टिन ल्यूथर या धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली यूरोप खंडात प्रॉटेस्टंट पंथाची उभारणी झाली. ख्रिश्चनांच्या या फाटाफुटीचे मूळ कारण म्हणजे बायबलच्या अन्वयार्थाच्या निकषाविषयी घोळ, हे आहे.
बायबल हा मूलत: ऐतिहासिक धर्मग्रंथ आहे. त्याच्यामध्ये मानवी लेखकांच्या प्रतिभेचा व कल्पनाशक्तीचा, सर्जनशीलतेचा निश्चितच आविष्कार तसाच प्रभाव आहे; पण बायबलमधील वर्णने ऐतिहासिक घटनांवर आधारित आहेत म्हणून सोयीचा अन्वयार्थ लावण्यासाठी किंवा सध्याच्या इहवादी संस्कृतीशी जुळवून घेण्यासाठी मूळ ऐतिहासिक तपशील नाकारणे योग्य नव्हे. मात्र बायबलप्रणीत इतिहास हा शाळा-महाविद्यालयांत शिकविल्या जाणाऱ्या ऐहिक इतिहासासारखा नाही. बायबलमध्ये अंतर्भूत असलेला इतिहास श्रद्धा, आध्यात्म, तारण-मुक्ती व अविनाशी जीवन यांच्याशी संलग्न आहे.
बायबलचे असे वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिकत्व न समजल्यामुळे मोठमोठी वादळे निर्माण झाली. ईश्वराने सहा दिवसांत सारे विश्व निर्माण केल्याचे वर्णन बायबलच्या पहिल्याच पानावर आढळते. डार्विन यांच्या उत्क्रांतिवादाच्या संकल्पनेमुळे एकोणिसाव्या शतकात बराच गदारोळ माजला व अजूनही त्याचे पडसाद उमटत आहेत. डार्विनवादामुळे बायबलमधील विश्वाच्या उत्पत्तीच्या वर्णनाबाबत निर्माण झालेला गोंधळ मुळात गैरसमजावर आधारित आहे; कारण बायबल व भौतिकशास्त्र यांची क्षेत्रे परस्परांहून भिन्न आहेत. भौतिक विज्ञान व शास्त्रे शिकविणे हा बायबलचा हेतू नाही. मनुष्याला आपली अंतिम, शाश्वत मुक्ती कशी प्राप्त करून घेता येईल, हे स्पष्ट करणे, यासाठी बायबल संहिता आहे आणि विश्वाचे मूर्त स्वरूप कसे प्रकट, विकसित होत गेले, हे सप्रमाण सिद्ध करणे, हा विज्ञानाचा प्रांत आहे. इंग्रजीत असे म्हटले जाते की, ‘सायन्स टेल्स अस हाऊ द हेव्हन्स गो अँड द बायबल टेल्स अस हाऊ टु गो टु हेव्हन्स’ म्हणजे ‘आकाशस्थ-ग्रहलोक कसे चालतात हे विज्ञान आपल्याला शिकविते आणि स्वर्गात कसे जायचे हे बायबल शिकविते’. म्हणून विज्ञानाचे शोध, सिद्धांत व निष्कर्ष आणि बायबलची शिकवण यांचे मूलभूत स्वरूप भिन्न भिन्न व वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष होण्याची सुतराम शक्यता नाही.
कोपर्निकस व गॅलिलिओ यांच्या खगोलशास्त्रीय शोधांमुळे पृथ्वी गोलाकार असून ती सूर्याभोवती फिरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यूरोपात चर्चच्या धर्माधिकाऱ्यांबरोबर संघर्ष निर्माण झाला. चर्चमधील अधिकारी व पंडित यांच्याही वैचारिक गोंधळामुळे गॅलिलिओंसारख्या शास्त्रज्ञांना सुरुवातीस न्याय मिळू शकला नाही. पृथ्वीचे भौतिक रूप कसे आहे, पृथ्वी आणि सूर्य व इतर ग्रहलोक यांचे भौगोलिक व खगोलशास्त्रीय संबंध काय आहेत, हे सांगण्याचा बायबलचा हेतू मुळीच नव्हे, हे न समजल्यानेच दोन्ही पक्षांकडून आपापल्या भूमिकेबद्दल अतिरेक झाल्याचे दिसते.
संदर्भ :
- Barker, Kenneth, Ed., The NIV Study Bible, Michigan, 1984.
- Flanery, Austin, Vatican Council II : More Post Conciliar Documents, Vol. 2, Mumbai, 2014.
- Paul, Pope John II, Redemptoris Missio, Kochi, 1999.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया