(लायन). अन्नसाखळीच्या शिखरावरील भक्षक प्राण्यांपैकी एक प्राणी. स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणाच्या फेलिडी कुलातील पँथेरा प्रजातीत सिंहांचा समावेश केला जातो. सध्या वन्य स्थितीतील सिंह दक्षिण अफ्रिकेतील सहारा व भारताच्या गुजरात राज्यातील गीर येथील वनांत आढळतात. एकोणिसाव्या शतकापर्यंत वन्य सिंहाचे अस्तित्व पश्चिम यूरोप, टर्की, इराण, मेसोपोटेमिया येथपासून भारतातील नर्मदा नदीलगतच्या प्रदेशात आणि पश्चिम बंगाल येथपर्यंत होते. आशिया खंडात ते इथिओपिया, ईजिप्त, अरबस्तान या मार्गाने आले असावेत. यूरोपात आता सिंह वन्य स्थितीत आढळत नाहीत. सध्या जगात अस्तित्वात असलेल्या सिंहांचे शास्त्रीय नाव पॅंथेरा लीओ लीओ आहे. आशियाई सिंह आकाराने आफ्रिकी सिंहांपेक्षा लहान असल्याने अगदी अलीकडेपर्यंत त्यांची पॅंथेरा लीओ पर्सिका अशी वेगळी उपजाती मानली जात असे.
सन २०१७ साली उत्तर आफ्रिकेतील सिंह आणि आशियाई सिंह यांच्यात शारीरिक व जनुकीय साम्य असल्याने दोन्ही ठिकाणच्या सिंहांचे नाव पँथेरा लीओ लीओ असे कायम करण्यात आले. आशियाई सिंह मुख्यत: भारतातील गीरच्या वनात आढळतात. त्यांचा अधिवास कमी क्षेत्रफळाचा असल्याने आययुसीएन संस्थेने ‘अस्तित्व धोक्यात’ असलेल्या प्राण्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला आहे. सदर नोंद आशियाई सिंहांवर आधारित असून आफ्रिकी सिंहाबद्दल संक्षिप्त रूपात माहिती दिलेली आहे.
विसाव्या शतकात आशियाई सिंह गीर परिसरात बंदिस्त झाला. गीरचे वन गुजरातच्या जुनागढ भागात सु. १,४१२ चौ. किमी. क्षेत्रात पसरलेले असून आशियाई सिंहांसाठी ते राखून ठेवले आहे. भारतात हा सिंहांचा एकमेव अधिवास आहे. यातील सु. २५८ चौ. किमी. क्षेत्रात मनुष्याला प्रवेश करण्यास कायद्याने बंदी आहे. फक्त सभोवतालच्या परिसरात मालधारी जमातीची माणसे गुरे चारण्यासाठी ये-जा करू शकतात. सन २०१० पासून सिंहांची संख्या हळूहळू वाढत आहे. १४ व्या आशियाई सिंह गणनेनुसार सिंहांची संख्या सु. ५२३ एवढी होती. ऑगस्ट २०१७ मध्ये केलेल्या गणनेनुसार ही संख्या आता ६५० एवढी वाढली आहे.
आशियाई नर सिंहाची खांद्यापर्यंतची उंची १०७–१२० सेंमी. असून पूर्ण वाढलेल्या नराचे वजन १६०–१९० किग्रॅ. असते. मादी नर सिंहांपेक्षा लहान असते; मादी ८०–१०७ सेंमी. उंच असून तिचे वजन ११०–१२० किग्रॅ. असते. आशियाई सिंहाची ‘फर’ (त्वचेवरील केसांचे आवरण) वेगवेगळ्या रंगाची असते; त्यांची फर लाल–पिवळसर असून त्यावर अधूनमधून काळ्या किंवा राखाडी रंगाच्या छटा असतात, विशिष्ट प्रकाशात तिला सोनेरी झळाळी येते. फक्त नर सिंहाला आयाळ असून ती डोक्यापासून मानेपर्यंत पसरलेली असते; आयाळीतून कान बाहेर दिसतात. गाल व घसा या भागातील आयाळ आखूड, केवळ १० सेंमी. लांब असते. आशियाई सिंह आणि आफ्रिकी सिंह यांच्यातील मुख्य फरक असा की, आशियाई सिंहाच्या पोटावर त्वचेची लांब घडी असते. आशियाई सिंहाच्या शेपटीचा झुबका आफ्रिकी सिंहापेक्षा मोठा असतो. त्याला लांब सुळे आणि तीक्ष्ण नख्या असतात.
सिंह घनदाट वने, वाळवंट किंवा दलदल असलेल्या प्रदेशांत राहत नाहीत. सामान्यपणे सपाट, उंचीला कमी असलेल्या झाडाझुडपांच्या किंवा ओबडधोबड प्रदेशात ते राहतात. गीरच्या वनात खुरटलेले साग, पळस, जांभूळ, बोरीची झाडे असून या खुरट्या झाडांखाली काटेरी झुडपे असल्याने हा प्रदेश सिंहाच्या अधिवासासाठी अनुकूल आहे. सामान्यपणे सिंह एकेकटे किंवा दोन-तीनच्या कळपाने वावरतात. ते दिवसा झाडाच्या सावलीत एकत्र विश्रांती घेतात, शिकार करतात आणि खातात. शिकारीसाठी ते संध्याकाळी बाहेर पडतात; कधीकधी ते दिवसाही शिकार करतात. मूत्राचा वापर करून ते आपल्या अधिवासाच्या सीमा निश्चित करतात. त्यांचे ओरडणे मेघगर्जनेसारखे असते आणि कधीकधी पाच किमी.पर्यंत दूर ऐकू येते. वर्षभरात सिंह साधारणपणे १४५–२३० चौ.किमी. वावर करतात, तर माद्या साधारणपणे ६५–८५ चौ. किमी. एवढ्या क्षेत्रात वावरतात. उन्हाळ्यांत ते नदीलगतच्या सावली असलेल्या भागाकडे वळतात. बऱ्याचदा अशा ठिकाणी पाळीव जनावरे, चितळ, सांबर, नीलगायी, म्हशी असे खुरी प्राणी सावलीसाठी किंवा पाण्यासाठी जमलेली असतात. अशा प्राण्यांची सिंह शिकार करतात आणि खातात. बहुधा सिंहीणच भक्ष्याला ठार मारते. आठवड्यातून एकदा पोटभर अन्न मिळाले तरी त्यांना पुरते. बरेच दिवस उपासमार झाल्यास ते मेलेल्या जनावरांना खाऊन आपली भूक भागवितात. वृद्ध किंवा अशक्त सिंहच सहसा मनुष्यावर हल्ला करतात. सिंह पाण्यात चांगले आणि बराच वेळ पोहू शकतात.
मादीचा विणीचा हंगाम ठरावीक नसतो; परंतु गीरच्या जंगलातील माद्यांना जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पिले होतात. जन्म झाल्यानंतर पिलांचे मिटलेले डोळे सहा ते नऊ दिवसांपर्यंत उघडतात. त्यांच्या शरीरावर काळे ठिपके असतात. दहाव्या महिन्यानंतर हे ठिपके नाहीसे होतात. पिले अकरा महिन्यांची झाल्यावर शिकारीत भाग घेतात. मादी पिले अडीच ते तीन वर्षांची झाल्यावर प्रजननक्षम होतात. सिंह पाच वर्षांचा झाला म्हणजे वयात येतो. जंगलातील सिंह १५–१८ वर्षे जगतो, तर पाळलेला सिंह सु. ३० वर्षे जगतो.
सिंहांच्या एका कळपात सामान्यपणे १ ते ३ प्रौढ नर, १०–१२ माद्या आणि त्यांची बछडे असतात. कळपातील नर आणि माद्या समागमाशिवाय एकत्र येत नाहीत. नरांचा आणि माद्यांचा गट वेगवेगळा असतो. बछडे माद्यांबरोबर राहतात. कळपात एकापेक्षा अधिक नर असल्यास त्यांतील सर्वांत शक्तिशाली नर कळपाचा प्रमुख असतो. सर्व नर मिळून कळपाचे आणि कळपाच्या अधिवासाचे रक्षण करतात. मात्र सर्वाधिक जबाबदारी कळपाच्या प्रमुखाकडे असते.
सिंहांचा प्रजननकाळ सप्टेंबर ते जानेवारी असा असतो. मादी एकापेक्षा जास्त नरांबरोबर समागम करत असली, तरी कळपातील प्रमुख नर इतर नरांपेक्षा जास्त वेळ समागम करतो. नर-मादी यांचा समागम तीन ते सहा दिवस चालतो. या दरम्यान ते शिकार करीत नाहीत; केवळ पाणी पितात. गर्भावधी सु. ११० दिवसांचा असतो. मादी एका वेळेला १ ते ४ बछड्यांना जन्म देते. नराने बछड्यांना मारले नाही किंवा एखाद्या रोगामुळे बछडे मेले नाहीत, तर साधारणपणे मादीच्या दोन वेतांमध्ये दोन वर्षांचे अंतर असते. बछडे दोन वर्षांत स्वतंत्रपणे हिंडूफिरू लागतात. तीन वर्षांनंतर सिंहांचे बछडे तरुण होऊ लागतात, ते कळपापासून वेगळे होतात आणि त्यांचा अधिवासाचे क्षेत्र प्रस्थापित होईपर्यंत भटकत राहतात.
चार ते पाच वर्षाचे तरुण नर एखाद्या कळपाच्या नराला आव्हान देऊन त्याला कळपातून पिटाळून लावू शकतात. असे नर कळपातील माद्यांवर स्वामित्व प्रस्थापित करतात. अशा वेळी एखाद्या मादीला आधीच्या नरापासून झालेले पिलू असल्यास नव्याने प्रमुख झालेला नर बहुधा त्या पिलास ठार मारतो. अशा प्रकारे नवीन नराला त्याची पिले जन्माला घालण्याची संधी मिळते. माद्या सहसा कळप सोडून जात नाहीत, मात्र एखादा कळप संख्येने फार मोठा होतो तेव्हा त्यांतील तरुण नरच नाही, तर माद्याही कळप सोडून बाहेर पडतात आणि अशा माद्या नवीन कळपाच्या शोधात फिरतात.
नर सिंहाचे आयुष्य १२–१५ वर्षे असून मादी नरापेक्षा अधिक जगते. सर्व फेलिडी कुलातील नरांच्या शिस्नामध्ये शिस्न-अस्थी असते. शिस्न-अस्थी स्वतंत्र असून कोठेही जोडलेली नसते. शिस्नाच्या टोकावर असलेल्या काट्यांसारख्या उभारामुळे मादीच्या योनीतील पूर्वीच्या नराच्या शुक्रपेशी खरवडून निघतात. कोणत्याही प्रकारे आपला वंश आपल्या कुटुंबात वाढता राहावा, यासाठी ही योजना झालेली आहे.
सर्वसाधारणपणे आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह आकारमानाने सारखेच असतात. मात्र काही बाबतींत त्यांच्यात फरक दिसून येतात. आफ्रिकी सिंहांची आयाळ दाट, लांब आणि रंगाने गडद असते. त्यामुळे आफ्रिकी सिंह आकर्षक दिसतात. मात्र काही आफ्रिकी नरांना मुळीच आयाळ नसते. दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर राष्ट्रीय उद्यान, टांझानियातील सेरेंगटी राष्ट्रीय उद्यान, नामिबियातील ईटोश राष्ट्रीय उद्यान, तसेच झिम्बाब्वे, युगांडा या देशांमध्येही काही नैसर्गिक प्रदेश सिंहांकरिता आरक्षित करून ठेवले आहेत. दक्षिण आफ्रिकेत क्रूगर राष्ट्रीय उद्यानात पांढरे सिंह आढळतात; परंतु त्यांची संख्या मर्यादित आहे.
काही विशिष्ट परिस्थितीत प्राणिसंग्रहालयात वाघ आणि सिंहीण, तसेच सिंह आणि वाघीण यांच्यापासून अनुक्रमे ‘टायगन’ आणि ‘लायगर’ अशा संकरित संतती निर्माण केल्या गेल्या आहेत. त्यांतील नर संतती वंध्य असते; परंतु मादीला पिले होऊ शकतात.